कृषी विभागात ‘लिक्वीड’ लोचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2016 02:45 AM2016-07-11T02:45:22+5:302016-07-11T02:45:22+5:30
सध्या नागपूर कृषी विभागात जैविक निविष्ठांचा ‘लिक्वीड’ लोचा चांगलाच गाजत आहे.
जैविक निविष्ठा प्रकरण : कृषी विद्यापीठाच्या शिफारशी डावलून कोट्यवधींची खरेदी
जीवन रामावत नागपूर
सध्या नागपूर कृषी विभागात जैविक निविष्ठांचा ‘लिक्वीड’ लोचा चांगलाच गाजत आहे. मागील दोन वर्षांपासून कृषी विभाग डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या शिफारशी धुडकावून प्रात्यक्षिकांच्या नावाखाली कोट्यवधीच्या द्रव (लिक्वीड) स्वरूपातील जैविक निविष्ठांची (रायझोबियम, क्विनॉलफॉस, मेटॅरायझियम, पीएसबी) खरेदी केली जात असल्याची माहिती पुढे आली आहे.
विशेष म्हणजे, कृषीतज्ज्ञांच्या मते, कृषी विद्यापीठाने अजूनपर्यंत या द्रवस्वरूपातील जैविक निविष्ठा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वाटप करण्यास मान्यता दिलेली नाही. त्यामुळेच मागील २०१४-१५ पर्यंत पावडर स्वरुपातील जैविक निविष्ठा शेतकऱ्यांना दिल्या जात होत्या. जाणकारांच्या मते, त्या पावडर स्वरूपातील निविष्ठा स्वस्त होत्या, शिवाय अधिक परिणामकारकसुद्धा होत्या. मात्र असे असताना कृषी विभागातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केवळ या निविष्ठा पुरवठा करणाऱ्या खासगी कंपन्यांचा खिसा भरण्यासाठी या द्रव स्वरूपातील जैविक निविष्ठांचा नवा शोध लावला आणि तो सर्वांवर थोपविला. यावर्षी २ जून २०१६ रोजी कृषी संचालक (निविष्ठा व गुणनियंत्रण) के. व्ही. देशमुख यांनी त्या निविष्ठा वाटपासंबंधी गाईडलाईनसुद्धा जारी केली. मात्र नागपूर कृषी विभागाने त्याही पेक्षा एक पाऊल पुढे टाकत मागील वर्षीपासूनच जिल्ह्यात या द्रव स्वरूपातील निविष्ठांची खरेदी सुरू केली आहे. मात्र आज तीच खरेदी कृषी विभागाच्या अंगलट आली आहे. कृषी विद्यापीठाने या द्रव स्वरूपातील निविष्ठांना मान्यता दिली नसल्याने कृषी विद्यावेत्ता डॉ. नागदेवते यांनी सुद्धा मागील वर्षीपासून कृषी विभागाच्या ‘प्रात्यक्षिक किट’वर स्वाक्षरी केलेली नाही. नियमानुसार कृषी विद्यावेत्त्याच्या ‘किट’ वरील स्वाक्षरीशिवाय कोणतीही खरेदी करता येत नाही. मात्र असे असताना नागपूर कृषी विभागाने मागील दोन वर्षांत ठराविक पाच कंपन्यांकडून सर्रास कोट्यवधीची खरेदी केली आहे. एवढेच नव्हे तर यंदासुद्धा सुमारे १ कोटी ६० लाखांपेक्षा अधिकचे आॅर्डर त्याच कंपन्यांना जारी केले आहेत. ‘लोकमत’ ने मागील पाच दिवसांपूर्वी ‘कृषी विभागात निविष्ठांचा गोलमाल’ या मथळ्याखाली बातमी प्रकाशित करून, या सर्व प्रकरणाचा भंडाफोड करताच संपूर्ण कृषी विभाग खडबडून जागा झाला आहे. शिवाय कृषी विद्यावेत्ता डॉ. नागदेवते यांच्यावर स्वाक्षरीसाठी दबाव टाकला जात असल्याची माहिती पुढे आली आहे. यामुळे मागील चार दिवसांपर्यंत कृषी विभागाच्या ‘प्रात्यक्षिक किट’वर स्वाक्षरी केली नसल्याचे स्वत:च सांगणारे डॉ. नागदेवते आता मात्र अचानक स्वत: हून स्वाक्षरी करण्यासाठी कृषी अधिकाऱ्यांच्या मागे फिरत असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे मागील चार दिवसात असे काय घडले, हा सध्या कृषी विभागात चर्चेचा विषय ठरला आहे. नागपूर कृषी विभागातील या ‘लिक्वीड’ लोच्यावर कृषी संचालक (निविष्ठा व गुणनियंत्रण) के. व्ही. देशमुख यांच्याशी चर्चा केली असता, त्यांनी कृषी विद्यापीठातील तज्ज्ञांना द्रव स्वरूपातील जैविक निविष्ठासंबंधी काहीही तक्रारी असल्यास त्या आयुक्तालयाला लेखी स्वरूपात कळवाव्या, असे ते म्हणाले.