नागपूरच्या जरीपटका भागात दारुड्यांच्या हैदोसाने तणाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2018 12:19 AM2018-01-02T00:19:31+5:302018-01-02T00:27:32+5:30
नववर्षाच्या स्वागताच्या नावाखाली दारूच्या नशेत टुन्न झालेल्या आरोपींनी जरीपटक्यात सोमवारी पहाटे प्रचंड हैदोस घातला. घरासमोर उभ्या केलेल्या १७ वाहनांची त्यांनी तोडफोड केली.
आॅनलाईन लोकमत
नागपूर : नववर्षाच्या स्वागताच्या नावाखाली दारूच्या नशेत टुन्न झालेल्या आरोपींनी जरीपटक्यात सोमवारी पहाटे प्रचंड हैदोस घातला. घरासमोर उभ्या केलेल्या १७ वाहनांची त्यांनी तोडफोड केली. वर्षाच्या पहिल्याच सकाळी आपल्या वाहनांची तोडफोड झाल्यामुळे संबंधित वाहनमालकांमध्ये तीव्र रोष निर्माण झाला आहे.
उपराजधानीत ठिकठिकाणी रविवारी रात्रीपासून नववर्षाच्या स्वागतासाठी प्रचंड जल्लोष होता. ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले होते. तिकडे मेकोसाबाग परिसरातील रहिवासी असलेल्या प्रतीक राजू राऊत, रितीक रोशन ठवरे, निखील नरेश शेंडे, मनीष समशेर थापा, आकाश राजा थापा आणि समीर संजय खरात हे आरोपी रविवारी मध्यरात्री दारूच्या नशेत टुन्न झाले. सोमवारी पहाटेपर्यंत इकडे तिकडे गोंधळ घातल्यानंतर त्यांनी लुबिंनीनगर गाठले. येथे एका गल्लीतील लोकांना आरोपी नाहकच शिवीगाळ करू लागले. त्यांच्या हातात लाकडी दंडे होते. गल्लीत हैदोस घालतानाच त्यांनी त्या भागात ठेवलेल्या पाच कार, तीन आॅटोरिक्षा आणि नऊ मोटरसायकलची तोडफोड केली. पहाटे ३.३० वाजता प्रचंड आरडाओरड, शिवीगाळ आणि धमक्या देत आरोपी तोडफोड करीत होते. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली होती. काहींनी जरीपटका पोलिसांना फोन करून माहिती दिली. मात्र, पोलीस तेथे पोहचेपर्यंत आरोपी पळून गेले. उज्ज्वल माधवराव धनके (वय ३६, रा. नझूल लेआऊट अंगुलीमालनगर) यांच्या तक्रारीवरून जरीपटका पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
परिसरात दिवसभर तणाव
या घटनेमुळे मेकोसाबाग, लुंबिनीनगरात सोमवारी पहाटेपासून तणाव निर्माण झाला. तो दिवसभर तसाच होता. जरीपटका पोलिसांनी दिवसभर धावपळ करून सहाही आरोपींना ताब्यात घेतले. रात्री ९ वाजेपर्यंत त्यांना अटक करण्याची प्रक्रिया सुरू होती.