नागपूर रेल्वेस्थानकावर दारूची तस्करी पकडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2019 11:09 PM2019-02-08T23:09:29+5:302019-02-08T23:10:38+5:30
रेल्वे सुरक्षा दलाने शुक्रवारी दारूची तस्करी करण्याच्या दोन घटना उघडकीस आणल्या. यात एका आरोपीला अटक करून ३३१४ रुपये किमतीच्या ३० दारूच्या बॉटल्स जप्त केल्या आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रेल्वे सुरक्षा दलाने शुक्रवारी दारूची तस्करी करण्याच्या दोन घटना उघडकीस आणल्या. यात एका आरोपीला अटक करून ३३१४ रुपये किमतीच्या ३० दारूच्या बॉटल्स जप्त केल्या आहेत.
रेल्वे सुरक्षा दलाचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त ज्योती कुमार सतीजा यांनी मादक पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी गठित केलेल्या चमूतील महिला आरक्षक उषा तिग्गा, विकास शर्मा यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागासोबत संयुक्तरीत्या धाड टाकली. यात रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफार्म क्रमांक २ वर दुपारी १२.५० वाजता रेल्वेगाडी क्रमांक १२७९२ सिकंदराबाद एक्स्प्रेसच्या एस ८ कोचमध्ये एक व्यक्ती बॅग घेऊन संशयास्पद स्थितीत आढळली. त्याची चौकशी केली असता त्याने समाधानकारक उत्तर दिले नाही. त्याला आरपीएफच्या ठाण्यात आणून उपनिरीक्षक गौरीशंकर एडले यांच्यासमोर हजर करण्यात आले. त्याने आपले नाव कुणाल भिकुलाल व्यास (३१) रा. न्यू वाघेश्वरी लॉज, अनाज लाईन, वर्धा सांगितले. बॅगबाबत चौकशी केली असता त्याने त्यात १२९० रुपये किमतीच्या दारूच्या पाच बॉटल असल्याची कबुली दिली. दुसऱ्या घटनेत सकाळी १० वाजता प्लॅटफार्म क्रमांक २ वर उभ्या असलेल्या १२७२४ तेलंगणा एक्स्प्रेसच्या एस ९ कोचमध्ये एक बॅग बेवारस अवस्थेत आढळली. आजूबाजूच्या प्रवाशांना बॅगबाबत विचारणा केली असता बॅगवर कुणीच आपला हक्क सांगितला नाही. बॅगची तपासणी केली असता त्यात दारूच्या २०१४ रुपये किमतीच्या २५ बॉटल आढळल्या. निरीक्षक वीरेंद्र वानखेडे यांच्या आदेशानुसार उपनिरीक्षक गौरीशंकर एडले यांनी जप्त केलेली दारू आणि आरोपीस राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या स्वाधीन केले.