साहित्य व कला कुठल्याही सीमेत बंदिस्त राहत नाही : मकरंद अनासपुरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2018 10:34 PM2018-11-17T22:34:48+5:302018-11-18T00:31:30+5:30
साहित्य आणि कला ही नेहमी व्यक्त होणारी कृती आहे. त्यामुळे साहित्य किंवा कला हे मुख्य प्रवाहातील असो वा अंध-अपंगांचे किंवा कुठलेही असो ती कोणत्याही सीमेत बंदिस्त राहत नाही. म्हणून साहित्यिक व कवी यांचे समाजातील स्थान अतिशय महत्त्वपूर्ण आहे, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध सिने अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी येथे केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : साहित्य आणि कला ही नेहमी व्यक्त होणारी कृती आहे. त्यामुळे साहित्य किंवा कला हे मुख्य प्रवाहातील असो वा अंध-अपंगांचे किंवा कुठलेही असो ती कोणत्याही सीमेत बंदिस्त राहत नाही. म्हणून साहित्यिक व कवी यांचे समाजातील स्थान अतिशय महत्त्वपूर्ण आहे, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध सिने अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी येथे केले.
समाजोत्थान अंध व अपंग सामाजिक कल्याणकारी संस्था चंद्रपूर आणि इंडियन युथ अॅण्ड वूमेन्स डेव्हलपमेंट सोसायटी नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने तिसरे राज्यस्तरीय अंध व अपंगांचे समाजोत्थान साहित्य व कला संमेलन सिव्हिल लाईन्स येथील डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. या दोन दिवसीय संमेलनाचे उद्घाटन अनासपुरे यांच्या हस्ते शनिवारी पार पडले. त्यावेळी उद्घाटक म्हणून ते बोलत होते. ज्येष्ठ साहित्यिक अनंत विष्णू ढोले हे या संमेलनाचे संमेलनाध्यक्ष आहेत तर आ. प्रकाश गजभिये हे या संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत. याप्रसंगी जि.प. अध्यक्ष निशा सावरकर, प्रसिद्ध कवी व हास्य अभिनेते एहसान कुरेशी, ज्येष्ठ संपादक प्रकाश पोहरे, पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, शुअरटेक रुग्णालयाचे संचालक डॉ. राजू देशमुख, डॉ. उदय बोधनकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अपंग सेलचे प्रदेशाध्यक्ष सुहास तेंडुलकर, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई अपंग हक्क विकास मंचचे संयोजक विजय कान्हेकर प्रामुख्याने उपस्थित होते.
मकरंद अनासपुरे म्हणाले, दिव्यांग असणे आपल्या हातात नाही. परंतु त्याचे मूळ शोधणे आवश्यक आहे. आज विकासाच्या नावावर १०० वर्षे जुने झाडे तोडली जात आहेत. इतकी जुनी झाडे तोडून आपण कुठला विकास साधणार आहोत. ती झाडे पुन्हा लावण्यात आली की नाही, याकडेही आपण लक्ष देत नाही. संवेदनाच संपली आहे. आपल्याला दृष्टी मिळाली, परंतु मनाची दृष्टी आपण पाहणार आहोत की नाही? निसर्ग हळूहळू बोलू लागला आहे. केरळमध्ये जी आपत्ती आली, ते याचे ताजे उदाहरण आहे. निसर्ग असाच बोलायला लागला तर भयंकर होईल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. टिळा लावणारा प्रत्येक माणूस हा धार्मिक असेलच असे मी मानायला तयार नाही. विचार महत्त्वाचा आहे. कारण विचारच मनुष्याला घडवतो आणि बिघडवतो. त्यामुळे वैचारिक आदानप्रदान होत राहावे, परंतु सुसंवाद घडण्यासाठी समोरच व्यक्तीही तशीच असायला हवी, असेही अनासपुरे यांनी स्पष्ट केले.
यावेळी पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी कला व संगीतात खूप ताकद असल्याचे सांगितले. कला व संगीतामुळे तुरुंगातून कैद्यांचे वर्तन कसे सुधारले याचे उदाहरणच त्यांनी यावेळी दिले.
डॉ. राजू देशमुख यांनी अंध व अपंगांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. प्रकाश पोहरे यांनीही अंध व अपंगांकडे सकरात्मकपणे पाहावे, असे आवाहन केले. आ. प्रकाश गजभिये यांनी स्वागतपर भाषण केले. समाजोत्थानच्या अध्यक्ष साजिदा शेख-मेश्राम यांनी प्रास्ताविक केले. डॉ. बळवंत भोयर यांनी संचालन केले. रेवानंद मेश्राम यांनी आभार मानले.
संवेदनशील मकरंदचा पुन्हा प्रत्यय
मकरंद अनासपुरे हा सुप्रसिद्ध सिनेअभिनेता. विशेषता तो हास्य अभिनेता म्हणून ओळखला जातो. परंतु या हास्य अभिनेत्यामधील संवेदनशील मनुष्याचा परिचय नाम फाऊंडेशनच्या माध्यमातून सर्वांनाच परिचित आहे. या फाऊंडेशनच्या माध्यमातून नाना पाटेकर आणि मकरंद हे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदत करीत असतात. तसेच कुणीही शेतकऱ्याने आत्महत्या करू नये, यासाठी प्रयत्नशील आहेत. शनिवारी अंध व अपंग साहित्य संमेलनातही मकरंदमधील संवेदनशीलतेचा परिचय सर्वांना आला. सुमन नावाची अपंग असलेली भगिनी जेव्हा व्यासपीठावर आली तेव्हा मकरंद खाली बसले आणि तिची विचारपूस करू लागले. सुमन ही बुलडाण्याची असून तिला नोकरीची गरज असल्याचे तिने सांगितले. तेव्हा मकरंद यांनी आपल्या भाषणात सुमनला मदत करावी , असे आवाहन केले.
नाम फाऊंडेशनला २० हजाराची मदत
यावेळी डॉ. उदय बोधनकर यांनी १५ हजार रुपये आणि पी.जी. भोसले यांनी ५ हजार रुपये अशी एकूण २० हजार रुपयाची मदत नाम फाऊंडेशनसाठी मकरंद अनासपुरे यांना प्रदान केली.
चौघांचा सत्कार
यावेळी अंध व अपंगांसाठी काम करणारे प्रदीप देशमुख (चंद्रपूर), सुनील दापोरेकर (जळगाव), प्रभा मेश्राम चाळिसगाव, आणि बुलडाण्यातील सुमन सरदार यांचा सिने अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
नवीन शब्दप्रयोगापेक्षा सहिष्णू वागणुकीची गरज - संमेलनाध्यक्ष अनंत विष्णू ढोले
संमेलनाध्यक्ष विष्णू अनंत ढोले यांनी आपल्या भाषणात अंध व अपंगांच्या व्यथा मांडल्या. ते म्हणाले, आपल्या देशात सुधारणा करण्यासाठी सुद्धा कायदे करावे लागतात. तेच मात्र मोकळ्या मनाने, मानवतावादी दृष्टिकोन ठेवून करता येण्यासारखे आहे, हे आपण विसरून जातो. नवीन शब्दप्रयोग वापरल्याने कुणाच्याही जीवनातील अंधार नष्ट करता येणार नाही किंवा कुणाचेही परावलंबित्व दूर करता येऊ शकत नाही. त्यासाठी समाज सुधारणांची व सहज शक्य अशा सहिष्णू वागणुकीची गरज आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
एहसान कुरेशीचा हास्यविनोद अन् मान्यवरांची शायरी
या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण असलेल्या एहसान कुरेशी यांनी आपल्या हास्यविनोदांनी उपस्थितांची मने जिंकली. नागपूरवाले तो छा गये. असे म्हणत त्याने कार्यक्रमाची सुरुवात केली. कुकर आणि कढई यांच्या भांडणावरील प्रसिद्ध कविताही त्याने सादर केली. सध्या देशात २४ ज्युनिअर एहसान कुरेशी असल्याचे सांगत आपल्या विशिष्ट शैलीने कविता पठण करीत ‘मी ओरिजनलच आहे, याची पावतीही त्याने दिली. हास्यविनोद करता-करता ‘ यहा चेहरे नही, इन्सान पढे जाते है, या एक साथ गीता और कुराण पढे जाते है’ या शायरीने त्याने भारताच्या महानतेचा परिचयही करून दिला. एहसान कुरेशीसोबतच या कार्यक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य ठरले, ते म्हणजे मान्यवरांच्या शेरोशायरीचे. डॉ. भूषणकुमार उपाध्याय, एहसान कुरेशी आदींनी आपल्या शायरीने लोकांची मने जिंकली. इतकेच नव्हे तर स्वागताध्यक्ष आ. प्रकाश गजभिये यांनीही शायरीने पाहुण्यांचा परिचय करून दिला. पत्नीवर त्यांनी सादर केलेल्या कवितेचे सर्वांनीच कौतुक केले. त्यांची मुलगी स्वरांजली गजभिये हिनेही इंग्रजीत कविता सादर केली.