नागपुरात शुक्रवारपासून दारू विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2020 08:36 PM2020-05-14T20:36:17+5:302020-05-14T21:10:27+5:30
शुक्रवारपासून जिल्ह्यात दारू विक्रीस सुरुवात होत आहे, तसे आदेश जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी आज गुरुवारी जारी केले आहेत. नगर परिषद, नगरपंचायत भागात टोकन व ऑनलाईन अशा दोन्ही पद्धतीने विक्री होणार असून शहरी भागात फक्त ऑनलाईनच विक्री होईल. कंटेन्मेंट परिसराच्या २०० मीटरपर्यंत दारू विक्री होणार नाही. विशेष म्हणजे फक्त परवानाधारक व्यक्तीलाच दारू मिळणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शुक्रवारपासून जिल्ह्यात दारू विक्रीस सुरुवात होत आहे, तसे आदेश जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी आज गुरुवारी जारी केले आहेत. नगर परिषद, नगरपंचायत भागात टोकन व ऑनलाईन अशा दोन्ही पद्धतीने विक्री होणार असून शहरी भागात फक्त ऑनलाईनच विक्री होईल. कंटेन्मेंट परिसराच्या २०० मीटरपर्यंत दारू विक्री होणार नाही. विशेष म्हणजे फक्त परवानाधारक व्यक्तीलाच दारू मिळणार आहे.
कोरोनामुुळे १८ मार्च रोजी जिल्ह्यात दारूबंदी करण्यात आली. यामुळे मद्यपींची चांगलीच अडचण झाली. लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात केंद्र व राज्य सरकारने दारू विक्रीस परवानगी दिली. परंतु, नागपूर महानगर पालिका आयुक्त तुकाराम मुंढे आणि जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दारू विक्रीस परवानगी नाकारली. यामुळे मद्यपींमध्ये चांगलीच नाराजी झाली. त्यामुळे अवैध दारू विक्रीचे प्रमाणही वाढले. मद्यपींनी दुकाने फोडून दारू चोरून नेण्याच्या घटनाही घडल्या. दरम्यान, उत्पादन शुल्क विभागाकडून दारू विक्रीसाठी काही अटी व शर्ती घालून दिल्या. त्यानंतर आता नागपूर जिल्ह्यातही दारूची दुकाने सुरू होणार आहेत.
रात्री उशिरापर्यंत चालली बैठक
मद्य विक्रीची दुकाने सुरू करण्यासंदर्भात बुधवारी रात्री उशिरापर्यंत जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी बैठक घेतली. यावेळी उत्पादन शुल्क व आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी उपस्थित होते. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हाधिकारी ठाकरे यांनी दुकाने सुरू करण्यास सहमती दर्शविली. गुरुवारीसुद्धा सकाळपासून अधिकाऱ्यांच्या बैठका झाल्या. सकाळीच या संदर्भातला अधिकृत आदेश काढण्यात आला.
महत्त्वाच्या बाबी
नगर परिषद, नगरपंचायत व ग्रामीण क्षेत्रात दुकानासोबत आॅनलाईन विक्री
सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत दुकाने राहणार सुरू
दुकानात एकावेळी पाचपेक्षा जास्त व्यक्ती नसतील
फिजिकल डिस्टन्सिंग व मास्क अनिवार्य
दुकानातील नोकरांची व ग्राहकांची थर्मल स्कॅनिंग करणे
सर्दी, ताप, खोकला असणाऱ्यास प्रवेश देऊ नये
दुकानात मद्यप्राशन करता येणार नाही
परिसरात थुंकण्यासही मनाई
दारू घेताना एक मागणी फॉर्म भरून द्यावा लागणार
शहरी भागात फक्त ऑनलाईन विक्री
डिलिव्हरी बायकडे २४ बॉटल्स असतील
शहरी भागात कंटेन्मेंट झोनच्या २०० मीटर परिसरात बंदी