नागपुरात ४.६५ लाख रुपयाची दारू लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2020 12:15 AM2020-06-11T00:15:20+5:302020-06-11T00:16:35+5:30
गिट्टीखदान व लकडगंज पोलीस ठाणे परिसरात दारूची दुकाने फोडून ४.५६ लाख रुपये किमतीच्या दारूवर हात साफ केले. गिट्टीखदान पोलिसांनी या प्रकरणातील दोन आरोपींना अटक केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गिट्टीखदान व लकडगंज पोलीस ठाणे परिसरात दारूची दुकाने फोडून ४.५६ लाख रुपये किमतीच्या दारूवर हात साफ केले. गिट्टीखदान पोलिसांनी या प्रकरणातील दोन आरोपींना अटक केली आहे.
गिट्टीखदान चौकातील सीपी बारजवळ देशी दारूचे दुकान आहे. लॉकडाऊनमुळे हे दुकान बंद होते. मंगळवारी दुपारच्या सुमारास परिसरातील नागरिकाने दुकानाचे व्यवस्थापक देवेंद्र सिंह यांना चोरी झाल्याची माहिती दिली. देवेंद्र यांनी गिट्टीखदान पोलिसांना याबाबत सूचना दिली. दुकानाचे कुलूप तोडून ४ लाख ६५ हजार रुपये किमतीची दारू चोरण्यात आली आहे. आरोपींनी आपली ओळख लपवण्यासाठी दुकानातील सीसीटीव्हीचा डीव्हीआरही सोबत नेला होता. पोलिसांनी परिसरातील इतर सीसीटीव्हीची तपासणी केली असता, या गोष्टीचा खुलासा झाला. त्याच आधारावर प्रज्वल ऊर्फ प्रज्या विशाल शेंडे (१९), लुंबिनीनगर, जरीपटका व तिनेश गिरावकर (१९) आजादनगर, गिट्टीखदान यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून आठ हजार रुपये किमतीची दारू जप्त करण्यात आली. दोघांनाही दारू व अन्य अमली पदार्थांचे व्यसन आहे. लॉकडाऊनमुळे हे दोघेही आर्थिक अडचणीत होते. नशा करण्यासाठी आणि आर्थिक तणाव दूर करण्यासाठी त्यांनी दारूचे दुकान फोडले. तपास अधिकारी पीएसआय साजिद यांनी त्यांना न्यायालयात हजर करून १२ जूनपर्यंत ताब्यात घेतले आहे. अशाच प्रकारची घटना लकडगंज, मारवाडी चौकात उघडकीस आली. सिव्हील लाईन्स निवासी अभिषेक जायसवाल यांचे तेथे देशी दारूचे दुकान आहे. १८ मार्चपासून दुकान बंद आहे. चोरांनी दुकानातून दहा हजार रुपये रोख व ५५ हजार रुपयाची दारू चोरली आणि सोबत सीसीटीव्हीचा डीव्हीआरही घेऊन पसार झाले आहेत.