मुंबई, दिल्लीप्रमाणे नागपूरचीही हवा विषारीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2022 08:00 AM2022-12-08T08:00:00+5:302022-12-08T08:00:02+5:30

Nagpur News डिसेंबरचा महिना नागपूरकरांसाठी गंभीर धाेक्याचा इशारा घेऊन आला आहे. नाेव्हेंबरमध्ये २४ दिवस प्रदूषित असलेली हवा डिसेंबरमध्ये आणखी खालावली आहे.

Like Mumbai, Delhi, the air of Nagpur is poisonous | मुंबई, दिल्लीप्रमाणे नागपूरचीही हवा विषारीच

मुंबई, दिल्लीप्रमाणे नागपूरचीही हवा विषारीच

googlenewsNext
ठळक मुद्देडिसेंबरचे पाच दिवस हवा गुणवत्ता निर्देशांक ३०० पार

निशांत वानखेडे

नागपूर : डिसेंबरचा महिना नागपूरकरांसाठी गंभीर धाेक्याचा इशारा घेऊन आला आहे. नाेव्हेंबरमध्ये २४ दिवस प्रदूषित असलेली हवा डिसेंबरमध्ये आणखी खालावली आहे. डिसेंबरच्या पहिल्या पाच दिवसात हवेचा गुणवत्ता निर्देशांक ३०० च्यावर पाेहचला आहे. देशात सर्वात प्रदूषित असलेल्या दिल्ली शहराएवढे हे प्रदूषण आहे.

तापमानात झालेली घट, मंदावलेला वाऱ्याचा वेग आणि दवबिंदूमध्ये मिसळणारे धूलिकण यामुळे प्रदूषणात वाढ हाेत आहे. दुसरीकडे शहराजवळ असलेले वीज केंद्र, वाहनांचे प्रदूषण आणि कचरा जाळण्याच्या प्रक्रियेमुळे या प्रदूषणात आणखी भर पडत आहे. नीरीच्या संशाेधकांच्या मते, थंडीत बदलत्या परिस्थितीत सहसा वाऱ्याचा मंदावलेला वेग आणि बाष्पात मिसळणाऱ्या धूलिकणांमुळे नाेव्हेंबर, डिसेंबरमध्ये प्रदूषणात वाढ हाेत असताे. मात्र दिवाळी वगळता आतापर्यंत नागपूरचे प्रदूषण इतक्या उच्च स्तरावर कधी पाेहचले नव्हते. डिसेंबरच्या पहिल्या दिवशी ३३३ वर गेलेला एक्यूआय तिसऱ्या दिवशी तब्बल ३४२ वर पाेहचला हाेता. त्यामुळे ही धाेक्याची घंटा वाजली आहे. विशेष म्हणजे २ डिसेंबरला राजधानी दिल्लीचा वायू गुणवत्ता निर्देशांक ३२९ एक्यूआय नाेंदविण्यात आला हाेता. यावरून नागपूरचे प्रदूषण दिल्लीच्याही पलीकडे गेले आहे. विशेष म्हणजे ही नाेंद सिव्हील लाइन्ससारख्या ठिकाणी करण्यात आली आहे. शहराच्या इतर ठिकाणी स्थिती त्यापेक्षा वाईट असण्याची शक्यता आहे.

 

श्वसनाचे विकार ३० टक्क्यांनी वाढले

थंडीचे धुके, प्रदूषित हवेमुळे आराेग्यावर विपरीत परिणाम हाेत आहेत. लहान मुलांमध्ये श्वसनाचे विकार २५ ते ३० टक्क्यांनी वाढले आहेत. दम्याच्या रुग्णांच्या त्रासामध्ये अचानक वाढ झाल्याचे दिसून येत आहे. यासह ज्येष्ठ नागरिक आणि आधीच आजारग्रस्त असलेल्या रुग्णांचा त्रास वाढला आहे. खाेकल्याचे प्रमाण वाढले असून बरे हाेण्याचा कालावधी वाढला आहे. त्यामुळे डाॅक्टरांचा सल्ला घ्यावा, औषधे सुरू ठेवावी.

- डाॅ. आकाश बलकी, श्वसनराेग तज्ज्ञ

Web Title: Like Mumbai, Delhi, the air of Nagpur is poisonous

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.