पंतप्रधानांच्या नागपूर दाैऱ्यावर पावसाचे सावट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2022 09:18 PM2022-12-07T21:18:19+5:302022-12-07T21:19:20+5:30
Nagpur News पुढच्या दाेन दिवसांनंतर नागपूरसह विदर्भात तुरळक पाऊस येण्याची शक्यता आहे. १०, ११ व १२ डिसेंबरला हलका पाऊस हाेण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
नागपूर : पुढच्या दाेन दिवसांनंतर नागपूरसह विदर्भात तुरळक पाऊस येण्याची शक्यता आहे. १०, ११ व १२ डिसेंबरला हलका पाऊस हाेण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे ११ डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र माेदी एका कार्यक्रमासाठी नागपूरला येणार आहेत.
नागपूर हवामान केंद्राचे प्रमुख एम. एल. साहू यांनी सांगितले, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. ही स्थिती चक्रीवादळात रूपांतरित हाेईल आणि हे वादळ ९ व १० डिसेंबरला तामिळनाडूकडे वळेल. महाराष्ट्राचा काही भाग या वादळाच्या प्रभावात येण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे विदर्भावर याचा प्रभाव जाणवणार नसल्याचे सांगण्यात येत हाेते; पण स्थिती बदलण्याची शक्यता आहे. यामुळे १०, ११ व १२ डिसेंबरला नागपूरसह विदर्भात अनेक भागांत तुरळक पाऊस हाेण्याची शक्यता असून आकाश ढगांनी व्यापलेले असेल. ढगाळ वातावरणामुळे पाच दिवस थंडीचा प्रभाव कमी राहणार असून १३ डिसेंबरनंतर थंडीचा जाेर वाढण्याची शक्यता विभागाने व्यक्त केली आहे.
दरम्यान बुधवारी नागपूरचे किमान तापमान २४ तासात १.५ अंशाने वाढून १६.७ अंशांवर पाेहोचले. हे तापमान सरासरीपेक्षा ३.६ अंश अधिक आहे. सध्याच्या काही दिवसांत रात्रीच्या तापमानात ४ अंशापर्यंत वाढ हाेण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. विभागाने दिवसाचा पारा वाढण्याचा अंदाज व्यक्त केला असला तरी त्यात बुधवारी २.५ अंशाची घट झाली असून २७.९ अंश नाेंद करण्यात आली. कमाल तापमानात सर्वाधिक ३.६ अंशांची घट चंद्रपूरमध्ये झाली असून पारा २६.८ अंशांवर घसरला. गडचिराेली आणि गाेंदिया वगळता इतर सर्व जिल्ह्यात रात्रीचे तापमान मात्र वाढले आहे.