माहिती न देताच बत्ती गुल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:10 AM2021-08-24T04:10:54+5:302021-08-24T04:10:54+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मेंटेनन्ससाठी किंवा कुठल्याही तांत्रिक कारणामुळे वीज बंद होत असेल तर त्याची लगेच ग्राहकांना ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मेंटेनन्ससाठी किंवा कुठल्याही तांत्रिक कारणामुळे वीज बंद होत असेल तर त्याची लगेच ग्राहकांना एसएमएसद्वारे माहिती दिली जात असल्याचे महावितरणतर्फे सांगितले जाते. परंतु, वस्तुस्थिती वेगळीच आहे. वीज बंद होत आहे, मात्र त्याची कुठलीही माहिती दिली जात नाही. त्यामुळे महावितरणची एसएमएस सेवा ही केवळ कागदावरच शिल्लक असल्याचे दिसून येते.
महावितरणतर्फे बुधवारी मेंटेनन्ससाठी वीज पुरवठा बंद केला जातो. याबाबतची माहिती ग्राहकांना आधीच एसएमएसच्या माध्यमातून दिली जात असल्याचा दावा महावितरणचे अधिकारी करतात. परंतु, लोक या दाव्याशी सहमत नाही. त्यांचे म्हणणे आहे की, वीज जाणार असल्याची माहिती अगोदर मिळतच नाही. केवळ विजेचे बिलसंदर्भातच एसएमएस येतात. मेंटेनन्समुळे वीज बंद केली जात असल्याची माहिती कधीच मिळत नाही. बुधवारी वीज जाईल हे नागरिक गृहीत धरूनच असतात. ही शहरातील परिस्थिती आहे. ग्रामीण भागातील परिस्थिती तर याहून भयावह आहे. तेथील नागरिकांचे म्हणणे आहे की, त्यांना विजेसंदर्भात कुठलीच माहिती एसएमएसद्वारे मिळत नाही.
बॉक्स
- नोंदणीकृत मोबाईल नंबरवरच पाठविले जाते एसएमएस
महावितरणचे म्हणणे आहे की, प्रत्येक ग्राहकांना एसएमएसद्वारे माहिती पाठवली जाते. यासाठी त्या ग्राहकाचा नंबर नोंदणीकृत असणे आवश्यक आहे. कित्येक ग्राहकांनी चुकीचा नंबर देऊन ठेवला आहे, तर काहींचे नंबर बदलले पण ते त्यांनी अपडेट केले नाही. कंपनीकडे उपलब्ध असलेल्या नंबरवर एसएमएस बरोबर पाठविला जात आहे.