गोरगरिबांची रोजीरोटी चालू द्यावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:07 AM2021-05-26T04:07:46+5:302021-05-26T04:07:46+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : आम्हाला कुणी मदत केली नाही तरी चालेल. मात्र, आमच्यासारख्या गरिबांची रोजीरोटी चालू द्यावी, अशी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आम्हाला कुणी मदत केली नाही तरी चालेल. मात्र, आमच्यासारख्या गरिबांची रोजीरोटी चालू द्यावी, अशी माफक अपेक्षा वृद्ध भाजी विक्रेत्या ज्योती थोरात यांनी व्यक्त केली. ठिकठिकाणच्या आठवडी बाजारात फिरून रस्त्यावर भाजी विकणाऱ्या वृद्ध थोरात यांची भाजी जरीपटक्यातील पोलीस उपनिरीक्षक संतोष खांडेकर यांनी गेल्या मंगळवारी रस्त्यावर इतस्ततः फेकून दिली होती. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला. ‘लोकमत’ने सर्वप्रथम हे वृत्त प्रकाशित केल्यामुळे सर्व स्तरातून तीव्र निषेधाचा सूर उमटला. पोलीस विभागाने या प्रकरणाबद्दल दिलगिरी व्यक्त करून खांडेकर यांना ‘शो कॉज’ नोटीस बजावली. त्यांची खातेनिहाय चौकशीही सुरू आहे. या पार्श्वभूमीवर, मंगळवारी भाजी विक्रेत्या थोरात यांच्याशी ‘लोकमत’ प्रतिनिधीने चर्चा केली. थोरात निराधार आहेत. जरीपटका येथील समतानगरात त्या राहतात. त्यांना एक विवाहित मुलगी असून, ती आपल्या कुटुंबीयांसह जरीपटक्यातच राहते. स्वाभिमानी थोरात ठिकठिकाणच्या आठवडी बाजारात भाजीचे दुकान लावून आपला उदरनिर्वाह चालवितात. झालेल्या घटनेसंदर्भात त्यांना विचारणा केली असता त्यांनी मला याबाबत काही बोलायचे नाही, असे म्हटले. मला कुणाबद्दल काही तक्रार नाही. कुणाकडून कसलीही मदत नको. मात्र, सरकारने गोरगरिबाची रोजीरोटी चालू द्यावी, अशी भाबडी आणि माफक अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
---
खांडेकर यांच्यावर कारवाई करा : मनसेची मागणी
जनतेवर पोलीस दंडुका चालवीत असतील, तर त्यांनी कुणाकडे दाद मागावी, अशी विचारणा करून थोरात यांची भाजी फेकणाऱ्या उपनिरीक्षक खांडेकर यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या शहराध्यक्षा मनीषा पापडकर यांनी केली आहे. यासंबंधाने पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांना महिला मनसेच्या वतीने सोमवारी निवेदन देण्यात आले. पापडकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पीडित महिलेची भेट घेऊन त्यांना आर्थिक मदतही केली.
--