'होम क्वारंटाईन'ची ती यादी केवळ प्रवास करून आलेल्यांची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2020 12:44 AM2020-03-22T00:44:16+5:302020-03-22T00:45:44+5:30
शुक्रवारी दुपारनंतर शहरातील विविध व्हॉट्सअॅप नंबरवर एक मॅसेज व्हायरल होत होता. या मेसेजमध्ये असा दावा करण्यात आला होता की, सोबत दिलेल्या यादीत ज्या लोकांची नावे आहेत त्यांना कोरोना विषाणू संसर्गामुळे होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे त्यांच्या नावासह त्यांचे पत्ते व फोन नंबरही देण्यात आले होते. तेव्हापासून या लोकांचे जगणे कठीण झाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शुक्रवारी दुपारनंतर शहरातील विविध व्हॉट्सअॅप नंबरवर एक मॅसेज व्हायरल होत होता. या मेसेजमध्ये असा दावा करण्यात आला होता की, सोबत दिलेल्या यादीत ज्या लोकांची नावे आहेत त्यांना कोरोना विषाणू संसर्गामुळे होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे त्यांच्या नावासह त्यांचे पत्ते व फोन नंबरही देण्यात आले होते. तेव्हापासून या लोकांचे जगणे कठीण झाले आहे.
या यादीमधील काही लोकांशी लोकमतने फोनवर संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, ही यादी जेव्हापासून व्हायरल झाली आहे, तेव्हापासून त्यांना परिचितांचे फोन येत आहेत. या मेसेजने त्यांचे जगणे कठीण केले आहे. एका व्यक्तीने असेही सांगितले की, काही दिवसांपूर्वी ज्या लोकांसोबत त्याची ओळख झाली होती, ते लोक आता ही यादी व्हायरल झाल्याने आमच्यावर शंका घेताना दिसत आहेत. शेजारीही आमच्यापासून दूर झाले आहेत.
हे आहे खरे कारण?
या यादीमधील व्यक्तींसोबत जेव्हा लोकमतने फोनवर चर्चा केली, तेव्हा त्यांनी सांगितले की, ते काही दिवसांपूर्वीच नागपूरमधून बाहेर फिरायला गेले होते त्यांची ट्रॅव्हलिंग हिस्ट्री असल्यामुळे पोलिसांनी त्यांची चौकशी केली. यातील एका व्यक्तीने असेही सांगितले की, कोरोना विषाणू संसर्गाबाबत तपासणीबाबत डॉक्टरांना विचारले असता त्यांनी याची आवश्यकता नसल्याचे सांगितले. म्हणजेच हे लोक केवळ त्यांनी अलीकडेच प्रवास केला असल्याने त्यांना या यादीत सामील करण्यात आले आहे.
घाबरू नका, ते कोरोनाबाधित नाहीत
जी यादी सोशल मीडियावर व्हायरल केली जात आहे आणि त्यात असा दावा केला जात आहे की, ही यादी होम क्वारंटाईन व्यक्तींची आहे, त्या नावांच्या व्यक्तींपासून घाबरण्याची गरज नाही. कारण ते लोक केवळ विविध भागांतून प्रवास करून आल्यामुळे या यादीत सामील करण्यात आले आहेत. ते कोरोना विषाणूबाधित नाहीत. अशा वेळी नागपूरकर नागरिकांना घाबरण्याची आवश्यकता नाही.
चौकशी केली जात आहे
या प्रकारची कुठलीही यादी नागपूर पोलिसांनी जारी केलेली नाही. आम्हाला या प्रकरणाची तक्रारही मिळाली आहे. याची चौकशी केली जात आहे.
डॉ. भूषणकुमार उपाध्याय, पोलीस आयुक्त