रात्री ९ नंतर येते लाईट, ओलितापेक्षा कोरडवाहूच फिट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2022 08:00 AM2022-01-21T08:00:00+5:302022-01-21T08:00:09+5:30

Nagpur News लोकप्रतिनिधी, अधिकारी जेव्हा गाढ झोपेत असतात तेव्हा जिल्हाभरातील शेतकरी मात्र कडाक्याच्या थंडीत शेताचे सिंचन करण्यासाठी धडपडत असतात. महावितरणचे हे कुटील धोरण शेतकऱ्यांच्या जीवावर उठले आहे.

Light comes after 9 pm, farmers in trouble! | रात्री ९ नंतर येते लाईट, ओलितापेक्षा कोरडवाहूच फिट!

रात्री ९ नंतर येते लाईट, ओलितापेक्षा कोरडवाहूच फिट!

googlenewsNext
ठळक मुद्देमध्यरात्री शेताचे सिंचन सारेच झोपतात, शेतकरी जागतात

शरद मिरे

नागपूर : दिवसभर शेतात राबायचे आणि रात्रभर सिंचनासाठी जागायचे, असा दिनक्रम जिल्हाभरातील शेतकऱ्यांच्या नशिबी आला आहे. कारण ऊर्जामंत्र्यांच्या गृहजिल्ह्यात महावितरणने कृषिपंपासाठी रात्रीचा विद्युत पुरवठा सुरू केला आहे. लोकप्रतिनिधी, अधिकारी जेव्हा गाढ झोपेत असतात तेव्हा जिल्हाभरातील शेतकरी मात्र कडाक्याच्या थंडीत शेताचे सिंचन करण्यासाठी धडपडत असतात. महावितरणचे हे कुटील धोरण शेतकऱ्यांच्या जीवावर उठले आहे.

हिवाळा लागला आणि कडाक्याची थंडी पडली की महावितरण कंपनी कृषिपंपासाठी थ्री पेज विद्युत पुरवठ्याचे वेळापत्रक शेतकऱ्यांवर लादते. त्यातही थ्री फेज विद्युत पुरवठा रात्रीच्या सुमारास केला जातो. निवेदन, मोर्चा आणि आंदोलनात्मक भाषेची ठिणगी कानावर पडताच, मग वेळापत्रकात थोडासा बदल करण्यात येतो. यावर्षीसुद्धा असाच काहीसा प्रताप महावितरणने केला आहे. वृत्तपत्रात बातम्या उमटताच कृषिपंपांना केवळ महिनाभर दिवसा विद्युत पुरवठा करण्यात आला. आता मात्र परिस्थिती पुन्हा जैसे थे झाली आहे. मंगळवार व बुधवारी रात्री ८.४० ते पहाटे ४.४० यावेळेस कृषिपंपांना थ्री फेज विद्युत पुरवठा केला जात आहे.

वास्तविक पाहता शेतकरीबांधव सकाळीच शेतात निघून जातात. दिवसभर शेतात घाम गाळल्यानंतर सायंकाळी ६ ते ७ वाजेपर्यंत घराकडे परततात. लागलीच जनावरांचा चारापाणी केल्यानंतर स्वत: दोन घास पोटात टाकतात. मात्र महावितरणच्या धोरणाने शेतकऱ्यांची आता झोपही उडविली आहे. दिवसभर शेतात राबल्यानंतर ओलितासाठी पुन्हा रात्रभर जागण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

रात्रीची वेळ शेतकऱ्यांसाठी कर्दनकाळ

रात्री ८.४० ते पहाटे ४.४० वाजतापर्यंत कृषिपंपांना थ्री पेज विद्युत पुरवठा करण्यात येतो. त्यामुळे शेतकऱ्यांना ओलितासाठी रात्रभर शेतात जागावे आणि राबावे लागते. महत्त्वाचे म्हणजे उमरेड, भिवापूर, कुही तालुक्याचा बहुतांश भाग हा जंगलव्याप्त आहे. उमरेड-कऱ्हांडला अभायरण्याने वेढा घातलेला आहे. त्यामुळे वाघ, बिबट यासह अन्य वन्य हिंस्र श्वापदांचा शेतशिवारात रात्रभर मुक्तसंचार असतो. ओलितासाठी शेतात गेलेल्या शेतकऱ्यांवर हे वन्यप्राणी कधी हल्ला करेल, याचा नेम नाही.

-

Web Title: Light comes after 9 pm, farmers in trouble!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती