'त्या' महिलेची हत्या करणारा निघाला ‘लिव्ह इन पार्टनर’; भावाच्या मदतीने फेकला मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2022 11:32 AM2022-12-01T11:32:08+5:302022-12-01T11:47:08+5:30

कळमन्यातील घटनेचे गूढ उकलले

'Live in partner' turns out to be the killer of a woman found dead in a farm in Kalamna Nagpur | 'त्या' महिलेची हत्या करणारा निघाला ‘लिव्ह इन पार्टनर’; भावाच्या मदतीने फेकला मृतदेह

'त्या' महिलेची हत्या करणारा निघाला ‘लिव्ह इन पार्टनर’; भावाच्या मदतीने फेकला मृतदेह

Next

नागपूर : कळमना येथील शेतात मृतावस्थेत आढळलेल्या महिलेच्या हत्येचे गूढ दोन दिवसांनी उकलले आहे. तिच्या लिव्ह इन पार्टनरनेच तिची हत्या केली. दोघांमध्ये संशयावरून वाद झाला व त्यातून तिच्या पार्टनरने तिची हत्या केली. त्याने भावाच्या मदतीने मृतदेह शेतात आणून फेकला. रजनी राधेश्याम पेंदाम (२७) असे मृत महिलेचे नाव असून, पोलिसांनी घनश्याम सुधाकर उईके (३३, नवकन्या नगर) तसेच त्याचा भाऊ लोकेश उईके (२३, विजय नगर) यांना अटक केली आहे.

दोन दिवसांअगोदर कळमना पोलिस ठाण्याच्या हद्दीत महिलेचा मृतदेह आढळला होता. तिच्या हातावर आर असे कोंदलेले होते. पोलिसांना खबऱ्यांच्या मार्फत तिच्या आईची माहिती कळाली. आईने मृतदेहाची ओळख पटविली व रजनी पती व मुलांना सोडून तीन वर्षांपासून घनश्यामसोबत वेगळी राहत होती. घनश्यामच्या पत्नीचा मृत्यू झाला असून त्याची मुले आजी-आजोबांकडे राहतात.

रजनी आणि घनश्याम हे कामगार म्हणून काम करायचे. ते एकमेकांवर संशय घेत असत, त्यामुळे त्यांच्यात नेहमी वाद व्हायचे. घनश्याम २७ नोव्हेंबरला दुपारी ४ वाजता कामावरून घरी पोहोचला. घरी उशिरा येण्यावरून रजनीशी त्याचा वाद झाला. दरम्यान, घनश्यामने रजनीला खाली पाडले व तिचे डोके जमिनीवर आपटले. त्यानंतर दुपट्ट्याने तिचा गळा आवळून तिची हत्या केली. ही घटना उघडकीस आल्यावर पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली. उपायुक्त श्रावण दत्त यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक विनोद पाटील, देवाजी नरोटे, राहुल सावंत, उत्तम जायभाये, विवेक झिंगरे, गंगाधर मुरकुटे, अजय गर्जे, दीपक धानोरकर, रवी साहू यांच्या पथकाने ही कारवाई केली.

दुचाकीवरून नेला मृतदेह

घनश्यामने रजनीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी भाऊ लोकेश याला रात्री अकरा वाजता दुचाकीने घरी बोलावले. त्याने रजनीचा मृतदेह चादरने गुंडाळला व कळमना येथील पावन गावाजवळील शेतात तिचा मृतदेह फेकून दिला. रजनीच्या आईने दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी घनश्यामला ताब्यात घेतले. सुरुवातीला तो उडवाउडवीची उत्तरे देत होता. मात्र त्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी घनश्याम व लोकेशला अटक केली आहे.

Web Title: 'Live in partner' turns out to be the killer of a woman found dead in a farm in Kalamna Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.