एलआयटी आता लक्ष्मीनारायण अभिनव तंत्रज्ञान विद्यापीठ

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2023 10:58 AM2023-08-03T10:58:08+5:302023-08-03T10:58:08+5:30

विधानसभेत विधेयक सादर

LIT will now be Lakshminarayan University of Innovative Technology; granted autonomy by the University Grants Commission | एलआयटी आता लक्ष्मीनारायण अभिनव तंत्रज्ञान विद्यापीठ

एलआयटी आता लक्ष्मीनारायण अभिनव तंत्रज्ञान विद्यापीठ

googlenewsNext

नागपूर :विद्यापीठ अनुदान आयोगाचा (यूजीसी) स्वायत्त दर्जा प्राप्त करणाऱ्या नागपूरच्या लक्ष्मीनारायण तंत्र संस्थेला आता स्वतंत्र विद्यापीठाचा दर्जा मिळणार आहे. या संदर्भातील विधेयक उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी विधानसभेत सादर केले. त्यामुळे एलआयटी यापुढे लक्ष्मीनारायण अभिनव तंत्रज्ञान विद्यापीठ या नावाने ओळखले जाणार आहे.

एलआयटीला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठापासून विभक्त करून विद्यापीठात रूपांतर करण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने पत्राद्वारे संदर्भ मागविला होता. यामध्ये विद्यापीठाच्या इमारती, जागा, कर्मचारी तसेच कॉर्पस फंड याबाबत माहिती विचारण्यात आली होती. विद्यापीठाने या मुद्द्यांची माहिती शासनाकडे सादर केली. यासाठी आवश्यक असलेल्या विधेयकाचे प्रारूप शासनास सादर करण्यात आले होते. विधेयकाचे अधिनियमात रूपांतर होण्यापूर्वी संस्थेत व विद्यापीठात ज्या बाबींचे हस्तांतरण होणार आहे, त्या स्पष्ट होणे आवश्यक असल्याने सामंजस्य करार करण्याच्या सूचना सरकारने दिल्या होत्या. त्यानुसार राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ व लक्ष्मीनारायण तंत्र संस्थेदरम्यान सामंजस्य करार करण्यात आला. विद्यापीठाच्या वतीने कुलसचिव डॉ. राजू हिवसे, तर एलआयटीच्या वतीने संचालक डॉ. राजू मानकर यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली होती.

विद्यापीठाचा दर्जा मिळाल्यानंतर एलआयटीला स्वतंत्र जागा आणि अधिकारी व कर्मचाऱ्यांची भरती करावी लागणार आहे. लक्ष्मीनारायण तंत्रशास्त्र संस्थेचे विद्यापीठात रूपांतर झाल्यानंतर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात नामांकन केलेल्या सर्व विद्यार्थ्यांना एकाच टप्प्यात संस्थेकडे हस्तांतरित करावे लागणार आहे.

Web Title: LIT will now be Lakshminarayan University of Innovative Technology; granted autonomy by the University Grants Commission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.