छोट्या मुलाला मोटरसायकलवर पाहिले

By admin | Published: January 13, 2015 01:02 AM2015-01-13T01:02:58+5:302015-01-13T01:02:58+5:30

इटनगोटी तलावाच्या पंप हाऊसजवळ मी व माझ्या मैत्रिणीने आरोपींच्या मोटरसायकलवर मध्यभागी छोट्या मुलाला झोपलेल्या अवस्थेत पाहिले, अशी बेधडक साक्ष सावनेर तालुक्याच्या चांपा

The little boy looked at the motorcycle | छोट्या मुलाला मोटरसायकलवर पाहिले

छोट्या मुलाला मोटरसायकलवर पाहिले

Next

न्यायालय : शाळकरी मुलीची बेधडक साक्ष
नागपूर : इटनगोटी तलावाच्या पंप हाऊसजवळ मी व माझ्या मैत्रिणीने आरोपींच्या मोटरसायकलवर मध्यभागी छोट्या मुलाला झोपलेल्या अवस्थेत पाहिले, अशी बेधडक साक्ष सावनेर तालुक्याच्या चांपा येथील एका शाळकरी मुलीने प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश किशोर सोनवणे यांच्या न्यायालयात सुरू असलेल्या बहुचर्चित युग चांडक अपहरण-खून खटल्याच्या सुनावणीदरम्यान दिली.
दिव्या दीपकसिंग चंदेल, असे या शाळकरी मुलीचे नाव आहे. ती पाटणसावंगी येथील आदर्श विद्यालयाची विद्यार्थिनी आहे. आपल्या सरतपासणी साक्षीत या मुलीने सांगितले की, १ सप्टेंबर २०१४ रोजी सायंकाळी ५.१५ वाजताच्या सुमारास मी आणि माझी वर्गमैत्रीण तनुश्री केचे शाळेतून आपापल्या सायकलने घराकडे परतत होतो. इटनगोटी तलावाच्या पंप हाऊसजवळून जात असताना आम्हाला एक मोटरसायकल उभी दिसली. मोटरसायकलवर तीन जण होते. आम्हाला पाहून चालकाने मोटरसायकल सुरू करून आमच्या दिशेने आणली.
मोटरसायकल चालविणारा बदामी रंगाचा शर्ट घातलेला होता. मागे बसलेला लाल रंगाचा हाफ टी-शर्ट घातलेला होता. या दोघांच्या मध्ये एक मुलगा होता, तो झोपेलेल्या अवस्थेत होता. आम्ही त्यांना पांदण मार्गाने पाटणसावंगीकडे जाताना पाहिले. हे सर्व सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास घडले.
गावात पोलीस एका मुलाचा फोटो घेऊन आले. फोटो पाहताच मला मी मोटर पंपजवळ पाहिलेला घटनाक्रम आठवला.
तो मी पोलिसांना सांगितला. मोटरसायकल चालविणारे १८-२० वयोगटातील होते. या मुलीला न्यायालयात युगचा फोटो दाखविला असता तो तिने ओळखला. या मुलीने आपली साक्ष देताना पुढे सांगितले की, ओळख परेडसाठी नागपूर मध्यवर्ती कारागृहात हजर होण्याकरिता एका पोलीस कर्मचाऱ्याने पत्र आणून दिले होते. २५ सप्टेंबर रोजी कारागृहात गेली. तेथे दोन रांगांमध्ये लोकांना उभे करण्यात आले होते.
आपणास आरोपींना ओळखण्यास सांगण्यात आले होते. आपण आरोपींना ओळखले. घटनेच्या दिवशी मोटरसायकलवर ते आरोपी होते. या मुलीने न्यायालयातही दोन्ही आरोपींना ओळखले. त्यांच्या अंगावरील आणि मोटरसायकलवर त्यांच्या मध्ये बसलेल्या मुलाचेही कपडे ओळखले. (प्रतिनिधी)
तिने अंतराचे प्रात्यक्षिक करून दाखविले
उलटतपासणी साक्ष देताना ती म्हणाली, हे खरे आहे की आपण मोटरसायकलस्वारांना अंदाजे १५ फुटाच्या अंतरावरून पाहिले. तिने या अंतराबाबत न्यायालयात प्रात्यक्षिक करून दाखविले. ज्या ठिकाणी उभी राहून ती साक्ष देत होती, तेथून खिडकीपर्यंतचे अंतर असल्याचे तिने सांगितले. न्यायालयात तांदुळवाणी येथील श्रीराम खडतकर, बकऱ्या चारणारा नामदेव ढवळे, वर्धमाननगर येथील दीपक पुगलिया, शैलेश जोशी यांचीही साक्ष तपासण्यात आली. न्यायालयात सरकार पक्षाच्या वतीने अतिरिक्त सरकारी वकील ज्योती वजानी आणि सरकार पक्षाला सहाय्य म्हणून फिर्यादी डॉ. मुकेश चांडक यांच्यावतीने अ‍ॅड. राजेंद्र डागा तर बचाव पक्षाच्या वतीने अ‍ॅड. प्रदीप अग्रवाल, अ‍ॅड. मनमोहन उपाध्याय आणि अ‍ॅड. प्रमोद उपाध्याय यांनी काम पाहिले. पोलीस निरीक्षक सत्यनारायण जयस्वाल हे तपास अधिकारी आहेत.

Web Title: The little boy looked at the motorcycle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.