‘जेसीबी' नावाचा साहित्य पुरस्कार नको; बुलडाेजर राजकारणाचे प्रतिक
By निशांत वानखेडे | Published: November 27, 2024 06:55 PM2024-11-27T18:55:26+5:302024-11-27T18:59:52+5:30
देश-विदेशातील साहित्यिक, प्रकाशक, संपादकांचे निषेधपत्र : जेसीबी विध्वंशाचे प्रतिक असल्याचा आराेप
निशांत वानखेडे
नागपूर : पाच वर्षापूर्वी सुरू करण्यात आलेल्या ‘जेसीबी साहित्य पुरस्कार’ या विशिष्ट कंपनीच्या पुरस्कारावरून सध्या देशभरातील साहित्य क्षेत्रात वादळ वादळ उठले आहे. साहित्याशी सुतराम संबंध नसलेल्या या कंपनीच्या नावे सर्वाेच्च रकमेचा पुरस्कार देण्यात येत आहे. अनधिकृत पाडापाड, हिंसेसाठी वापरण्यात येणारे या कंपनीचे उपकरण म्हणजे ‘बुलडाेजर राजकारणा’चे प्रतिक असल्याची टीका करीत या पुरस्काराविराेधात देशभरातील परिवर्तनवादी साहित्यिक, संपादक, प्रकाशकांनी निषेधपत्र लिहिले आहे. परदेशी लेखकांचाही यात समावेश आहे.
जेसीबी साहित्य पुरस्कार २०१८ पासून भारतात सुरू झाला. या पुरस्काराची राशी लेखक व अनुवादक मिळून ३६ लक्ष रुपये असून ती भारतातील सर्वाेच्च ज्ञानपीठ पुरस्कारापेक्षा दुप्पट आहे. विशेष म्हणजे ‘माझ्यातील लेखकाचा मृत्यु झाला’, असे म्हणणारे प्रसिद्ध तमिळ लेखक पेरूमल मुरूगन यांनाही जेसीबी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून यंदाच्या पुरस्कार यादीत महाराष्ट्रातील दलित लेखक शरणकुमार लिंबाळे यांचे नाव चर्चेत आहे.
गेल्या काही दिवसात भारतात या पुरस्काराला विराेध सुरू झाला आहे. विशेषत: सर्वाेच्च न्यायालयाने ‘बुलडाेजर न्याय’ चर्चेत असलेल्या प्रशासनिक कारवाईसंबंधी याचिकेवर सुनावणी करताना केलेल्या टिप्पणीवरून हा विराेध आणखी व्यापक झाला आहे. निषेधपत्रानुसार उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात, आसाम, दिल्ली या राज्यांमध्ये प्रशासनिक अधिकाऱ्यांनी सांप्रदायिक हिंसा किंवा प्रशासनाद्वारे हाेणाऱ्या भेदभावाविराेधात प्रदर्शन करणाऱ्यांना शिक्षा म्हणून ‘बुलडाेजर’द्वारे त्यांची घरे व प्रतिष्ठाने पाडली, उध्वस्त केली. यामध्ये विशिष्ट समुदायालाच लक्ष्य करण्यात आल्याचे या पत्रात नमूद केले आहे. या कारवाईत वारंवार जेसीबीच्या उपकरणांचा उपयाेग करण्यात आला व माध्यमांनी ‘बुलडाेजर न्याय’ याच नावाने ते प्रचारीत केले. विशेष म्हणजे इजराईलने सुद्धा पॅलेस्टाइन लाेकांविराेधात कारवाई करताना याच उपकरणांचा उपयाेग केला.
जेसीबी ही ब्रिटनमधील बांधकाम साहित्य तयार करणारी कंपनी असून तेथील कंजर्वेटिव्ह पक्षाच्या राजकारणासाठी अर्थ पुरवठा करणारी प्रमुख कंपनी आहे. भारतात व इतर देशातही अशाप्रकारे बहुसंख्याकवादी व हिंसक प्रवृत्तीच्या राजकीय शक्तिंना मदत करून नफा कमाविण्याचे काम कंपनीद्वारे हाेत असल्याचा आराेप या लेखकांनी केला आहे. अशा गरीब, शाेषित लाेकांची आयुष्य उध्वस्त करणाऱ्यांच्या नावे लेखकांनी पुरस्कार घेऊ नये, असे आवाहन निवेदनात करण्यात आले आहे. विराेध करणाऱ्यांमध्ये भारतीय लेखक, संपादकांसह अमेरिका, ब्रिटेन, पॅलेस्टाईन, फ्रान्स, युराेपीय साहित्यिकांचाही समावेश आहे.
"आज बुलडाेजर म्हणजे कुणालाही उध्वस्त करण्याचा राजकीय अहंकाराचे प्रतिक हाेय. अशा हिंसक प्रवृत्तीला अधिकृत- अनधिकृत मदत करणाऱ्या कंपनीचा हा प्रचारकी पुरस्कार हाेय. रचनाकार हा सृजन करताे, विध्वंश नाही. त्यामुळे भारतीय लेखकांनी चेतना नष्ट करणारा हा पुरस्कार स्वीकारू नये."
- प्रकाश चंद्रायन, ज्येष्ठ पत्रकार, लेखक
"काेणत्याही कार्पोरेट कंपन्यांनी लाखो रूपये किंमतीचे पुरस्कार देऊच नये व लेखकांनी ते सरसकट स्वीकारूच नये असे कोणीही म्हणत नाही. मात्र पुरस्कारामागे विशिष्टच हेतुंच्याच राजकारणाला व पक्षांना या कंपन्या सत्ताप्राप्तीसाठी, सत्ता टिकवून ठेवण्यासाठी आर्थिक सहकार्य का करतात, त्याची इष्टानिष्टता तपासण्याचा व त्यामागील अनिष्ट राजकारण उघडपणे मांडण्याचाही लोकशाहीत अधिकार आहे."
- श्रीपाद भालचंद्र जोशी, ज्येष्ठ साहित्यिक