साहित्य म्हणजे समाजाचा विचारबंध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2017 01:27 AM2017-08-30T01:27:53+5:302017-08-30T01:29:01+5:30

कुठल्याही लेखकाचे साहित्य हे केवळ त्याच्या एकट्याच्या स्वानुभावाची साहित्यकृती नसते तर तो समाजाचा विचारबंध असतो.

Literature is the idea of ​​society | साहित्य म्हणजे समाजाचा विचारबंध

साहित्य म्हणजे समाजाचा विचारबंध

Next
ठळक मुद्देवसंत आबाजी डहाके : ‘अस्मितादर्शची ५० वर्षे’निमित्त राष्ट्रीय चर्चासत्र

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कुठल्याही लेखकाचे साहित्य हे केवळ त्याच्या एकट्याच्या स्वानुभावाची साहित्यकृती नसते तर तो समाजाचा विचारबंध असतो. मागच्या ५० वर्षांपासून असा विचारबंध बांधण्याचे काम अस्मितादर्श या नियतकालिकाने केले आहे, असे गौरवोद्गार ज्येष्ठ समीक्षक वसंत आबाजी डहाके यांनी काढले. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ व पीडब्ल्यूएस कला व वाणिज्य महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार २९ आॅगस्ट रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत सिद्धार्थ सभागृह, पीडब्ल्यूएस कॉलेज येथे ‘अस्मितादर्शची ५० वर्षे’ या विषयावर राष्ट्रीय चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. या चर्चासत्राचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते.
यावेळी मंचावर उद्घाटनीय सत्राचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ. गंगाधर पानतावणे, डॉ. मधुकर वासनिक व छत्तीसगड मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष कपूर वासनिक उपस्थित होते. अस्मितादर्श या नियतकालिकाची ५० वर्षे आणि पीडब्ल्यूएस कॉलेजची ५० वर्षे असा एकत्र योग साधून आयोजित करण्यात आलेल्या या चर्चासत्रात डहाके पुढे म्हणाले, अस्मितादर्शने साहित्यातील केवळ पारंपरिक विचारांनाच नाकारले नाही तर ललित आणि समाजाभिमुख वैचारिक साहित्याला नवी दिशा दिली. रूपवादी समीक्षेभोवती फिरणारी समीक्षा सामाजिक सुंदरतेत शोधली. समाजातील वेगवेगळ्या विषयांवर चर्चा घडवून आणत साहित्याद्वारे जनजागृतीची चळवळ उभारली. डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी अध्यक्षीय भाषणात म्हणाले, नियतकालिकांच्या सेवेचा आदर्श डॉ. पानतावणे यांच्याकडून घ्यावा असाच आहे. ताठ मानेने जगायला शिकविणाºया जगातील ज्येष्ठ नियतकालिकांमध्ये अस्मितादर्शचे स्थान आहे. अस्मितादर्श हे केवळ दलितांचे नव्हे तर प्रत्येक संवेदनशील मनाच्या जाणिवांचे व्यासपीठ आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
कार्यक्रमाची भूमिका डॉ. इंद्रजित ओरके यांनी मांडली. संचालन डॉ. मनीषा नागपुरे यांनी केले. उद्घाटनीय सत्रानंंतर ‘अस्मितादर्शची ५० वर्षे आणि मराठी वाड्मयीन नियतकालिके’ या विषयावर डॉ. विलास चिंतामण देशपांडे यांच्या अध्यक्षतेत डॉ. अनिल नितनवरे यांनी तर ‘मराठीतील वैचारिक नियतकालिकांची सद्यस्थिती’ या विषयावर डॉ. अजय देशपांडे यांनी विचार मांडले. संध्याकाळी डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांच्या अध्यक्षतेत या चर्चासत्राचा समारोप झाला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून कपूर वासनिक, डॉ. अपर्णा लांजेवार, अ‍ॅड. पी. जी. लांजेवार व मोहन वासनिक उपस्थित होते.

परिवर्तनवादी लेखकांनी अस्मितादर्शला उभे केले
अस्मितादर्श ही एक वाङ्मयीन व सांस्कृतिक चळवळ आहे. विचारातून वाङ्मयीन जाणिवा निर्माण होऊ शकतात, हे अस्मितादर्शने सिद्ध केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या निर्वाणानंतर निर्माण झालेली सामाजिक, सांस्कृतिक, वैचारिक पोकळी आणि परिणामस्वरूप येणाºया सामाजिक, सांस्कृतिक आक्रमणास समर्थपणे रोखण्यासाठी अस्मितादर्शने आपल्या परीने निश्चित भक्कम योगदान दिले आहे. अस्मितादर्शच्या या प्रवासात वि. स. खांडेकर, बाबा आमटे, राम शेवाळकर यांच्यासारख्या परिवर्तनवादी लेखकांनी मोठी साथ दिली, अशी भावना अस्मितादर्शचे संपादक व ज्येष्ठ साहित्यिक डॉ. गंगाधर पानतावणे यांनी व्यक्त केली. या कार्यक्रमात त्यांचा महाविद्यालय व विविध संस्थांतर्फे भावपूर्ण सत्कार करण्यात आला.
महामंडळाच्या प्रवासातील क्रांतिकारी टप्पा
अस्मितादर्शचा वैचारिक प्रवास व अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे कार्यक्षेत्र यात कायम एक अदृश्य अंतर राहिले. अस्मितादर्शचे नाते फुले-आंबेडकरांच्या सम्यक विचारांशी आणि त्यांच्या नवसमाज निर्मितीच्या स्वप्नांशी जुळलेले होते तर महामंडळ साहित्यातील एका विशिष्ट प्रवाहाच्या पलीकडे जाताना कधी फारसे दिसले नाही. अशा स्थितीत अस्मितादर्शच्या अर्धशतकी प्रवासाचे कौतुक करण्यासाठी महामंडळ पुढाकार घेत असेल तर निश्चितच महामंडळाच्या प्रवासातील हा परिवर्तनवादी व क्रांतिकारी टप्पा आहे.

Web Title: Literature is the idea of ​​society

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.