साहित्यिक आणि रसिकांनो, संमेलनात सहभागी व्हा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2019 01:14 AM2019-01-11T01:14:51+5:302019-01-11T01:16:43+5:30
यवतमाळ नगरीत ज्येष्ठ मराठी साहित्यिक-विदुषी डॉ. अरुणा ढेरे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारपासून ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला प्रारंभ होत आहे. संमेलनाच्या पार्श्वभूमीवर घडलेला घटनाक्रम दुर्दैवी आहे व आम्हीही त्याचा निषेध करतो. मात्र साहित्यिक व रसिकांनी संमेलनावर त्याचा राग काढू नये. मराठी भाषा आणि साहित्यावर निखळ प्रेम करणाऱ्या तमाम साहित्यिक व रसिकांनी त्यात सहभागी व्हावे, असे आवाहन विदर्भातील साहित्यिकांनी केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : यवतमाळ नगरीत ज्येष्ठ मराठी साहित्यिक-विदुषी डॉ. अरुणा ढेरे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारपासून ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला प्रारंभ होत आहे. संमेलनाच्या पार्श्वभूमीवर घडलेला घटनाक्रम दुर्दैवी आहे व आम्हीही त्याचा निषेध करतो. मात्र साहित्यिक व रसिकांनी संमेलनावर त्याचा राग काढू नये. मराठी भाषा आणि साहित्यावर निखळ प्रेम करणाऱ्या तमाम साहित्यिक व रसिकांनी त्यात सहभागी व्हावे, असे आवाहन विदर्भातील साहित्यिकांनी केले आहे.
या निवेदनात नागपूरसह विदर्भातील ज्येष्ठ साहित्यिक, कलावंत व निवेदकांचाही समावेश आहे. तब्बल ४५ वर्षांनी यवतमाळात होत असलेल्या या संमेलनात निवडणुकीशिवाय महिलेला अध्यक्षपदाचा सन्मान लाभला आहे. १४१ वर्षांच्या इतिहासात महिला संमेलनाध्यक्ष होण्याची ही जेमतेम पाचवी वेळ आहे. कुठल्याही वादात न अडकणाऱ्या अरुणा ढेरे यांच्या अध्यक्षपदाचे स्वागत व सन्मान व्हावा, अशी अपेक्षा निवेदनात करण्यात आली आहे.
आपल्या मराठी भाषेला असलेली साहित्य संमेलनांची उज्ज्वलतम, महान आणि पृथगात्म अशी परंपरा सर्व भारतीय भाषाभगिनींमध्ये एकमेवाद्वितीय आहे. ती लक्षात घेता अवघ्या मराठी भाषकांच्या या साहित्य-संस्कृतीच्या वार्षिकोत्सवात सर्व रसिकांनी व साहित्यिकांनी सहभागी व्हावे, असे विनम्र आवाहन साहित्यिकांनी केले. यामध्ये ज्येष्ठ साहित्यिक आशा बगे व माजी संमेलनाध्यक्ष डॉ. अक्षयकुमार काळे यांच्यासह डॉ. वि.स जोग, विवेक घळसासी, डॉ. हरिश्चंद्र बोरकर, डॉ. मदन कुलकर्णी, डॉ. रवींद्र शोभणे, डॉ. कुमार शास्त्री, डॉ. मिर्झा रफी अहमद बेग, प्रकाश एदलाबादकर, डॉ. पराग घोंगे, शुभांगी भडभडे, ज्ञानेश्वर महाराज वाघ, लखनसिंग कटरे, सुप्रिया अय्यर, डॉ. राजन जयस्वाल, प्रा. सुरेश देशपांडे, आशुतोष अडोणी, डॉ. राजेंद्र नाईकवाडे, अनिल सांबरे, डॉ. सुमंत देशपांडे, डॉ. अरविंद देशमुख, डॉ. उत्तम रुद्रावार, विंग कमांडर अशोक मोटे, कर्नल अभय पटवर्धन, सतीश तराळ, वसंत वाहोकर, अनिल शेंडे, श्याम माधव धोंड, मोहिनी मोडक, स्वाती दामोदरे, रवींद्र देशपांडे, डॉ. स्वानंद पुंड, हेमंत खडके, विवेक कवठेकर, श्रीपाद कोठे, आशाताई पांडे, इसादास भडके, सदानंद बोरकर, प्रशांत आरवे, इरफान शेख, डॉ. सुभाष लोहे, डॉ. राम आर्वीकर, रेणुका देशकर, डॉ. मोना चिमोटे डॉ. राजा धर्माधिकारी, विष्णू सोळंके, श्रीपाद प्रभाकर जोशी, डॉ. अविनाश मोहरील, डॉ. संध्या अमृते, डॉ. रमा गोळवलकर,चंद्रकांत लाखे, सचिन उपाध्याय, मकरंद कुलकर्णी, मनीषा अतुल, डॉ. अमृता इंदूरकर, डॉ. कोमल ठाकरे, डॉ. संजय पोहरकर, बन्सी कोठेवार, मीनल येवले यांचा समावेश आहे.
पत्रकारांचेही आवाहन
साहित्य संमेलनाबद्दल झालेला वाद दुर्दैवी असला तरी साहित्यिकांनी, वाचकांनी, रसिकांनी विचलित न होता या संमेलनात मोठ्या संख्येने भाग घेऊन मराठी भाषेचा हा उत्सव थाटात साजरा करावा, असे कळकळीचे आवाहन नागपुरातील ज्येष्ठ पत्रकारांनी केले आहे. महाराष्ट्र श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रदीपकुमार मैत्र, नागपूरचे अध्यक्ष शिरीष बोरकर, सरचिटणीस ब्रह्माशंकर त्रिपाठी, मुंबई प्रेस क्लबचे सभापती धर्मेंद्र जोरे, ज्येष्ठ संपादक ल. त्र्यं. जोशी, विनोद देशमुख, अनंत कोळमकर, अविनाश पाठक आदींचा समावेश आहे. साहित्य संमेलन हा महाराष्ट्राचा सन्मान आहे आणि तो कोणत्याही परिस्थितीत कायम राखला जाणे आवश्यक आहे. नयनतारा सहगल यांच्यासारख्या ज्येष्ठ लेखिकेला आमंत्रण देऊन नंतर ते मागे घेण्याचा प्रकार संतापजनक आणि निषेधार्हच आहे. पाहुण्यांशी असे वागणे विदर्भाच्या आतिथ्यशील संस्कृतीला शोभणारे नक्कीच नाही. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि संमेलनाला गालबोट लावणाऱ्यांचा बुरखा फाडला गेला पाहिजे, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.