पुलाच्या मधाेमध जीवघेणे भगदाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:07 AM2021-07-10T04:07:28+5:302021-07-10T04:07:28+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क कुही : तालुक्यातील मांढळ-नवेगाव (देवी) मार्गावरील पुलावर मध्यभागी भगदाड पडले असून, त्याचा आकार दिवसेंदिवस वाढत आहे. ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
कुही : तालुक्यातील मांढळ-नवेगाव (देवी) मार्गावरील पुलावर मध्यभागी भगदाड पडले असून, त्याचा आकार दिवसेंदिवस वाढत आहे. हे भगदाड अपघाताच्या पथ्यावर पडत असून, पूल काेसळण्यास कारणीभूत ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.
तालुक्यात गुरुवारी (दि. ८) सकाळपासून संततधार पावसाला सुरुवात झाली हाेती. त्यामुळे राेडवरील खड्ड्यात पावसाचे पाणी साचल्याने नागरिकांना वाहने चालविताना अडचणींना ताेंड द्यावे लागत हाेते. मांढळ-नवेगाव (देवी) मार्गावर नाला असून, त्या नाल्यावर सिमेंट पायल्याच्या पुलाचे बांधकाम करण्यात आले आहे. यातील एका पायलीला छिद्र पडले असून, पुढे त्याचे रुपांतर भगदाडात झाले. शेतकरी याच पुलावरून शेतीची वहिवाट व शेतमालाची वाहतूकही करतात.
वाहनचालकांना हे भगदाड सहसा दिसत नसल्याने त्यातून वाहनाचे चाक गेल्यास एकीकडे वाहनाचे नुकसान तर दुसरीकडे अपघातात जखमी हाेण्याची अथवा जीव गमावण्याची शक्यता नाकारता येत नाही. गुरुवारी हा खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात तिघे त्यांच्या दुचाकी वाहनांसह त्या खड्ड्याजवळ काेसळल्याच्या घटनाही घडल्या. त्यामुळे संभाव्य धाेका टाळण्यासाठी या पुलाची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी ईश्वर वाघमारे, खुशाल ठवकर, मनोहर मोरघडे, प्रशांत ठवकर, अनिल बावणे, आनंद ठवकर यांच्यासह शेतकऱ्यांनी केली आहे.