आता बिअर शॉपीमध्ये काऊंटरवरून करता येणार मद्यविक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2020 09:18 PM2020-09-03T21:18:53+5:302020-09-03T21:20:39+5:30
आता जिल्हाधिकाऱ्यांनी परवानाधारक मद्य विक्रेत्यांना रात्री ९ पर्यंत मद्य विक्रीला परवानगी दिली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आता जिल्हाधिकाऱ्यांनी परवानाधारक मद्य विक्रेत्यांना रात्री ९ पर्यंत मद्य विक्रीला परवानगी दिली आहे. यासह वाईन शॉप, बिअर बार, बिअर शॉपीला होम डिलिव्हरीसह काऊंटरवरून मद्य विक्रीची सवलत दिली आहे. हा आदेश बुधवारी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी जारी केला आहे.
या आदेशामुळे विक्रेत्यांच्या कर्मचाऱ्यांतर्फे ग्राहकांकडून २० ते ४० रुपयांपर्यंत करण्यात येणाऱ्या अवैध वसुलीवर प्रतिबंध येणार आहे. लॉकडाऊनच्या काळात ग्राहकांना ऑनलाईन ऑर्डर दिल्यानंतर मद्य होम डिलिव्हरी देण्याचे आदेश दिले होते. परंतु बहुतांश मद्य विक्रेते शासकीय नियमांचे उल्लंघन करीत होते. दुकानदारांचे कर्मचारी दुकानाबाहेर उभे राहून ग्राहकांकडून मद्य खरेदीच्या एक दिवसाच्या परमीटच्या नावावर एका बॉटलकरिता (७५० मिलि) ४० ते ५० रुपये जास्त वसूल करीत होते.
दुसरीकडे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नियमानुसार एक दिवसाच्या परमीटकरिता एक दिवसाचे ५ रुपये अतिरिक्त देऊन मद्य खरेदी करू शकतात. त्यानंतरही काही मद्य विक्रेते मनमानी अवैध वसुलीत गुंतले होते. याशिवाय रात्री ८ पर्यंत दुकानाचे अर्धे शटर खुले ठेवून विक्री करीत होते. शिवाय मद्य खरेदीदार दुकानाची वेळ संपल्यानंतरही बॉटल खरेदी करताना अवैध वसुलीला बळी पडत होते. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर परवानाधारक विक्रेते लॉकडाऊनपर्यंत सीलबंद बॉटलची विक्री करू शकतील.
नागपूर जिल्हा वाईन शॉप (एफएल-२), बिअरबार (एफएल-३), बिअर शॉपी (एफएल-बीआर २) आणि कन्ट्री लिकरला (सीएल-३) कंटेनमेंट क्षेत्रातील दुकाने वगळता सर्वांना रात्री ९ वाजेपर्यंत मद्य विक्रीला परवानगी दिली आहे. यासह विदेशी होलसेल मद्य विक्रेते (एफएल-१) व होलसेल देशी मद्य विक्रेत्यांना (सीएल-२) रात्री ८ पर्यंत पुरवठा करता येईल.