दारूची वाहतूक करणारा ट्रक पुलाखाली कोसळला : आगीत चालकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 10:50 PM2021-05-14T22:50:22+5:302021-05-14T22:56:57+5:30
Accident औरंगाबादवरून नागपूर येथे विदेशी दारूची वाहतूक करीत असलेल्या ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने पुलाखाली कोसळला. पुलानजीक असलेल्या विद्युत खांबाच्या तारेला ट्रकचा स्पर्श झाल्याने लागलेल्या आगीत चालकाचा होरपळून मृत्यू झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुटीबोरी (नागपूर) : औरंगाबादवरून नागपूर येथे विदेशी दारूची वाहतूक करीत असलेल्या ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने पुलाखाली कोसळला. पुलानजीक असलेल्या विद्युत खांबाच्या तारेला ट्रकचा स्पर्श झाल्याने लागलेल्या आगीत चालकाचा होरपळून मृत्यू झाला. या आगीत लाखो रुपयांचा मुद्देमाल भस्मसात झाला. बुटीबोरी पोलीस स्टेशनअंतर्गत वर्धा वाय पॉइंटवरील उड्डाणपुलावर शुक्रवारी मध्यरात्रीनंतर ही घटना घडली. हेमराज ऊर्फ पिंट्या देवीदास पिंपळे (२५, रा.मासळ, ता.लाखांदूर. जि. भंडारा) असे मृत चालकाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रकचालक हेमराज हा नागपूर येथील भारतीय रोड कॅरिअर ट्रान्सपोर्टमध्ये दीड वर्षांपासून चालक म्हणून काम करीत होता. बुधवारी (दि.१२) तो नेहमीप्रमाणे औरंगाबादवरून अशोक लेल्यांड ट्रक (क्र. एमएच ४० वाय ८१२६) विदेशी दारू ओसीब्लू १८० एम एल.निपा असलेल्या ३०० पेट्या, तर बी सेवनचे ७५० एमएलच्या बॉटल असलेल्या ७०० पेट्या असा हजार पेट्या माल घेऊन नागपूरकडे निघाला. गुरुवारी मध्यरात्री जवळपास १२.१५ वाजताच्या सुमारास वर्धा वाय पॉइंटवरील उड्डाणपुलानजीक ट्रक पोहोचला असता, रात्रीच्या वेळी रस्त्याचा अंदाज न आल्याने, तो चुकीच्या मार्गाने उड्डाणपुलावरून चंद्रपूरच्या दिशेने निघाला. त्याच वेळी त्याचे अचानक नियंत्रण सुटले आणि ट्रक पुलाखाली कोसळला. दरम्यान, पुलानजीक असलेल्या विद्युत खांबाच्या जिवंत तारेला ट्रकचा स्पर्श झाल्याने आग लागली.
या घटनेत हेमराजला स्वत:ला वाचविण्यास संधी मिळाली नसल्याने, त्याचा आगीत होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच, बुटीबोरीचे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे, पोलीस उपनिरीक्षक संजय भारती, आशिष मोरखडे, अनिल व्यवहारे, बाबुलाल वडमे, सतेंद्र रंगारी, नारायण भोयर, विनायक सातव, राकेश तालेवार आदींनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाला पाचारण करून आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न सुरू केला. ट्रकमध्ये दारू असल्याने आगीचे रौद्र रूप होते. अग्निशमन दलाच्या दोन वाहनांच्या मदतीने पहाटे ५ वाजेच्या सुमारास या आगीवर नियंत्रण मिळविता आले.
चार तासांचे रेस्क्यू ऑपरेशन
दारूच्या ट्रकला लागलेली आग विझविण्यात पोलीस आणि अग्निशनम दलाला चार तासांचे रेस्क्यू ऑपरेशन करावे लागले. यात चालकांचे प्राण वाचविण्यात अपयश आल्याचे खंत ठाणेदार कोकाटे यांनी व्यक्त केली. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला. सदर घटनेत दारू आणि
ट्रक असा एकूण ८० लाख ६७ हजार १८० रुपयांचा मुद्देमाल जळून भस्मसात झाल्याची नोंद घेण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक संजय भारती या घटनेचा तपास करीत आहेत.