अंदमान एक्सप्रेसमध्ये आढळला दारूसाठा; आरपीएफची कारवाई, आंध्रातील दारू तस्कर जेरबंद
By नरेश डोंगरे | Published: October 6, 2023 02:05 PM2023-10-06T14:05:20+5:302023-10-06T14:05:59+5:30
एक लाखाची दारू जप्त
नागपूर : येथील मुख्य रेल्वे स्थानकाच्या फलाटावर थांबलेल्या अंदमान एक्सप्रेसमध्ये रेल्वे सुरक्षा दलाने आंध्र प्रदेशातील एका तरुणाला ताब्यात घेतले. चाैकशीत तो विदेशी मद्याची तस्करी करणारा असल्याचे स्पष्ट झाले. त्याच्याकडून विदेशी मद्याच्या ६४ बाटल्या जप्त करण्यात आल्या.
ट्रेन नंबर १६०३२ अंदमान एक्सप्रेस गुरुवारी नागपुरातील मध्यवर्ती रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक २ वर आल्यानंतर आरपीएफच्या जवानांनी तिची तपासणी सुरू केली. कोच ए-१ मध्ये त्यांना दोन ट्रॉली बॅग बेवारस अवस्थेत दिसल्या. त्या बॅग कुणाच्या आहेत, अशी विचारणा केली असता एक तरुण समोर आला. चाैकशीत त्याने आपले नाव करणाती त्रिनाथ रेड्डी (वय १९, रा, अय्यागरीपल्ली, जि. प्रकाशम, आंध्रप्रदेश) असे सांगितले.
संशय आल्यामुळे बॅगची तपासणी केली असता त्यात विदेशी दारूच्या ६४ बाटल्या आढळल्या. त्या जप्त करण्यात आल्या. या दारूची किंमत १,०२,९२० रुपये आहे. आरोपीला दारूसह राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ताब्यात देण्यात आले. ही कारवाई आरपीएफचे निरीक्षक आर. एल.मिना यांच्या नेतृत्वात उपनिरीक्षक व्ही. पी. सिंग, तसेच कर्मचारी रवींद्र जोशी, अमोल चहाजगुणे, आर. डी. खाडे, अश्विन पवार, बलराम उईके, आशिष कुमार, शाम सरियाम यांनी ही कामगिरी बजावली.
'लोकमत'ने अनेकदा केला खुलासा
रेल्वे गाड्यांमधून दारू आणि गांजासह अन्य अंमली पदार्थांची तस्करी होत असल्याचा खुलासा 'लोकमत'ने यापूर्वी अनेकदा केला आहे. त्या संबंधाने अनेकदा कारवाई देखिल झाली आहे, हे येथे उल्लेखनीय !