विदर्भात पावसाच्या हलक्या सरी; वातावरणात गारवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 10:02 AM2018-03-16T10:02:08+5:302018-03-16T10:02:17+5:30
विदर्भात नागपूर, भंडारा, चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा यासह अन्यत्र गुरुवारी मध्यरात्रीपासून पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी कोसळल्या. शुक्रवारी सकाळपर्यंत काही ठिकाणी हा वर्षाव सुरू होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: विदर्भात नागपूर, भंडारा, चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा यासह अन्यत्र गुरुवारी मध्यरात्रीपासून पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी कोसळल्या. शुक्रवारी सकाळपर्यंत काही ठिकाणी हा वर्षाव सुरू होता. गेल्या आठवडाभरापासून वाढत असलेले तापमान या अल्पवृष्टीमुळे खाली आले असून, वातावरणात गारवा वाढला आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील बाभूळगाव येथे मध्यरात्रीपासूनच जोरात पाऊस सुरू झाला होता. नागपुरातही पहाटेपासूनच हलकी वृष्टी सुरू झाली होती. त्यामुळे हवेत गारठा जाणवत होता. चंद्रपूर जिल्ह्यात नागभीड, कोरपना, सिंदेवाही तालुक्यात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. बऱ्याच ठिकाणी सकाळपासून ढगाळ वातावरणामुळे सूर्याचे दर्शन झाले नाही. वर्धा जिल्ह्यातही सर्वत्र हलका पाऊस पहाटेपासून सुरू होता.
या पावसामुळे हरभरा व गव्हाच्या पिकाला फटका बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे. हरभºयाचा दाणा या पावसापायी काळा पडून गळून पडण्याची शक्यता असते. तसेच जो कापूस अजूनही काढलेला नाही त्याची प्रत घसरून नुकसान होण्याची शक्यता आहे. आंब्याच्या मोहोरावरही या पावसाचा विपरित परिणाम होऊ शकतो अशी शक्यता वर्तविली जात आहे.