अॅसिडमुळे जनजीवन धोक्यात
By admin | Published: November 17, 2014 12:58 AM2014-11-17T00:58:29+5:302014-11-17T00:58:29+5:30
बुटीबोरी औद्योगिक वसाहतीमधील टाकावू अॅसिडयुक्त रसायनांमुळे माणसे, जनावरे, शेती व पाण्याचे स्त्रोत धोक्यात असल्याचा दावा करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर
हायकोर्टात याचिका : बुटीबोरी औद्योगिक वसाहतीसंदर्भात केंद्र व राज्य शासनाला नोटीस
नागपूर : बुटीबोरी औद्योगिक वसाहतीमधील टाकावू अॅसिडयुक्त रसायनांमुळे माणसे, जनावरे, शेती व पाण्याचे स्त्रोत धोक्यात असल्याचा दावा करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आली आहे.
गणेश बोडखे असे याचिकाकर्त्याचे नाव असून बुटीबोरी येथे त्यांची शेती आहे. बुटीबोरी एमआयडीसी येथे अनेक रासायनिक उद्योग असून या उद्योगांतील अॅसिडयुक्त पाणी नजीकच्या वाठोडा नाल्यात सोडले जाते. रासायनिक घनकचरा मोकळ्या जागेवर फेकला जातो. वाठोडा नाला वेणा नदीला मिळतो.
यामुळे वेणा नदीचे पाणी दूषित झाले आहे. विहिरी व पाण्याचे अन्य स्त्रोतही प्रदूषित झाले आहेत. विषारी पाणी पिल्यामुळे माणसांना विविध गंभीर आजारांनी ग्रासले आहे. जनावरे मृत्युमुखी पडत आहेत. रासायनिक घनकचरा फेकला जातो ती जनावरे चारण्याची जमीन आहे. शेतीची उत्पादन क्षमता घटली आहे. अॅसिडमुळे पिके जळून जात आहेत. यासंदर्भात राज्य शासन व उद्योगांना अनेकदा पत्रे लिहिली, पण अद्याप काहीच उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत, असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे.
न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व विनय देशपांडे यांनी याप्रकरणी केंद्रीय पर्यावरण विभागाचे सचिव, राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाचे प्रधान सचिव, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, पोलीस अधीक्षक व बुटीबोरी पोलीस निरीक्षक यांना नोटीस बजावून १० डिसेंबरपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. याचिकाकर्त्यातर्फे अॅड. मनोज कारिया यांनी बाजू मांडली.(प्रतिनिधी)