महामानवाच्या शाळा प्रवेश दिनाला उजाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2017 12:09 AM2017-11-07T00:09:33+5:302017-11-07T00:09:58+5:30
अस्पृश्यतेमुळे वर्गात बसू दिले जात नव्हते तरीही शिकण्याची जिद्द होती. त्यामुळे शाळेबाहेर बसून ते शिकले. ....
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :अस्पृश्यतेमुळे वर्गात बसू दिले जात नव्हते तरीही शिकण्याची जिद्द होती. त्यामुळे शाळेबाहेर बसून ते शिकले. खूप शिकले, स्वत: घडले, समाजाला घडविले आणि देशाला नवी दिशा दिली. ज्या भारतीय संविधानाचा आज सर्वात आदर्श संविधान म्हणून जगभर गौरव होत असतो त्या संविधानाचे शिल्पकार ठरले. अशा या महामानवाच्या शाळा प्रवेश दिनाच्या इतिहासाची आज राज्यभरातील शाळांमध्ये उजळणी होणार आहे. निमित्त आहे विद्यार्थी दिनाचे.
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पहिल्यांदा शाळेत प्रवेश केला तो दिवस म्हणजे ७ नोव्हेंबर. हा दिवस आंबेडकरी संघटनांच्यावतीने नेहमीप्रमाणे उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. शासनानेसुद्धा हा दिवस विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतल्याने, यंदा पहिल्यांदाच महामानवाचा शाळा प्रवेश दिन शासन व सामाजिक संघटनांच्यावतीने उत्साहात साजरा केला जाणार आहे. ७ नोव्हेंबर १९०० या दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रतापसिंग हायस्कूल, राजवाडा चौक जि. सातारा येथे शाळेत प्रवेश घेतला होता. त्यावेळी शाळेत भिवा म्हणून त्यांच्या नावाची नोंद करण्यात आली होती. या शाळेतील रजिस्टरमध्ये १९१४ या क्रमांकासमोर त्यांच्या नावाची नोंदणी व त्यासमोरील स्वाक्षरी ही ऐतिहासिक दस्तऐवज म्हणून आजही शाळा प्रशासनाने जपून ठेवले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळा प्रवेश दिन म्हणजे एका अर्थाने शैक्षणिक क्रांतीची आणि युगांतराची चाहूल म्हटली पाहिजे. कारण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे पाऊल शाळेत पडल्यामुळे ते स्वत: सुशिक्षित आणि प्रज्ञावंत झाले आणि करोडो दलितांचे-वंचितांचे उद्धारकर्तेही झाले.
इतकेच नव्हे तर परिणामत: भारतीय समाजात स्वातंत्र्य, समता, बंधूता व न्याय ही मानवी मूल्ये रुजू शकल्या गेली म्हणूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा शाळा प्रवेश दिन ही अत्यंत महत्त्वाची आणि इतिहासाला कूस बदलवण्यास लावणारी क्रांतिकारी घटना ठरते.
हा दिवस विद्यार्थी दिन म्हणून साजरा करण्याचे शासनाने ठरविले आहे. शासनाने जारी केलेल्या अध्यादेशानुसार ७ नोव्हेंबर रोजी राज्यातील सर्व शाळांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित विविध पैलूंवर निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, काव्यवाचन इत्यादी उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. एकूणच सर्व शाळांमधून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या शालेय जीवनावर प्रकाश टाकण्यात येणार आहे.
संविधानाचे वाचन व पाठांतर स्पर्धा
महाराष्ट्र आॅफिसर्स फोरम व मैत्रिणी या संघटनांच्यावतीने ७ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता निर्मल उच्च प्राथमिक शाळा व माध्यमिक हायस्कूल गुलमोहरनगर कळमना येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर शाळा प्रवेश दिन साजरा करण्यात येणार आहे. यावेळी तत्कालीन शाळा प्रवेश, आजची निकड व नियोजन या विषयावर मार्गदर्शन केले जाईल तसेच संविधानाचे वाचन व संविधान पाठांतर स्पर्धा होईल.