-तर जीवच गेला असता !
By admin | Published: January 20, 2016 04:05 AM2016-01-20T04:05:49+5:302016-01-20T04:05:49+5:30
वेळ दुपारी २.३० वाजताची. बरेच वकील दुपारचे भोजन करून दुसऱ्या सत्रातील कामकाजासाठी कोर्टरूमकडे निघून गेले
नागपूर : वेळ दुपारी २.३० वाजताची. बरेच वकील दुपारचे भोजन करून दुसऱ्या सत्रातील कामकाजासाठी कोर्टरूमकडे निघून गेले होते. काही मोजकेच वकील, वकिलांचे अॅटर्नी व पक्षकार खोलीत उपस्थित होते. त्याचवेळी धाडकन आवाज झाल्यामुळे सर्वजण हादरून उभे झाले. खोलीतील क्युबिकल-४२ मध्ये लावलेला सिलिंग फॅन क्लिप तुटल्यामुळे खाली कोसळला होता. फॅनचे पाते डोक्याला लागल्यामुळे अॅटर्नी प्रज्ञेश मेश्राम किरकोळ जखमी झाले. परंतु फॅन डोक्यावर कोसळला असता तर नक्कीच कोणी तरी ठार झाले असते ही या घटनेची गंभीर बाजू आहे. या घटनेमुळे सर्वांचा थरकाप उडाला.
उच्च न्यायालयात रोज दोन सत्रात कामकाज होते. पहिले सत्र सकाळी १०.३० ते दुपारी १.३० पर्यंत तर, दुसरे सत्र दुपारी २.३० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत चालते. पहिले सत्र संपल्यानंतर एक तासाचा लंच ब्रेक असतो. दरम्यान, वकिलांच्या सर्व खोल्या भरगच्च भरलेल्या असतात. अॅटर्नी व पक्षकारही मोठ्या संख्येत उपस्थित असतात. या कालावधीत सिलिंग फॅन कोसळणे नक्कीच कोणाच्या तरी जीवावर बेतले असते. वकिलांच्या खोल्यांतील अनेक सिलिंग फॅन जुने झाले आहेत. त्यांची नियमित देखभाल केली जात नाही. यामुळे ही घटना घडल्याचे बोलले जात आहे. या घटनेनंतर अनेक वकिलांनी हायकोर्टातील अव्यवस्थेबद्दल नाराजी व्यक्त केली.(प्रतिनिधी)
संघटनेचे पदाधिकारी निष्क्रिय
४हायकोर्ट बार असोसिएशन नागपूरचे पदाधिकारी निष्क्रिय असल्याचा आरोप काही वकिलांनी नाव उघड न करण्याच्या अटीवर केला आहे. वकिलांकडून संघटना सदस्यता शुल्क वसूल करते. परंतु सदस्यांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देत नाही. संघटनेकडे तक्रार करूनही काहीच होत नाही असे वकिलांनी सांगून आजच्या घटनेमुळे जीवितहानी झाली असती तर संघटनेने भरपाई दिली असती काय, असा सवाल उपस्थित केला.
पीडब्ल्यूडीची जबाबदारी
उच्च न्यायालयातील सुविधांची देखभाल करणे सार्वजनिक बांधकाम विभागाची जबाबदारी आहे. पीडब्ल्यूडी अधिकारी छोटी छोटी कामे पूर्ण करण्यासाठी विलंब करतात. सिलिंग फॅन कोसळण्याची घटना प्रशासकीय न्यायमूर्ती, प्रशासकीय प्रबंधक व कोर्ट कीपर यांच्या निदर्शनास आणून देण्यात येईल. पुन्हा अशा घटना घडू नये यासाठी सर्व सिलिंग फॅनची तपासणी करण्याचे विचाराधीन आहे.
- अॅड. श्रद्धानंद भुतडा, सचिव, हायकोर्ट बार असोसिएशन नागपूर.