नाही कळले कधी जीव वेडावला!

By admin | Published: July 24, 2014 01:02 AM2014-07-24T01:02:03+5:302014-07-24T01:02:03+5:30

‘प्राईम टाईम’मध्ये जास्तीत जास्त दर्शकांना आकर्षित कण्यासाठी दूरचित्रवाणी वाहिन्यांमध्ये स्पर्धा सुरू असते. परंतु याच ‘प्राईम टाईम’मुळे घराघरांमध्येदेखील स्पर्धा दिसून येते ती रिमोटवर ताबा घेण्याची.

Life is never heard! | नाही कळले कधी जीव वेडावला!

नाही कळले कधी जीव वेडावला!

Next

‘प्राईम टाईम’च्या स्पर्धेत गृहिणीच केंद्रस्थानी
नागपूर :
‘प्राईम टाईम’मध्ये जास्तीत जास्त दर्शकांना आकर्षित कण्यासाठी दूरचित्रवाणी वाहिन्यांमध्ये स्पर्धा सुरू असते. परंतु याच ‘प्राईम टाईम’मुळे घराघरांमध्येदेखील स्पर्धा दिसून येते ती रिमोटवर ताबा घेण्याची. बहुतांश घरांमध्ये यात विजय होतो तो गृहमंत्री असलेल्या गृहिणींचाच. सायंकाळी ७ ते रात्री १०.३० या काळात घरांघरांतील दूरचित्रवाणी संचांवर मालिकांचेच वर्चस्व दिसून येते. एखादे दिवशी जरी मालिका पाहण्यात आली नाही तरी महिला अस्वस्थ होऊ लागतात. मालिकांचा महिलांवर असलेला पगडा लक्षात घेता एकूणच मालिकांबाबत गृहिणींची भूमिका जाणून घेण्यासाठी ‘लोकमत’ने एक प्रश्नावली त्यांच्यासमोर मांडली. या सर्वेक्षणांतर्गत उपराजधानीतील महिलांची मते जाणून घेण्यात आली. त्यातून निघालेले निष्कर्ष व बोलक्या प्रतिक्रियांवर आधारित हा स्पेशल रिपोर्ट...
मालिकांच्या दर्जावर प्रश्नचिन्ह
‘प्राईम टाइम’मध्ये काही निवडक मालिका सोडल्या तर बहुतांश मालिकांचा दर्जा खालावला असल्याची खंत गृहिणींनी व्यक्त केली. अनेक मालिकांची सुरुवात तर चांगली झाली होती. परंतु त्यानंतर मालिका लांबविण्याच्या प्रकारामुळे त्याच्या दर्जावर परिणाम झाला. अ़नेक मालिका लागल्या तर आपसुकच गृहिणी चॅनल बदलत असल्याचे चित्र आहे. रटाळ मालिका असल्या तर अगदी लहान मुलांसोबत ‘कार्टून’ पहाणे किंवा वृत्तवाहिन्या पसंत करतो असा सूर गृहिणींमधून ऐकायला मिळाला. प्रामुख्याने ‘एका लग्नाची तिसरी गोष्ट’, ‘अस्मिता’, ‘जावई विकत घेणे आहे’, ‘गंध फुलांचा गेला सांगून’, ‘असावा सुंदर स्वप्नांचा बंगला’, ‘सावर रे’, ‘दुर्वा’, ‘देवयानी’, ‘मानसीचा चित्रकार तो’ यांसारख्या मालिका रटाळ असल्याचे मत गृहिणींनी व्यक्त केले. कथानकाला मध्येच वेगळे वळण देऊन प्रेक्षकांना झुलवत ठेवण्याच्या प्रकारालाही गृहिणींनी आक्षेप घेतला आहे.
वास्तविकता दाखविण्याऐवजी काहीतरी कल्पनाविलास दाखविणे यामुळे वैचारिकता संपुष्टात आल्याची तक्रार गृहिणींनी केली. मालिका या हलक्याफुलक्या व कौटुंबिक वातावरण दर्शविणाऱ्या असाव्यात. त्यात द्वेष, कट-कारस्थानं, विवाहबाह्य संबंध यांना ‘ब्रेक’ देण्याची गरज आहे. शिवाय त्या वास्तविकदेखील वाटल्या पाहिजेत अशी अपेक्षा सुमारे ६८ टक्के नागपूरकर गृहिणींनी व्यक्त केली आहे.
‘रेशीमगाठी’ने बांधले ‘टीआरपी’चे बंध
झी मराठीवरील दाखविण्यात येणाऱ्या ‘जुळून येती रेशीमगाठी’ या मालिकेला महिलांची सर्वात जास्त पसंती असल्याचे सर्वेक्षणातून दिसून आले. या मालिकेतील मेघनाचा सालसपणा, आदित्यचा समजूतदारपणा, देसाई कुटुंबियांचे आदर्श घर आणि माई-नानांचे ज्ञानामृत हे गृहिणींसोबतच घरातील अनेकांना भावत असल्याचे समोर आले. या मालिकेतील साधेसरळपणाने महिलांची मने जिंकली असल्याचा मतप्रवाह समोर आला. ही मालिका कौटुंबिक नात्याचे अनोखे दर्शन घडवित असल्याचेही गृहिणींचे म्हणणे आहे. या मालिकेसोबतच ‘होणार सून मी ह्या घरची’ या मालिकेच्यादेखील प्रेमात गृहिणी पडल्या आहेत. या मालिकेतील जान्हवी आणि श्रीच्या जोडीने गृहिणींच्या मनात घर केले आहे. साध्या कुटुंबातील जान्हवी आणि धनाढ्य श्री यांच्यातील ही प्रेमकहाणी आणि सर्वांना एकत्र आणण्याची त्यांची धडपड पाहण्यासाठी गृहिणी हातातील कामे लवकर उरकून दूरचित्रवाणी संचासमोर बसतात. याशिवाय बांदेकर भाऊजींच्या ‘होममिनिस्टर’लादेखील गृहिणींची चांगलीच पसंती आहे. ‘फू बाई फू’मध्ये भारत गणेशपुरे आणि सागर करंडे यांना तर उपराजधानीत विशेष डिमांड आहे. या दोघांच्या जोडीचा ‘परफॉर्मन्स’ असला की मग ‘क्या कहने’.
स्वयंपाकाला उशीर आहे हं...
प्राइम टाइममध्ये मालिका पाहणाऱ्या गृहिणींचे सगळेच लक्ष मालिकांमध्ये असल्यामुळे नेहमीच घरोघरी स्वयंपाकाला उशिर होतो. एवढेच काय अनेक घरात सासवाही या मालिकांच्या ‘फॅन’ झाल्या आहेत. सोबत सासरेबुवासुद्धा. आता सूनबाईच व्यस्त असल्यामुळे त्यांचाही नाईलाज असतो. सायंकाळचे सात वाजले की पूर्वी स्वयंपाकाची तयारी सुरू व्हायची. आता चित्र बदललेले दिसते. तिकडे पतीराज घरात आलेले असतात. कधी-कधी त्यांचाही जीव कासावीस होतो. आवाज दिला तरी थोडं थांबा ना..असा आवाज येतो. मात्र, इकडे सगळेच टीव्हीसमोर तोंड देऊन बसून असल्याने रात्री दहाला त्यांनाही ‘शॉर्टकट’मध्ये अन् तेही कमी वेळात तयार झालेल्या ‘मेनू’वर निभवावे लागते...बिच्चारे!
‘होम मिनिस्टर’ हिट
प्राईम टाइममध्ये गृहिणींनी हिंदी व मराठी या दोन्ही वाहिन्यांवरील मालिकांना आपली पसंती दर्शविली आहे. महिलांना हक्काचे ‘प्लॅटफॉर्म’ देणारा कार्यक्रम वाटतो तो म्हणजे झी मराठीवर प्रसारित होणारा आदेश बांदेकर यांचा ‘होम मिनिस्टर’ हा कार्यक्रम. या कार्यक्रमातून वहिनींशी थेट संपर्क साधणार तसेच पैठणीच्या माध्यमातून गृहिणींमध्ये नवीन आत्मविश्वास जागृत करणारे ‘भाऊजी’ घरातीच सदस्य असल्यासारखे वाटते असे महिलांनी सांगितले. या मालिकेत नवनवीन खेळांचा समावेश व्हावा आणि मुंबई-ठाण्यापेक्षा विदर्भातील महिलांना जास्त प्राधान्य द्यावे अशी महिलांची इच्छा असल्याचे सर्वेक्षणातून समोर आले.घरातील जेष्ठ नागरिकांनादेखील ही मालिका भावत असल्याचे महिलांनी सांगितले. यासोबतच स्टार प्रवाहवर सुरू असलेल्या ‘महाभारत’ या पौराणिक मालिकेलादेखील चांगला ‘टीआरपी’ असल्याचे दिसून आले. विशेषत: सायंकाळी ६ ते ७ या वेळेत दाखविल्या जाणारी ही मालिका पाहण्यासाठी घरातील मुलेदेखील उत्सुक असतात असे महिलांनी सांगितले. त्याच दरम्यान सायंकाळी ६.३० वाजता झी मराठीवर आदेश भाऊजींचा ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रम लागत असल्याने बऱ्याचदा रिमोटची ओढाताण होत असल्याची कबुलीही काही गृहिणींनी दिली. याच सुमारास बातम्यांची वेळदेखील होत असल्याने अनेकदा घरात ‘टॉस’देखील करण्यात येतो अशी माहिती महिलांनी या सर्वेक्षणातून दिली.

Web Title: Life is never heard!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.