‘एलआयटी’ होईल आता ‘एलआयटी युनिव्हर्सिटी’; नॅक 'अ', ‘एनबीए’ मानांकन, यूजीसीचा स्वायत्त दर्जा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2023 08:34 PM2023-07-10T20:34:54+5:302023-07-10T20:35:17+5:30
Nagpur News राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ आणि लक्ष्मीनारायण तंत्र संस्थेदरम्यान (एलआयटी)सरकारच्या सूचनेप्रमाणे सामंजस्य करार (एमओयू) करण्यात आला आहे.
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ आणि लक्ष्मीनारायण तंत्र संस्थेदरम्यान (एलआयटी)सरकारच्या सूचनेप्रमाणे सामंजस्य करार (एमओयू) करण्यात आला आहे. नॅकचा 'अ' प्लस दर्जा, एनबीएचे मानांकन सोबतच विद्यापीठ अनुदान आयोगाचा स्वायत्त दर्जा प्राप्त करीत लक्ष्मीनारायण तंत्र संस्थेने विद्यापीठाच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. त्यामुळे एलआयटी आता लक्ष्मीनारायण अभिनव तंत्रज्ञान विद्यापीठ (एलआयटीयू) या नावाने ओळखले जाणार आहे.
एलआयटीला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठापासून विभक्त करून विद्यापीठात रूपांतर करण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने पत्राद्वारे संदर्भ मागविला होता. यामध्ये विद्यापीठाच्या इमारती, जागा, कर्मचारी तसेच काॅर्पस फंड याबाबत माहिती विचारण्यात आली होती. विद्यापीठाने या मुद्द्यांची माहिती शासनाकडे सादर केली. संस्थेचे विद्यापीठात रूपांतर करण्याकरिता आवश्यक असलेल्या विधेयकाचे प्रारूप शासनास सादर करण्यात आले आहे. विधेयकाचे अधिनियमात रूपांतर होण्यापूर्वी संस्थेत व विद्यापीठात ज्या बाबींचे हस्तांतरण होणार आहे, त्या स्पष्ट होणे आवश्यक असल्याने सामंजस्य करार करण्याच्या सूचना सरकारने दिल्या होत्या. त्यानुसार राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ व लक्ष्मीनारायण तंत्र संस्थेदरम्यान सामंजस्य करार करण्यात आला. विद्यापीठाच्या वतीने कुलसचिव डॉ. राजू हिवसे, तर एलआयटीच्या वतीने संचालक डॉ. राजू मानकर यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली.
विविध बाबींचा सामंजस्य करार
एलआयटीला विद्यापीठापासून विभक्त करून विद्यापीठात रूपांतर करण्याकरिता आवश्यक असलेली जागा विद्यापीठातर्फे हस्तांतरित करणे. विद्यापीठाचे ३ विभाग संस्थेला हस्तांतरित करणे तसेच ३ विभाग विद्यापीठाच्या परिसरात स्थापन करण्याकरिता इमारती, विद्यापीठाचे उपस्कर आणि मनुष्यबळाची भरपाई करण्याबाबत सरकारकडे प्रस्ताव पाठविणे. एलआयटीचे विद्यापीठात रूपांतर झाल्यानंतर संस्थेतील सर्व शिक्षकीय पदे विद्यापीठाद्वारे संस्थेला हस्तांतरित करणे. त्याचप्रमाणे संस्थेत कार्यरत शिक्षकेतर कर्मचाऱ्यांपैकी जे संस्थेत सेवा करण्यास तयार आहेत किंवा विद्यापीठात सेवा करण्यास तयार आहे. याबाबतचा विकल्प संबंधित शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून घेणे. विकल्पानुसार संस्थेतील जे कर्मचारी संस्थेत सेवा करण्यास तयार असतील अशा कर्मचाऱ्यांचे स्थानांतरण करण्यात यावे. त्यांच्या रिक्तपदी नवीन पदे मंजूर करण्याबाबतचा प्रस्ताव सरकारकडे पाठवावा. लक्ष्मीनारायण तंत्रशास्त्र संस्थेचे विद्यापीठ रूपांतर झाल्यानंतर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात नामांकन केलेल्या सर्व विद्यार्थ्यांना एकाच टप्प्यात संस्थेकडे हस्तांतरित करणे. या विविध बाबींचा सामंजस्य करारामध्ये समावेश आहे.