नागपुरात क्रिकेट बुकींनी घेतला बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2018 10:55 PM2018-06-01T22:55:39+5:302018-06-01T22:55:52+5:30

आयपीएलवर लगवाडी-खयवाडी करणाऱ्या बुकींकडून उधारीच्या रकमेच्या वसुलीसाठी तगादा लावला गेल्याने एका वूडवूल व्यावसायिकाने गळफास लावून आत्महत्या केली. ताराचंद रामअवतार अग्रवाल (वय ५६) असे मृत व्यावसायिकाचे नाव असून ते न्यू नंदनवनमध्ये राहत होते.

Life taken by cricket bookies in Nagpur | नागपुरात क्रिकेट बुकींनी घेतला बळी

नागपुरात क्रिकेट बुकींनी घेतला बळी

Next
ठळक मुद्देलाखोंची रक्कम हरल्यानंतर बुकींचा तगादा : व्यावसायिकाने लावला गळफास

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आयपीएलवर लगवाडी-खयवाडी करणाऱ्या बुकींकडून उधारीच्या रकमेच्या वसुलीसाठी तगादा लावला गेल्याने एका वूडवूल व्यावसायिकाने गळफास लावून आत्महत्या केली. ताराचंद रामअवतार अग्रवाल (वय ५६) असे मृत व्यावसायिकाचे नाव असून ते न्यू नंदनवनमध्ये राहत होते.
अग्रवाल हे कॉटन मार्केटमध्ये वूडवूल विक्रीचा व्यवसाय करीत होते. त्यांच्या बाजूलाच चंदन खत्री ऊर्फ सोनी (रा. कपिलनगर, जरीपटका) याचेही दुकान आहे. त्यामुळे अग्रवाल आणि सोनीत मैत्री होती. सोनीचा कामठीतील रवी नामक मित्र लॉटरी सेंटरच्या नावाआड क्रिकेट बेटिंग करतो. बुकी रवी आणि सोनी या दोघांनी अग्रवाल यांना क्रिकेट सट्ट्याचे व्यसन लावले. आयपीएलच्या सिझनमध्ये अग्रवाल यांनी रवी तसेच सोनीच्या माध्यमातून क्रिकेटवर लाखोंचा सट्टा लावला. ते लाखोंची रक्कम हरले. त्यानंतर काही दिवस त्यांनी उधारित सट्टा लावला. त्यातही ते हरले. उधारीची चार ते पाच लाखांची रोकड मिळावी म्हणून आरोपी सोनी आणि रवीने अग्रवाल यांच्या मागे वसुलीसाठी तगादा लावला होता. फोनवरून ते धमकीही देत होते. त्यामुळे अग्रवाल यांची मानसिक अवस्था बिघडली. ते पाहून मुलांनी त्यांना विचारणा केली असता त्यांनी क्रिकेट सट्ट्यात रक्कम हरल्याचे सांगून आरोपींकडून होणारा त्रासही सांगितला. मुलाने त्यांना धीर दिला. या पार्श्वभूमीवर, २७ मे रोजी सकाळी अग्रवाल कुटुंबातील सदस्य बाहेर गेले. घरात कुणी नसल्याचे पाहून ताराचंद अग्रवाल यांनी गळफास लावून आत्महत्या केली. रात्री कुटुंबातील सदस्य परत आले तेव्हा त्यांना ताराचंद अग्रवाल गळफास लावलेल्या अवस्थेत दिसले. त्यांनी मृत्यूपूर्वी सुसाईड नोटही लिहून ठेवली होती. त्यात आत्महत्येचे सविस्तर कारण लिहिले होते. त्यावरून ताराचंद अग्रवाल यांचा मुलगा दीपक याने नंदनवन ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी चौकशीच्या नावाखाली प्रकरण रेंगाळत ठेवल्यानंतर गुरुवारी सोनी आणि रवीविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल केला. विशेष म्हणजे, गुन्हा दाखल केल्यानंतरही पोलिसांनी आरोपींची पूर्ण नावे आणि सविस्तर माहिती देण्यासाठी टाळाटाळ चालवली आहे.
सट्टेबाजीत अनेक उद्ध्वस्त
नागपुरात बुकींची बजबजपुरी झाली आहे. गल्लीबोळात क्रिकेट सट्ट्याची खयवाडी-लगवाडी केली जाते. हायटेक अड्ड्यांसोबत छोट्या छोट्या सदनिका आणि पानटपरीवर बसून छोटे बुकी क्रिकेटचे बेटिंग करतात. आॅनलाईन लॉटरी सेंटरच्या आडही क्रिकेट सट्ट्याची दुकानदारी चालवली जाते. ओळखीच्या ग्राहकाला खास करून व्यापारी, व्यावसायिकांना क्रिकेटची खयवाडी करणारे बुकी लाखोंची उधारी देतात. त्यानंतर उधारीसाठी त्यांचे घर, स्थावर मालमत्ता गुन्हेगारांमार्फत ताब्यात घेतात. जीवे मारण्याची, बदनामी करण्याची धमकी देतात. ताराचंद अग्रवाल यांच्या बाबतीत असेच झाले. मोठी रोकड हातून गेल्याने त्यांचा व्यवसाय उद्ध्वस्त झाला होता. त्यात पुन्हा चार ते पाच लाखांची रोकड मिळावी म्हणून बुकी त्यांना धमकावत होते. त्यामुळे अग्रवाल यांनी आत्महत्या केली.

 

Web Title: Life taken by cricket bookies in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.