रामजन्माला घरोघरी उजळल्या पणती; दिव्यांची आरास करून श्रीरामनवमी केली साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2020 08:44 PM2020-04-02T20:44:59+5:302020-04-02T20:46:08+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : ऐरवी संध्याकाळी नागपुरात श्रीरामजन्मोत्सव शोभायात्रेत सहभागी होण्याची लगबग असते. यंदा मात्र कोरोना संसर्गाच्या धास्तीने ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ऐरवी संध्याकाळी नागपुरात श्रीरामजन्मोत्सव शोभायात्रेत सहभागी होण्याची लगबग असते. यंदा मात्र कोरोना संसर्गाच्या धास्तीने आणि संक्रमण टाळण्याच्या सजगतेने भक्तांनी शोभायात्रेचा मोह टाळला. शोभायात्रा आयोजकांनीही हिच सजगता बाळगत शहराच्या सर्वात मोठ्या उत्सवाला स्थगिती दिली. मात्र, आपल्या प्रिय देवतेच्या जन्माचा आनंद सोहळा साजरा न करतील ते भक्त कसले. दुपारच्या रामन्मोत्सवाला शांत असणाऱ्या नागपूरकरांनी संध्याकाळ हजारो दिव्यांनी उजळून टाकली. रामन्मोत्सवाचा आनंद साजरा करण्यासाठी घरोघरी पणत्यांची आरास सजवली गेली. जणू श्रीरामनवमीला दिवाळीच साजरी झाल्याची अनुभूती होत होती.
विशेष म्हणजे, सध्या संपूर्ण देश कोरोना विषाणूच्या संसर्गाला एकमुखाने, एकसंघतेने लढा देत आहे. इतर कुठल्याही संकटापेक्षा कोरोना नावाचे संकट अत्यंत वेगळे आहे. त्या संकटाचा सामना करण्यासाठी देशभरात लॉकडाऊन, संचारबंदी, नाकेबंदी करण्यात आली आहे. उत्सवप्रिय भारतात सगळ्या उत्सवांच्या आयोजनांना स्थगिती देण्यात आली आहे. अशा काळात कोरोना नावाच्या महाभयंकर संकटाला घालवून लावण्यासाठी सर्वच यंत्रणा आपापल्या तयारीने सज्ज आहेत. या संसर्गाची भिती घालविण्यासाठी आणि सरकारी दिशानिर्देशांचे पालन करण्यासाठी काही सामाजिक व धार्मिक संघटना नागरिकांमध्ये ऊर्जा भरण्याचे कार्य अभियानस्वरूपात करत आहेत. त्याच अभियानाचा एक टप्पा म्हणजे श्रीरामनवमीला संध्याकाळी प्रत्येक घरी नऊ दिवे आपल्या द्वारावर लावण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्या आवाहनाला नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला आणि सूर्यास्त होताच शुभंकरोतीच्या समयी गृहिणींनी द्वारावर नऊ दिव्यांची आरास सजवली. हळदी-कुंकूने औंक्षण केले आणि या महाभयंकर संकटापासून सोडविण्याची प्रार्थना संध्यादेवतेकडे करण्यात आली. शहराच्या कानाकोपºयात अशा पद्धतीने घरोघरी पणती उजळल्या. पणती उजळण्याच्या या अभियानाने नागपुरात गुरुवारी दिवाळीच साजरी झाल्याचा अनुभव प्राप्त होत होता.
.................