गड्डीगाेदाम आरयूबीवरून आजपासून हलक्या वाहनांची वाहतूक सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:08 AM2021-06-01T04:08:09+5:302021-06-01T04:08:09+5:30
नागपूर : मध्य रेल्वेने नागपूर मंडळांतर्गत गोधनी आणि नागपूर रेल्वे स्टेशनदरम्यान असलेल्या कामठी राेड गुरुद्वाराजवळील गड्डीगाेदाम रेल्वे अंडर ब्रिज ...
नागपूर : मध्य रेल्वेने नागपूर मंडळांतर्गत गोधनी आणि नागपूर रेल्वे स्टेशनदरम्यान असलेल्या कामठी राेड गुरुद्वाराजवळील गड्डीगाेदाम रेल्वे अंडर ब्रिज वाहतुकीसाठी खुला करण्याचा निर्णय घेतला आहे.
यापूर्वी येथे जुना लोखंडी गर्डरचा पूल होता. त्याची कालमर्यादा आणि परिस्थिती लक्षात घेऊन तोडण्यात आला होता. नंतर असलेल्या सबस्ट्रक्चरला अधिक मजबूत करण्यासाठी ॲब्यूमेंट्स आणि विंग भिंतींचे जॅकेटिंगही केले होते. यासाठी सुरक्षेच्या दृष्टीने ऑक्टोबर २०२० मध्ये या पुलाखालून होणारी वाहतूक थांबविण्यात आली होती. लॉकडाऊन काळात मध्य रेल्वेच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी पाहणी केल्यावर आवश्यक त्या परवानग्या मिळवल्या. कोरोना प्रोटोकॉल पाळून काम पूर्ण केले. यामुळे आता १ जूनपासून गड्डीगाेदाम आरयूबीवरून फक्त हलक्या वजनाची वाहने नेता येतील. अवजड वाहनांना परवानगी नाही. या वाहनांना पर्यायी मार्ग म्हणून मंगळवारी फ्लायओव्हर पुलाचा उपयोग करता येणार आहे. हा अंडर ब्रिज मोकळा झाल्याने कामठीकडे जाणाऱ्या नागरिकांची सुविधा झाली आहे.