उपराजधानीतील मेयो रुग्णालयातल्या रुग्णांना जीवाचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2020 11:47 AM2020-01-07T11:47:50+5:302020-01-07T11:49:35+5:30

इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेयो) काही इमारतीने शंभरी गाठली आहे. बांधकाम विभागाच्या सूचनेवरून व्हीएनआयटीने यातील काही इमारतींचे सर्वेक्षण करून इमारती धोकादायक असल्याचा अहवाल दिला आहे.

Life threat to patients at Mayo Hospital in Nagpur | उपराजधानीतील मेयो रुग्णालयातल्या रुग्णांना जीवाचा धोका

उपराजधानीतील मेयो रुग्णालयातल्या रुग्णांना जीवाचा धोका

Next
ठळक मुद्देधोक्याचा इशारा देऊनही इमारतीचा रुग्णसेवेत वापरव्हीएनआयटीने घोषित केल्या धोकादायक इमारतीअपघात झाल्यास जबाबदार कोण?

सुमेध वाघमारे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेयो) काही इमारतीने शंभरी गाठली आहे. बांधकाम विभागाच्या सूचनेवरून व्हीएनआयटीने यातील काही इमारतींचे सर्वेक्षण करून वॉर्ड क्र. ३, ४, ७ व ८ असलेल्या वॉर्डाच्या इमारती धोकादायक असल्याचा अहवाल दिला आहे. मात्र, त्यानंतरही या इमारतीतून रुग्णसेवा दिली जात आहे. धक्कादायक म्हणजे, वॉर्ड ३ आणि ७ बालरोग रुग्णांचा आहे. अपघात झाल्यास जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
विशेष म्हणजे, गेल्याच महिन्यात मेडिकल त्वचारोग विभागाच्या इमारतीचा अचानक सज्जा कोसळून दोघांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेला मेयोच्या धोकादायक इमारतीशी जोडून पाहिले जात आहे.
ब्रिटिशांनी ‘सिटी हॉस्पिटल’ या नावाने १८६२ मध्ये या हॉस्पिटलची स्थापना केली; नंतर महानगरपालिकेने धर्मादाय दवाखाना म्हणून चालवायला घेतले. १९६७ सालापासून राज्य सरकारकडे मेयोचे नियंत्रण आले. ३८.२६ एकरमध्ये पसरलेल्या या रुग्णालयात आजही पाचवर इमारतीचे वय शंभरी पुढे गेले आहे. यात १८८१ मध्ये बांधलेले आकस्मिक विभाग आजही रुग्णसेवेत कायम आहे. मागील वर्षी बांधकाम विभागाने रुग्णालयाच्या इमारतीचे ‘स्ट्रक्चरल आॅडिट’ हाती घेतले. यात ‘व्हीएनआयटी’ची मदत घेतली. अडीच महिन्यापूर्वीच त्याचा अहवाल प्राप्त झाला. यात ब्रिटिशकालीन इमारतीत असलेले वॉर्ड क्र. ३, ४, ७ व ८ धोकादायक स्थितीत असल्याचे नमूद केले. परंतु आजही या वॉर्डातून रुग्णसेवा सुरू आहे.
मेडिसीनच्या पडक्या इमारतीत वॉर्ड क्र.३ व ४
‘व्हीएनआयटी’ने वॉर्ड क्र. ३ व ४ असलेल्या ब्रिटिशकालीन इमारतीलाही धोकादायक घोषित केले आहे. हे दोन्ही वॉर्ड औषधवैद्यकशास्त्र विभागाचे (मेडिसीन) आहेत. या दोन्ही वॉर्डात खाटांच्या संख्येच्यावर रुग्ण भरती आहेत. याच इमारतीला जोडून वॉर्ड क्र. ५, ६ व २४ ची इमारत आहे. हा मेडिसीन विभागाचा महिलांचा वॉर्ड आहे. ब्रिटिशकालीन इमारतीला धोका झाल्यास जोडून असलेल्या या इमारतीलाही धोका होण्याची शक्यता आहे.
नव्या इमारतीच्या प्रस्तावाकडे दुर्लक्षच
मेयोने नव्या इमारतीसाठी गेल्या वर्षीच प्रस्ताव पाठविला. तीन लाख स्क्वेअर फूट जागेवरील या इमारतीत मेडिसीन, बालरोग, स्त्रीरोग व प्रसूती विभाग, अपघात विभाग, एमआयसीयू, पीआयसीयू, आयसीयू, चार शस्त्रक्रियागृह, लेबर रुम, रेडिओलॉजी विभाग प्रस्तावित आहे. तळमजल्यासह सहा मजल्याच्या या इमारतीच्या बांधकामासाठी बांधकाम विभागाने २६५ कोटींचा प्रस्ताव तयार केला होता. परंतु वैद्यकीय शिक्षण विभागाने हा खर्च खूप जास्त असल्याचे सांगून, कमी खर्चाचा प्रस्ताव पाठविण्याची सूचना केली होती. त्यानुसार एप्रिल २०१९ मध्ये एक मजला कमी करून सुमारे २०० कोटींचा प्रस्ताव पाठविला. हा प्रस्ताव वैद्यकीय शिक्षण विभागाकडून वित्त व नियोजन विभागाकडे पडून आहे.
बालरोग विभागाच्या वॉर्डाची इमारत धोक्यात
‘व्हीएनआयटी’च्या अहवालात ब्रिटिशकालीन इमारतीतील बालरोग विभागाचा वॉर्ड क्र. ७ व ८ हा धोकादायक स्थितीत असल्याचे म्हटले आहे. काही महिन्यांपूर्वी वॉर्ड क्र. ८ला गळती लागल्याने तो बंद करण्यात आला. परंतु वॉर्ड क्र. ७ अद्यापही सुरू आहे. महिनाभरापूर्वीच या वॉर्डाच्या स्लॅबचा काही भाग खाली पडला होता.

‘व्हीएनआयटी’ने वॉर्ड क्र ३, ४, ७ व ८ ची इमारत धोकादायक स्थितीत असल्याचा अहवाल दिला आहे. हे वॉर्ड इतर ठिकाणी स्थानांतरित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. काही वॉर्ड स्थानांतरित करण्यात आले आहेत. नवीन इमारतीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे.
-डॉ. अजय केवलिया, अधिष्ठाता, मेयो

Web Title: Life threat to patients at Mayo Hospital in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य