नागपुरात आता ट्रॅफिक सिग्नल्सवर लागेल निळा दिवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2019 10:05 AM2019-01-16T10:05:13+5:302019-01-16T10:06:48+5:30
शहरातील ट्रॉफिक सिग्नल्सवर आता लाल, पिवळ्या व हिरव्या दिव्यासोबत निळा दिवा लावण्यात येणार आहे. निळा दिवा सुरू होताच सर्व वाहने बंद करावी लागणार आहेत. यासंदर्भातील प्रस्ताव महापालिकेच्या विचाराधीन असून त्याला लवकरच मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.
रिता हाडके ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरातील ट्रॉफिक सिग्नल्सवर आता लाल, पिवळ्या व हिरव्या दिव्यासोबत निळा दिवा लावण्यात येणार आहे. निळा दिवा सुरू होताच सर्व वाहने बंद करावी लागणार आहेत. यासंदर्भातील प्रस्ताव महापालिकेच्या विचाराधीन असून त्याला लवकरच मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.
ट्राफिक सिग्नलवर लाल दिवा वाहतूक थांबविण्यासाठी तर, हिरवा दिवा वाहतूक सुरू करण्यासाठी वापरला जातो. पिवळा दिवा क्रॉसवॉकपूर्वी सुरक्षित थांबण्याचे व शक्य असल्यास सावधानीपूर्वक पुढे जाण्याचे संकेत देतो. निळा दिवा वाहने बंद करण्याचे संकेत देणार आहे. लाल दिवा सुरू होताच काही सेकंदानंतर निळा दिवा सुरू होईल. दरम्यान, वाहन चालकांना काही वेळाकरिता वाहने बंद ठेवावे लागतील. त्यामुळे पेट्रोलची बचत व पर्यावरणाचे प्रदूषणापासून संरक्षण होईल. वाहतूक विभागाने निळ्या दिव्याचा प्रस्ताव गत आॅक्टोबरमध्ये महापालिकेला सादर केला. प्रस्ताव मंजूर होताच ट्रॅफिक सिग्नल्सवर निळे दिवे लावले जातील.
पर्यावरणाचे संरक्षण होईल
निळा दिवा सुरू होताच वाहने बंद ठेवावी लागणार आहेत. त्यामुळे प्रदूषण होणार नाही. त्यातून पर्यावरणाचे संरक्षण होईल. सध्या लाल दिवा सुरू झाल्यानंतर वाहतूक थांबते, पण वाहने बंद केली जात नाहीत. त्यामुळे विनाकारण प्रदूषण होते व पेट्रोलचेही नुकसान होते.
निळा दिवा आवश्यक
पर्यावरण संरक्षण व इंधन बचतीसाठी ट्रॅफिक सिग्नल्सवर निळा दिवा लावणे आवश्यक आहे. त्यामुळे महापालिकेला प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. प्रस्ताव मंजूर होताच ट्रॅफिक सिग्नल्सवर निळे दिवे लावले जातील.
- राजतिलक रोशन,
उपायुक्त, वाहतूक विभाग, नागपूर.