सील केलेल्या बारमधून दारूची चाेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:08 AM2021-04-25T04:08:41+5:302021-04-25T04:08:41+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क माैदा : राज्य उत्पादन शुल्क विभागाने सील केलेल्या बीअर बारमधील दारूच्या बाटल्या आणि काही साहित्य चाेरीला ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
माैदा : राज्य उत्पादन शुल्क विभागाने सील केलेल्या बीअर बारमधील दारूच्या बाटल्या आणि काही साहित्य चाेरीला गेल्याची घटना माैदा पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील माराेडी येथे ७ एप्रिल ते १९ एप्रिल या काळात घडली. यात चाेरट्याने ५७ हजार ८०० रुपये किमतीचा मुद्देमाल चाेरून नेला.
माराेडी येथील बीअर बार राज्य उत्पादन शुल्क विभागाने काही दिवसापूर्वी सील केलेे हाेते. त्यातच या बारमध्ये चाेरी झाल्याची माहिती बारचे व्यवस्थापक अंकुश गाेमासे यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी धवल तिजारे यांना दिली. त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली असता, त्यांना या बारमधील विदेशी दारूच्या १२ वेगवेगळ्या ब्रँडच्या ७२६ बाटल्या, एलईडी टीव्ही, डीव्हीआर व सीसीटीव्ही कॅमेरे चाेरून नेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
यात चाेरट्याने ४८ हजार ८०० रुपये किमतीची विदेशी दारू तसेच प्रत्येकी तीन हजार रुपये किमतीचे एलईडी टीव्ही, डीव्हीआर व सीसीटीव्ही कॅमेरे असा एकूण ५७ हजार ८०० रुपये किमतीचा मुद्देमाल चाेरीला गेल्याची माहिती पाेलिसांना देण्यात आली. चाेरट्याने ही चाेरी बारच्या समाेरील शेडचे कवेलू काढून आत प्रवेश करीत केल्याची माहिती पाेलिसांनी दिली. याप्रकरणी माैदा पाेलिसांनी अज्ञात चाेरट्याविरुद्ध भादंवि ४५७, ४५४, ३८० अन्वये गुन्हा नाेंदविला असून, या घटनेचा तपास पाेलीस हवालदार कुथे करीत आहेत.