कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती यादीत घोळ
By admin | Published: July 20, 2015 03:11 AM2015-07-20T03:11:14+5:302015-07-20T03:11:14+5:30
राष्ट्रीय शहरी ग्रामीण आरोग्य मिशनअंतर्गत कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीसंबंधाने महापालिकेच्या वेबसाईटवर यादी प्रसिद्ध केली आहे.
महापालिका : शासकीय नियम डावलून मागासवर्गीयांवर अन्याय
नागपूर : राष्ट्रीय शहरी ग्रामीण आरोग्य मिशनअंतर्गत कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीसंबंधाने महापालिकेच्या वेबसाईटवर यादी प्रसिद्ध केली आहे. परंतु ही यादी शासकीय नियम डावलून करण्यात आली आहे. प्रथम खुल्या प्रवर्गासाठी यादी तयार न करता प्रवर्गानुसार स्वतंत्र याद्या तयार करण्यात आल्या आहेत. अधिकाऱ्यांनी गुणवत्ता यादीत घोळ करून मागासवर्गीय उमेदवारांवर अन्याय केल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाने के ला आहे.
मनपाने कंत्राटी आरोग्य कर्मचारी पदासाठी अर्ज मागविले होते. त्या अनुषंगाने उमेदवाराने उत्तीर्ण केलेल्या द्वितीय वर्षाच्या पदवीमध्ये मिळालेल्या गुणांच्या टक्केवारीनुसार यादी तयार करण्यात आली. ही यादी १४ जुलै २०१५ रोजी मनपाच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आली. वास्तविक प्रथम खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणे आवश्यक होते. त्यानंतर अनुसूचित जाती-जमाती व इतर मागासवर्गीय अशा क्रमाने शासकीय नियमानुसार यादी तयार करणे आवश्यक होते. परंतु मनपा प्रशासनाने याचा विचार केलेला नाही. त्यामुळे मागासवर्गीय उमेदवारांची कट आॅफ टक्केवारी ७९.०७ टक्के आली, तर खुल्या प्रवर्गाची कट आॅफ टक्केवारी ५५ टक्के इतकी कमी आहे.
सुरुवातीला अर्ज करताना उमेदवारांना प्रवर्ग विचारला होता. कोणत्या प्रवर्गात अर्ज करता, हे विचारले नव्हते. त्यामुळे उमेदवाराने स्वत:चा प्रवर्ग नमूद केला. यावरून आरोग्य विभागाने प्र्राथमिक गुणवत्ता यादी तयार केली आहे. या यादीत घोळ असल्याने ती रद्द करून नियमानुसार यादी जाहीर करण्यात यावी, अशी मागणी कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचे सोहन चवरे यांनी केली आहे.(प्रतिनिधी)