नागपुरात जगभरातील मराठी प्रेरणादूतांची साहित्यिक मांदियाळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2018 09:23 PM2018-12-21T21:23:26+5:302018-12-21T21:43:11+5:30
जागतिक मराठी अकादमीच्यावतीने घेण्यात येणारे ‘शोध मराठी मनाचा’ या शीर्षकाखालील १६ व्या जागतिक मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन येत्या ४, ५ व ६ जानेवारी २०१९ यादरम्यान होणार आहे. देशातच नव्हे तर जगभरात स्वत:च्या कर्तृत्वाने मराठीचा झेंडा रोवणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचे एकत्रित मार्गदर्शन व्हावे व यातून ‘संधी अभावी आम्ही काहीच करू शकत नाही’ अशा मानसिकतेची मराठी तरुणांवर आलेली मरगळ झटकता यावी, हा प्रयत्न या जागतिक संमेलनाच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याची माहिती संमेलनाचे संयोजक गिरीश गांधी यांनी शुक्रवारी पत्रपरिषदेत दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जागतिक मराठी अकादमीच्यावतीने घेण्यात येणारे ‘शोध मराठी मनाचा’ या शीर्षकाखालील १६ व्या जागतिक मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन येत्या ४, ५ व ६ जानेवारी २०१९ यादरम्यान होणार आहे. देशातच नव्हे तर जगभरात स्वत:च्या कर्तृत्वाने मराठीचा झेंडा रोवणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचे एकत्रित मार्गदर्शन व्हावे व यातून ‘संधी अभावी आम्ही काहीच करू शकत नाही’ अशा मानसिकतेची मराठी तरुणांवर आलेली मरगळ झटकता यावी, हा प्रयत्न या जागतिक संमेलनाच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याची माहिती संमेलनाचे संयोजक गिरीश गांधी यांनी शुक्रवारी पत्रपरिषदेत दिली.
संमेलनाचे स्वागताध्यक्ष पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे या पत्रपरिषदेला उपस्थित होते. व्हीआयपी रोडवरील वनामतीच्या सभागृहात हे संमेलन होऊ घातले असून अमेरिकेचे उद्योजक श्रीनिवास ठाणेदार हे संमेलनाचे अध्यक्ष आहेत. पहिल्या दिवशी उद्घाटनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजता ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार आणि त्याच दिवशी दुपारी ३.३० वाजता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची मुलाखत या संमेलनाचे प्रमुख आकर्षण ठरणार आहेत. गिरीश गांधी यांनी दिलेल्या माहितीनुसार ४ जानेवारी रोजी दुपारी १ वाजता संमेलनाचे उद्घाटन होईल. यावेळी उद्घाटक म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व देशाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहतील. मुख्यमंत्र्यांच्या मुलाखतीनंतर संमेलनाध्यक्ष डॉ. ठाणेदार हे मनोगत व्यक्त करतील. दुपारी ४ वाजता ‘साता समुद्रापलिकडे’ या विशेष कार्यक्रमात विविध देशात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविणारे युएईचे राहुल घोरपडे, युएसएचे किशोर गोरे, फ्रान्सचे अमित केवल पाटील, युकेचे आर्या टावरे, नेदरलँडच्या वृंदा ठाकूर, स्वीडनचे योगेश दशरथ, ओमानचे के.के. टावरी व जपानचे महेश देशपांडे यांचे मनोगत ऐकायला मिळेल. सायंकाळी ७.३० वाजता रामदास भटकळ यांचे लेखन, वृषाली देशपांडे यांचे दिग्दर्शन आसिना पंडित यांची निर्मिती असलेले ‘जगदंबा’ या नाटकाचे सादरीकरण होईल.
५ जानेवारीला सकाळी ११.३० वाजता दुसºया सत्रात ‘साता समुद्रापलिकडे - भाग २’ या सदरात राम व रवींद्र काळे, डॉ. मॅक जावडेकर, सुचिता उन्नीथन, अतुल खानझोडे, अशोक विखे पाटील, डॉ. अनिल नेरुरकर व गोरख सिरसीकर यांचे मनोगत होईल.
दुपारी २ वाजताच्या ‘शून्यातून शिखराकडे’ या सदरात विविध क्षेत्रात कार्यरत विलास काळे, अतुल पांडे, नरेंद्र हेटे, विवेक देशपांडे, मनीष नुवाल, अनिल सोमलवार, शशिकांत चौधरी, प्रकाश वाघमारे, अनिल नायर यांच्या मुलाखती होतील. दुपारी ४.३० वाजता प्रसिद्ध उद्योजक पद्मश्री कल्पना सरोज यांची मुलाखत होईल. सायंकाळी ५.२५ वाजता ‘भारत विरुद्ध इंडिया’ या विषयावर परिसंवाद होणार असून यामध्ये यशवंतराव गडाख पाटील, विजय जावंधिया, शरद पाटील, ललित बहाळे, गिरीश गांधी, आदिवासी कवी तुकाराम धांडे व भरत दौंडकर यांचा सहभाग राहील. सायंकाळी ६.३० वाजता हनमंत गायकवाड यांची मुलाखत होईल तर सायंकाळी ७.३० वाजता चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे व किशोर कदम यांच्या उपस्थितीत ‘चित्र, शिल्प व काव्य’ हा अनोखा कार्यक्रम सादर होईल. ६ जानेवारी रोजी ‘मराठी : काल, आज आणि उद्या’ या विषयावर मुलाखत कार्यक्रम होईल व यामध्ये जयंत साळगावकर, डॉ. रवींद्र शोभणे, सुधाकर गायधनी, उल्हास पवार, डॉ. प्रकाश खरात, आशा बगे, अरुणा सबाने, भारत देसडला यांचा सहभाग असेल. सकाळी ११.३० वाजता ‘तेथे कर माझे जुळती’ या सदरात सेवाकार्यात आयुष्य वाहिलेल्या शफीक व सरहा शेख, प्रमोद चांदुरकर, रोमी भिंदर व जिल्हापरिषद शाळेचे शिक्षक मुबारक सय्यद यांच्या मुलाखती होतील. दुपारी २.३० वाजता ‘सरहद ओलांडताना’ या सदरात संजय निहार व गजानन नारे यांची मुलाखत होईल. सायंकाळी ५ वाजता या तीन दिवसीय संमेलनाचा समारोप पार पडेल. यावेळी पद्मश्री डॉ. डी.वाय. पाटील, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट, माजी खासदार विजय दर्डा, माजी मंत्री अनिल देशमुख व जयंत पाटील प्रामुख्याने उपस्थित राहतील. साहित्य प्रेमी व महाविद्यालयीन तरुणांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन बावनकुळे यांनी केले. पत्रपरिषदेला अकादमीचे अध्यक्ष रामदास फुटाणे उपस्थित होते.