विदर्भात पुढचे ५ दिवस हलका व मध्यम पाऊस; गुरुवारी नागपुरात सर्वाधिक ३४ मि.मी. नाेंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 08:36 PM2021-09-23T20:36:28+5:302021-09-23T20:37:07+5:30
Nagpur News विदर्भासह महाराष्ट्रात बहुतेक ठिकाणी पावसाची मेहरबानी कायम आहे. गुरुवारी नागपूरसह विदर्भातील काही जिल्ह्यात चांगला पाऊस झाला. नागपूर जिल्ह्यात सर्वाधिक ३४ मिमी पावसाची नाेंद झाली.
नागपूर : विदर्भासह महाराष्ट्रात बहुतेक ठिकाणी पावसाची मेहरबानी कायम आहे. गुरुवारी नागपूरसह विदर्भातील काही जिल्ह्यात चांगला पाऊस झाला. नागपूर जिल्ह्यात सर्वाधिक ३४ मिमी पावसाची नाेंद झाली. विशेष म्हणजे पुढचे ५ दिवस विदर्भातील सर्व जिल्ह्यात हलका व मध्यम स्वरूपाचा पाऊस हाेण्याची शक्यता वेधशाळेने वर्तविली आहे.
गुरुवारी विदर्भातील काही जिल्ह्यात पावसाची नाेंद झाली. सर्वाधिक पाऊस नागपूरमध्ये झाला. जिल्ह्यात २४ तासात ३९.६ मिमी पावसाची नाेंद झाली. याशिवाय अकाेलामध्ये १९ मिमी पावसाची नाेंद करण्यात आली. जिल्ह्यात सकाळपर्यंत १७.४ मिमी पाऊस झाला. अमरावती जिल्ह्यात सकाळपर्यंत ६ मिमी पाऊस झाला पण दिवसभर उघाड हाेता. चंद्रपूर जिल्ह्यात बुधवारपर्यंत उघाड हाेता, पण गुरुवारी पावसाने धडक दिली. येथे हलका पाऊस झाला व ७ मिमीची नाेंद करण्यात आली. वाशिम जिल्ह्यातही २४ तासात ३२ मिमी पाऊस नाेंदविला गेला.
दक्षिण छत्तीसगड व आसपासच्या भागात समुद्र सपाटीपासून ५.८ किमीवर सायक्लाेनिक सर्क्युलेशन तयार झाले आहे. हे वातावरण दक्षिण पूर्वेकडून बंगालच्या उपसागराकडे सरकत आहे. याशिवाय दक्षिण-पश्चिम राजस्थान आणि आसपासच्या भागातही सायक्लाेनिक सर्क्युलेशन तयार झाले आहे. पुढचे ४८ तास हे वातावरण कायम राहणार आहे. यामुळे विदर्भ, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे पुढचे पाच दिवस चांगला पाऊस हाेईल. नागपूरसह वर्धा, अकाेला, अमरावती, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ येथे शुक्रवारी २४ राेजी विजांच्या कडकडाटासह पाऊस हाेण्याची शक्यता आहे. २५ व २६ सप्टेंबरला सर्व जिल्ह्यात काही ठिकाणी हलका पाऊस हाेण्याचा अंदाज आहे. मात्र २७ सप्टेंबरला पुन्हा पावसाचा जाेर वाढणार असून सर्वत्र ढगांच्या गडगडाटासह जाेरदार पाऊस हाेण्याचा अंदाज हवामान विभागाने नाेंदविला आहे.