मुलांच्या मदतीने दारू तस्करी : महिलेस अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2019 09:12 PM2019-03-20T21:12:02+5:302019-03-20T21:14:29+5:30
दारूच्या तस्करीसाठी आजपर्यंत तस्करांनी विविध क्लृप्त्या वापरल्या आहेत. यात मिठाईच्या बॉक्समधून दारूची तस्करी, शर्टखाली कप्पे असलेल्या जाकिटात दारूच्या बॉटल ठेवणे, साडीखाली परकरला खिसे करणे, जोड्यांच्या डब्यात दारू नेताना तस्करांना अटक झाली आहे. परंतु पहिल्यांदा आपल्या ८, १० आणि १२ वर्षाच्या मुलांच्या खिशात दारूच्या बॉटल देऊन दारूची तस्करी करणाऱ्या महिलेस रेल्वे सुरक्षा दलाने बुधवारी दुपारी रंगेहात अटक केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दारूच्या तस्करीसाठी आजपर्यंत तस्करांनी विविध क्लृप्त्या वापरल्या आहेत. यात मिठाईच्या बॉक्समधून दारूची तस्करी, शर्टखाली कप्पे असलेल्या जाकिटात दारूच्या बॉटल ठेवणे, साडीखाली परकरला खिसे करणे, जोड्यांच्या डब्यात दारू नेताना तस्करांना अटक झाली आहे. परंतु पहिल्यांदा आपल्या ८, १० आणि १२ वर्षाच्या मुलांच्या खिशात दारूच्या बॉटल देऊन दारूची तस्करी करणाऱ्या महिलेस रेल्वे सुरक्षा दलाने बुधवारी दुपारी रंगेहात अटक केली आहे.
रेल्वे सुरक्षा दलाचे विभागीय सुरक्षा आयुक्त आशुतोष पांड्येय यांनी मादक पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी गठीत केलेल्या चमूतील सदस्य सहायक उपनिरीक्षक विकास शर्मा, उषा तिग्गा, दीपक पवार हे बुधवारी दुपारी २.३० वाजता प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वर गस्त घालत होते. त्यांना प्लॅटफॉर्मवर उभ्या असलेल्या १२९७० जयपूर-कोईम्बतूर एक्स्प्रेसच्या समोरील दिव्यांग कोचमध्ये एक महिला आपल्या तीन मुलांसह संशयास्पद स्थितीत आढळली. या महिलेची चौकशी केली असता तिने समाधानकारक उत्तर दिले नाही. तिला आरपीएफ ठाण्यात आणून विचारणा केली असता तिने आपले नाव रुकसाना इमरान शेख (३२) रा. महाकाली वॉर्ड, चंद्रपूर सांगितले. या महिलेने दारूची तस्करी करण्यासाठी पायमोजे घालून दारूच्या बॉटल बांधल्या होत्या. याशिवाय मुलांच्या बॅग, कम्पासमध्ये दारूच्या बॉटल लपविल्या. या मुलांजवळ आणि तिच्याजवळ मिळून ४०५० रुपये किमतीच्या दारूच्या ८५ बॉटल आढळल्या. सायंकाळी या महिलेची जमानतीवर सुटका करण्यात आली. दुसऱ्या घटनेत सकाळी ११.२० वाजता विकास शर्मा, उषा तिग्गा, दीपक पवार हे प्लॅटफॉर्म क्रमांक २ वर गस्त घालत असताना त्यांना १५०२३ गोरखपूर-यशवंतपूर एक्स्प्रेसच्या एस २ कोचमध्ये एक बॅग संशयास्पद स्थितीत आढळली. आजूबाजूच्या प्रवाशांना विचारणा केली असता या बॅगवर कुणीच आपला हक्क सांगितला नाही. संशयाच्या आधारे बॅगची तपासणी केली असता त्यात दारूच्या ४११६ रुपये किमतीच्या १६ बॉटल आढळल्या.
तिसऱ्या घटनेत दुपारी २.३० वाजता प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वर १२९७० जयपूर कोईम्बतूर एक्स्प्रेसमध्ये समोरील दिव्यांग कोचमध्ये एक व्यक्ती संशयास्पद स्थितीत आढळली. चौकशीत त्याने समाधानकारक उत्तर दिले नाही. त्याला आरपीएफ ठाण्यात आणून चौकशी केली असता त्याने आपले नाव मुकुंद प्रकाश हेडाऊ (३२) रा. अष्टभूजा वॉर्ड क्रमांक १७, चंद्रपूर सांगितले. त्याने आपल्या शर्टाच्या खाली विशेष जाकीट तयार करून त्यातील कप्प्यात दारूच्या बॉटल ठेवल्या होत्या. त्याच्याजवळून दारूच्या २३९२ रुपये किमतीच्या ९२ बॉटल जप्त करण्यात आल्या. रेल्वे सुरक्षा दलाचे निरीक्षक विरेंद्र वानखेडे यांच्या आदेशानुसार उपनिरीक्षक गौरीशंकर एडले यांनी १०५५८ रुपये किमतीच्या १९३ बॉटल राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या स्वाधीन केल्या.