दिसायला सुंदर ‘वेली’ झाडांसाठी जीवघेण्या ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:07 AM2021-04-28T04:07:28+5:302021-04-28T04:07:28+5:30
वेलीचे नाव : आईसक्रीम क्रिपर्स शास्त्रीय नाव : अॅन्टीगोनॉन लेप्टोपस नागपूर : शहरातील सिव्हिल लाईन्स भागात फेरफटका ...
वेलीचे नाव : आईसक्रीम क्रिपर्स शास्त्रीय नाव : अॅन्टीगोनॉन लेप्टोपस
नागपूर : शहरातील सिव्हिल लाईन्स भागात फेरफटका मारताना मोठ्या झाडांना गुंडाळलेल्या सुंदर वेली त्यांच्यावरील फुलांमुळे अधिकच मनमोहक वाटत असल्या तरी त्यांचे हे सौंदर्य झाडांसाठी जीवघेणे ठरले आहे. या वेलींमुळे हळूहळू झाडे सुकायला आणि करपून मरायला लागली आहेत. पर्यावरणप्रेमी श्रीकांत देशपांडे यांच्या निरीक्षणानुसार, या वेलींमुळे सिव्हिल लाईन्सचे ४० टक्के ग्रीन कव्हर धोक्यात आले आहे.
श्रीकांत देशपांडे यांनी आपल्या पाच वर्षांच्या निरीक्षणातून लोकमतला ही माहिती दिली आहे. त्यांच्या पाहणीनुसार या वेली मोठ्या प्रमाणात फोफावल्या आहेत. हिरव्या रंगाची सुंदर पाने आणि गुलाबी रंगाची फुले असलेल्या या वेली पाहताना आकर्षक वाटतात, पण हळूहळू लक्षात आले की वेलींनी गुंडाळलेले झाडे सुकायला लागले आहे. असे एक नाही तर शेकडो झाडे यामुळे सुकलेली आपल्या दिसून येतील. यामुळे मोठी झाडे मृतप्राय झाली आहेत, तर लहान झाडांची वाढच खुंटली आहे. आधी पावसाळ्यात त्या फुललेल्या दिसायच्या. पण गेल्या तीन-चार वर्षांपासून बाराही महिने कधी ना कधी पाऊस पडत असल्याने वेलींना मरण येतच नसल्याचे देशपांडे यांनी सांगितले. हा प्रकार केवळ सिव्हिल लाईन्समध्येच आहे असे नाही तर शहरात सर्वत्र या वेली फोफावल्या आहेत. केवळ शहरातच नाही तर बहुतेक महामार्गावरील झाडांवर या वेलींचे अदृश्य संकट निदर्शनास आले आहे. त्यामुळे देशभरात लाखो झाडे मरत आहेत. जबाबदार यंत्रणेने या वेली समूळ उच्चाटनासाठी काही तरी उपाययोजना करावी, अशी भावना श्रीकांत देशपांडे यांनी व्यक्त केली.
वेली भारतातील नाही, मेक्सिकाेची
वनस्पती तज्ज्ञ प्राची माहुरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, या वेलींना आईसक्रीम क्रिपर्स असे म्हटले जाते. ही भारतातील प्रजाती नाही तर मेक्सिकाे येथील असून, देशी झाडांना धाेका निर्माण झाला आहे. कुणी तरी आपल्या घरच्या गार्डनमध्ये ती सजावटीसाठी लावली असेल पण पक्ष्यांद्वारे शहरातील हिरवळीत पसरली आहे. धाेकादायक म्हणजे शहरात याचे प्रमाण खूप झाले आहे. यांना तणनाशक रसायनाने मारण्याचा प्रयत्न केल्यास यांच्यापेक्षा इतर झाडांनाच धाेका अधिक आहे. यांचा व्यवस्थित अभ्यास करून समूळ उच्चाटनाची गरज असल्याचे माहुरकर यांनी सांगितले.
या मरत नाही, उखडून फेकाव्या लागतात
या वेली झाडांच्या आधारे वाढतात व हळूहळू पूर्ण झाड व्यापून टाकतात. त्यामुळे मूळ झाडापर्यंत सूर्यप्रकाश पाेहचत नाही व त्यांची अन्न तयार करण्याची (फाेटाेसिन्थेसिस) क्षमता हळूहळू कमी हाेते व ते मरतात. एक वेल २०-२५ वर्षे तरी जगते व त्यांच्या बिजातून नवीन तयार हाेते. झाडांच्या पालापाचाेळ्यामुळे सुपीक झालेल्या जमिनीवर त्या अधिक जाेमाने वाढतात. या वारंवार मुळापासून उखडून फेकल्याशिवाय मरत नाही. त्यांना झाडांवर वाढू देणेच धाेकादायक आहे. त्यांचा पर्यावरणाच्या दृष्टीने काही फायदा नाही. त्यामुळे महापालिकेने एक तर त्यांना मुळापासून उखडून फेकावे किंवा झाडाच्या १० फुटावरून कापून टाकावे.
- डाॅ. विजय इलाेरकर, ॲग्राे फाॅरेस्ट्री विभागप्रमुख, डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी महाविद्यालय