नामांतर आंदोलनातील ‘लाँगमार्च’चा प्राण म्हणजे इ.मो.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2018 11:35 PM2018-05-04T23:35:50+5:302018-05-04T23:36:04+5:30
मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरासाठी दीक्षाभूमीवरून ऐतिहासिक असा ‘लाँगमार्च’ निघाला. दररोज शेकडो मैल चालून भीमसैनिक थकून जात होते. त्यांचे पाय रक्तबंबाळ होत असत. अशा थकलेल्या भीम सैनिकांमध्ये नवीन ऊर्जा निर्माण करून त्यांच्या रक्तबंबाळ पायांना पुन्हा चालण्यासाठी प्रेरणा देण्याचे काम तेव्हा खऱ्या अर्थाने इ.मो. नारनवरे यांच्या गीतांनी केले. त्या ऐतिहासिक लाँगमार्चचा प्राण म्हणजे इ.मो. नारनवरे होत, अशा शब्दात लाँगमार्चचे प्रणेते सरसेनापती प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी त्यांचा गौरव केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरासाठी दीक्षाभूमीवरून ऐतिहासिक असा ‘लाँगमार्च’ निघाला. दररोज शेकडो मैल चालून भीमसैनिक थकून जात होते. त्यांचे पाय रक्तबंबाळ होत असत. अशा थकलेल्या भीम सैनिकांमध्ये नवीन ऊर्जा निर्माण करून त्यांच्या रक्तबंबाळ पायांना पुन्हा चालण्यासाठी प्रेरणा देण्याचे काम तेव्हा खऱ्या अर्थाने इ.मो. नारनवरे यांच्या गीतांनी केले. त्या ऐतिहासिक लाँगमार्चचा प्राण म्हणजे इ.मो. नारनवरे होत, अशा शब्दात लाँगमार्चचे प्रणेते सरसेनापती प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी त्यांचा गौरव केला.
ज्येष्ठ कवी व आंबेडकरी विचारवंत इ.मो. नारनवरे यांच्या ७५ व्या वर्षपूर्तीनिमित्त शुक्रवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आॅडिटोरियम दीक्षाभूमी येथे त्यांचा शाल, गौरवपत्र व स्मृतिचिन्ह देऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला. त्यावेळी आपले विचार व्यक्त करताना प्रा. कवाडे बोलत होते. आंबेडकरी विचारवंत ताराचंद्र खांडेकर हे अध्यक्षस्थानी होते. तर माजी मंत्री नितीन राऊत, प्रसिद्ध न्युरोलॉजिस्ट डॉ. चंद्रशेखर मेश्राम, ज्येष्ठ साहित्यिक धर्मराज निमसरकर, सामाजिक कार्यकर्त्या तक्षशीला वाघधरे, गीता नारनवरे प्रामुख्याने उपस्थित होत्या.
प्रा. जोगेंद्र कवाडे म्हणाले, प्रत्येक शब्दाचा वापर हा आंबेडकरी आणि तथागत बुद्धाची निष्ठेशी सुसंगत राहील, यावर इ.मो. नारनवरे यांचा भर राहिलेला आहे. अक्षरांची दगडफेक आणि शब्दांचा गोळीबार काय असतो हे त्यांच्या प्रत्येक शब्दातून जाणवते. लाँगमार्चमध्ये आम्ही तो अनुभवले आहे. नामांतराच्या आंदोलनातील चंदरची त्यांनी लिहिलेली कथा अंगावर शहरे आणते. त्यांनी लिहिलेले ‘जयभीम हमारा नारा है, जयभीम देश हमारा है’ हे गीत म्हणजे देशातील समस्त शोषित वंचितांचे राष्ट्रगान व्हावे, असे आहे. ते केवळ लेखक नसून प्रसंगी रस्त्यावर उतरणारा कार्यकर्तासुद्धा आहे. अशा शब्दात त्यांनी इ.मो. नारनवरे यांचा गौरव केला. आज देशात भीषण परिस्थिती आहे, अशा परिस्थितीत ज्यांना बुद्धाची शांती समजत नसेल त्यांना भीमाच्या क्रांतीने समजावण्याची गरज आहे, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
अध्यक्षीय भाषणात ताराचंद्र खांडेकर म्हणाले, इ.मो. नारनवरे यांनी आंबेडकरी चळवळीची सांस्कृतिक पुनर्रचनेची पायाभरणी करताना कधीही लाचारी किंवा तडजोड स्वीकारली नाही. आंबेडकरी निष्ठा आयुष्यभर जबाबदारीने स्वीकारल्यामुळेच ते इतरांसाठी मार्गदर्शक ठरतात. नितीन राऊत म्हणाले, नामांतराचे आंदोलन खºया अर्थाने पेटवण्याचे काम हे इ.मो. नारनवरे यांच्या गीतांनी केले. यावेळी धर्मराज निमसरकार, तक्षशीला वाघधरे यांनीही त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. आपल्या सत्काराला उत्तर देतांना इ.मो. नारनवरे यांनी चळवळीची नाळ तुटू देऊ नका. चळवळीतील नेत्यांवर आरोप करीत असताना त्यांनी चळवळीसाठी काय केले आहे, याचीही जाणीव ठेवा, असे आवाहन केले.
प्रास्ताविक का.रा. वालदेकर यांनी केले. नीलकांत कुलसंगे यांनी गौरवपत्राचे वाचन केले. संचालन पल्लवी जीवनतारे यांनी केले. नरेश वाहाने यांनी आभार मानले.
‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’चे काव्यात्मक लेखन हे ऐतिहासिक कार्य
यावेळी चंद्रशेखर मेश्राम म्हणाले, इ.मो. नारनवरे यांनी अनेक कार्य केले. परंतु बुद्ध आणि त्यांचा धम्म या ऐतिहासिक ग्रंथाचे काव्यात्मक लेखन हे त्यांच्या जीवनातील ऐतिहासिक कार्य असल्याचे आपण मानतो. हा ग्रंथ लवकरच प्रकाशित व्हावा. त्याची जबबादारी आपण स्वीकारायला तयार आहोत. तसेच इ.मो. नारनवरे यांचे अप्रकाशित साहित्य प्रकाशित करण्याची आपण जबाबदारी घेत असल्याचेही त्यांनी यावेळी घोषित केले.