विदर्भात विजांचा कडकडाट; सहा जण ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2022 08:37 PM2022-06-21T20:37:43+5:302022-06-21T20:39:04+5:30

Nagpur News मंगळवारी पुन्हा विदर्भाच्या वेगवेगळ्या भागात वीज काेसळून सात जणांचा मृत्यू झाला. त्यात पाच महिलांचा समावेश आहे.

Lightning strikes in Vidarbha; Six killed | विदर्भात विजांचा कडकडाट; सहा जण ठार

विदर्भात विजांचा कडकडाट; सहा जण ठार

googlenewsNext
ठळक मुद्देपाच महिलांचा समावेशउमरेड, वडसा, चिमूर, चंद्रपूर, चिमूरमधील घटना

नागपूर : विदर्भात विजांचा कडकडाट गेल्या काही दिवसांपासून वाढला. त्यातच मंगळवारी पुन्हा विदर्भाच्या वेगवेगळ्या भागात वीज काेसळून सात जणांचा मृत्यू झाला. त्यात पाच महिलांचा समावेश आहे. विदर्भातील उमरेड (नागपूर), वडसा (गडचिराेली), वणी (यवतमाळ), चिमूर (चंद्रपूर) येथे या घटना घडल्या. तर चंद्रपूर तालुक्यातील वरवट येथे वीज कोसळून आईसह दाेन मुलींचा मृत्यू झाला.

वीज काेसळून महिलेचा मृत्यू; दोघी जखमी

उमरेड : तालुक्यातील कळमना शिवारात (धामणगाव रिठी) मंगळवारी (दि. २१) दुपारी ३ वाजताच्या सुमारास शेतात वीज काेसळल्याने एका महिलेचा होरपळून मृत्यू झाला. तर अन्य दोघी जखमी झाल्या. उषा वीरेंद्र मांढळकर (४८, रा. इतवारी पेठ, उमरेड) असे मृत महिलेचे असून, रेणुका विलास हत्तीमारे (३५, रा. मंगळवारी पेठ, उमरेड) व सुहानी राजू भट (२६, रा. कावरापेठ, उमरेड) अशी जखमी महिलांची नावे आहेत.

मंगळवारी सकाळच्या सुमारास कळमना शिवारात धामणगाव (रिठी) येथील बाळाजी मांडवकर (रा. खुर्सापार, उमरेड) यांच्या शेतात एकूण १३ शेतमजूर महिला कामाला होत्या. शेतात कपाशीची लागवड सुरू असताना अचानक जोरदार मेघगर्जनेसह पाऊस बरसला. लागलीच महिलांनी शेतातील लिंबाच्या झाडाचा आडोसा घेतला. क्षणार्धात शेतात वीज कोसळल्याने तीन महिला बेशुद्ध पडल्या. यामध्ये उषा मांढळकर हिचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य दोन महिला जखमी झाल्या. तिन्ही महिलांना उमरेडच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी उषा मांढळकर हिला मृत घोषित केले. तर सोमवारी (दि. २०) दुपारी ३ वाजताच्या सुमारास तारणा फाटा परिसरात एका शेतात वीज कोसळल्याने चार महिला किरकोळ जखमी झाल्या. अर्चना सुरेश तांबे (४०), वनिता वासुदेव मरकवाडे (३८), ज्योत्स्ना राजकुमार गायगवळी (४१) आणि लता ताराचंद गायकवाड (४०, सर्व रा. उमरेड) अशी जखमी महिलांची नावे आहेत. प्राथमिक औषधोपचारानंतर चारही महिलांना सुटी देण्यात आली.

महिला ठार

चिमूर (चंद्रपूर) : शेतात काम करीत असताना अचानक वीज कोसळून एका महिलेचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास चिमूर तालुक्यातील उसेगाव शिवारात घडली. शशिकला तिरदास चांभारे (३५) असे मृत महिलेचे नाव आहे. शशिकला या शेतात काम करीत असताना अचानक पावसाला सुरुवात झाली. तसेच विजांचा कडकडाट होऊन त्यांच्या अंगावर वीज कोसळली. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. अधिक तपास पोलीस करीत आहेत.

१५ वर्षीय मुलगा ठार

देसाईगंज (गडचिरोली) : वीज पडून १५ वर्षीय मुलगा ठार झाल्याची घटना जुनी वडसाच्या सुभाषनगर वाॅर्डमध्ये दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास घडली. हिमांशू गजेंद्र कुथे असे मृताचे नाव आहे. दुपारी तीन वाजताच्या सुमारास आकाशात ढग दाटून आले. त्यामुळे आईने घराच्या छतावर वाळायला टाकलेले कपडे काढून घेण्यास हिमांशूला सांगितले. त्याच्यासह त्याची भावंडेही कपडे काढायला गेली. कपडे घेऊन ही मुले खाली उतरत असताना वीज कडाडून त्यांच्या घरावर कोसळली. या वेळी हिमांशू याच्या कमरेपासून खालचा भाग जळाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला; तर त्याच्या लहान भावालाही किरकोळ धग लागली. हिमांशू हा नवव्या वर्गात शिकत होता.

Web Title: Lightning strikes in Vidarbha; Six killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस