आयुष्यमान भारत योजना : राज्यात केवळ ८३ लाख लाभार्थी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2018 10:41 AM2018-09-17T10:41:06+5:302018-09-17T10:41:48+5:30

केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना ‘आयुष्यमान भारत’मध्ये २०११ मध्ये झालेले सामाजिक, आर्थिक व जात सर्वेक्षणानुसार (एसईसीसी) केवळ ८३ लाख लाभार्थी कुटुंबानाच याचा लाभ मिळणार आहे.

Life Insurance Scheme: Only 83 lakh beneficiaries in the state | आयुष्यमान भारत योजना : राज्यात केवळ ८३ लाख लाभार्थी

आयुष्यमान भारत योजना : राज्यात केवळ ८३ लाख लाभार्थी

Next
ठळक मुद्देनागपूर जिल्ह्यात ३ लाख ७७ हजार लाभार्थी

सुमेध वाघमारे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागूपर : केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना ‘आयुष्यमान भारत’ची सुरुवात राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये २५ सप्टेंबरला पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जन्मदिनापासून करण्याचा प्रयत्न आहे. मात्र, २०११ मध्ये झालेले सामाजिक, आर्थिक व जात सर्वेक्षणानुसार (एसईसीसी) केवळ ८३ लाख लाभार्थी कुटुंबानाच याचा लाभ मिळणार आहे. तर, नागपूर जिल्ह्यात फक्त ३ लाख ७७ हजार लाभार्थी कुटुंब पात्र ठरले आहेत. धक्कादायक म्हणजे जिल्ह्यातील २०६ गावांमध्ये शून्य लाभार्थी अशी नोंद आहे.
‘आयुष्यमान भारत’ म्हणजे राष्ट्रीय आरोग्य विमा योजनेंतर्गत एका कुटुंबाला पाच लाख रुपये विमा संरक्षण, कोणत्याही आजारांवर देशभरातील नामांकित रुग्णालयात लाभार्थी कुटुंबातील व्यक्तींना उपचार घेता येणार आहे.
२०११ मध्ये झालेले सामाजिक, आर्थिक व जात सर्वेक्षणानुसार (एसईसीसी) लाभार्थ्यांची यादी तयार करण्यात आली. यात ज्या कुटुंबाचे उत्पन्न एक लाखाच्या आत आहे अशाच कुटुंबाचा समावेश करण्यात आला आहे.
या यादीनुसार आरोग्य विभागाने राज्यातील शहरी व ग्रामीण भागातील पात्र कुटुंबातील व्यक्तींचे आधार कार्ड, मोबाईल नंबर, कुटुंबाची माहिती संकलित करण्याचे कार्य आता अंतिम टप्प्यात आले आहे. परंतु अनेक पात्र कुटुंबीयांची नावे यादीत नसल्याने गोंधळ उडाला आहे. राज्याची लोकसंख्या ११ कोटी २४ लाखवर पोहचली असताना ८३ लाख ६३ हजार ६६४ कुटुंबीयांना याचा लाभ मिळणार आहे.
नागपूर जिल्ह्याचा विचार केल्यास, ४७ लाख लोकसंख्या असताना ३ लाख ७७ हजार ३०१ लाभार्थी पात्र ठरविण्यात आले आहे.
याच कुटुंबातील पाच व्यक्तींना या योजनेचा लाभ मिळणार आहे. यामुळे उर्वरित नागपूर जिल्ह्यातील ४३ लाख लोकसंख्येमध्ये कुणी गरीब नाही का, प्रत्येक कुटुंबाचे उत्पन्न एक लाखावर आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

नागपूर शहरात ३२८ वॉर्डात २ लाख लाभार्थी
राष्ट्रीय आरोग्य विमा योजनेंतर्गत नागपूर जिल्ह्यातील शहरी भाग असलेल्या ३२८ वॉर्डातून २ लाख ३९८ लाभार्थी कुटुंबीयांची निवड करण्यात आली आहे. यात कळमेश्वरमधील १९८३, कामठीमधील ८०६३, काटोलमधील २२००, खापामधील ८६३, मोहपामधील ९४, मोवाडमधील ११७२, नागपूर महानगरपालिकेंतर्गत १ लाख ७६ हजार १०३, नरखेडमधील २६९३, रामटेकमधील २१६५, सावनेरमधील २१७६ तर उमरेडमधील २८८६ कुटुंबीयांची निवड करण्यात आली आहे. नागपूर शहराच्या २५ लाख लोकसंख्या असलेल्या १३५ वॉर्डातून केवळ सात टक्केच पात्र कुटुंबाना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

१८९१ गावांत १ लाख ७६ हजार पात्र कुटुंब
आयुष्यमान योजनेच्या यादीत नागपूर जिल्ह्यातील ग्रामपंचायत अंतर्गत १८९१ गावांचा समावेश करण्यात आला आहे. यात १ लाख ७६ हजार ९०३ पात्र कुटुंब आहेत. उर्वरित २०६ गावांमध्ये गरीब कुटुंबच नसल्याने त्या गावाचे नाव यादीत समाविष्ट करण्यात आलेले नाही. ही गावे जाणीवपूर्वक डावलण्यात आल्याचा आरोपही होत आहे.

Web Title: Life Insurance Scheme: Only 83 lakh beneficiaries in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.