पुढचे २४ तास नागपुरात हलक्या पावसाचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2020 04:25 AM2020-12-14T04:25:59+5:302020-12-14T04:25:59+5:30
नागपूर : वातावरण बदलताच नागपुरातील पारा घसरला आहे. रविवारी सकाळपासून निर्माण झालेले हे वातावरण सोमवारपर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे. ...
नागपूर : वातावरण बदलताच नागपुरातील पारा घसरला आहे. रविवारी सकाळपासून निर्माण झालेले हे वातावरण सोमवारपर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे. पुढील २४ तासात हलक्या स्वरूपाचा पाऊसही काही ठिकाणी येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
रविवारी सकाळपासूनच वातावरण बदललेले जाणवले. रविवारी दिवसभर आकाशात ढग होते. त्यामुळे दिवसाचे तापमान १.७ अंश सेल्सिअसने घटून २८.३ पर्यंत घसरले. शनिवारी रात्री उशिरापासून तर रविवारी शहरात काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस आला. यामुळे आर्द्रता घटली. सकाळी ८.३० वाजता ती ७७ टक्के होती, तर सायंकाळी ५.३० वाजता त्यात घट होऊन ६३ टक्के झाली.
हवामान विभागाच्या मते, दक्षिण-पूर्व मध्य प्रदेशात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. बंगालच्या खाडीतही दक्षिण-पूर्व भागामध्ये असाच पट्टा तयार झाला आहे. यामुळे ढग तयार होऊन पावसाची शक्यता काही भागात वाढली आहे. मध्य भारतामध्ये येत्या दोन दिवसामध्ये ढगाळ वातावरण आणि हलक्या स्वरूपाचा पाऊस येण्याची शक्यता आहे.
उत्तर भारतामध्ये बर्फवृष्टी सुरू झाली आहे. परंतु हवेचा मार्ग उत्तर-पूर्व असल्याने पाऱ्यात म्हणावी तेवढी घट झालेली नाही. परंतु हवेचा मार्ग उत्तरेकडून दक्षिणेकडे होताच पारा पुन्हा घटण्याची शक्यता आहे.
नागपुरात रविवारी सकाळी आकाशात दाट ढग दाटलेले होते. यामुळे दोन दिवसपर्यंत तापमान सामान्यापेक्षा १ अंशाने खालावलेले राहील. ढगामुळे रात्रीच्या तापमानात वाढ राहील. रविवारी किमान तापमान सामान्यापेक्षा ७ अंशाने अधिक म्हणजे १९.५ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. विदर्भात चंद्रपूरचे तापमान १४ अंश सेल्सिअस नोंदविले गेले, ते सर्वात कमी होते.
...
ढगाळ वातावरण आणि पाऊस
रविवारी सकाळी अवकाशात दाट ढग दाटलेले होते. त्यामुळे हवेत गारवा होता. काही ठिकाणी पाऊसही झाल्यामुळे वातावरण मोहक झाले होते. त्यामुळे हौशी तरुणाई उत्साहाने घराबाहेर पडलेली दिसली. फुटाळा, अंबाझरी तलाव परिसरात तरुणाईची लगबग जाणवली.