गोव्यावरून आले यकृत, रुग्णाचा वाचला जीव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2020 04:07 AM2020-12-09T04:07:14+5:302020-12-09T04:07:14+5:30
नागपूर : छत्तीसगड दुर्ग येथील रहिवासी असलेला २१ वर्षीय युवकाचा गोव्यात अपघात झाला. कुटुंबीयांनी त्या दु:खातही स्वत:ला सावरत अवयव ...
नागपूर : छत्तीसगड दुर्ग येथील रहिवासी असलेला २१ वर्षीय युवकाचा गोव्यात अपघात झाला. कुटुंबीयांनी त्या दु:खातही स्वत:ला सावरत अवयव दान करण्याचा निर्णय घेतला. याची माहिती,‘झोनल ट्रान्सप्लान्ट को-ऑर्डिनेशन सेंटर’(झेडटीसीसी), नागपूरला देण्यात आली. ‘रिजनल ऑर्गन अॅण्ड टिशू ट्रान्सप्लांट ऑर्गनायझेशन’च्या (रोटो) नियमानुसार त्या दात्याचे यकृत गोवा येथून विशेष विमानाने नागपुरात आणले. न्यू ईरा हॉस्पिटलमधील एका ५८ वर्षीय पुरुषावर यशस्वी प्रत्यारोपण करण्यात आल्याने रुग्णाला जीवनदान मिळाले. विशेष म्हणजे, कोरोनाच्या आठ महिन्यानंतर पहिल्यांदाच कॅडेव्हर म्हणजे मेंदूमृत व्यक्तीचे अवयवदान झाले.
झेडटीसीसीने दिलेल्या माहितीनुसार, प्रज्ञुम्न नावाच्या युवकाचा गोवा येथे १ डिसेंबर रोजी अपघात झाला. त्याला तातडीने गोवा मेडिकल रुग्णालयात दाखल करण्यात आले. काही दिवसाच्या उपचारानंतर डॉक्टरांनी ‘ब्रेन डेड’ झाल्याची घोषणा केली. रुग्णालयाच्या डॉ. प्रीती वर्गिस यांनी नातेवाईकांना अवयवदान करण्याचा सल्ला दिला. नातेवाईकांनी आपल्या माणसाचे अस्तित्व कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार दोन्ही मूत्रपिंड, यकृत, हृदय व फुफ्फुस दान करण्यात आले. त्यापूर्वी याची माहिती, ‘सोटो’-‘रोटो’च्या नियमानुसार झेडटीसीसी, नागपूरच्या अध्यक्ष डॉ. विभावरी दाणी व सचिव डॉ. संजय कोलते यांना देण्यात आली. त्यांच्या मार्गदर्शनात झोन कॉर्डिनेटर वीणा वाठोडे यांनी पुढील प्रक्रिया पूर्ण केली. दात्याच्या रक्तगटाशी मिळत्याजुळत्या रुग्णाचा शोध घेण्यात आला. हा रुग्ण न्यू ईरामध्ये भरती होता. रुग्णाला यकृताची गरज होती. ते नियमातही बसत होते. यामुळे विशेष विमानाने यकृत मंगळवारी सकाळी नागपूर विमानतळावर पोहचले. तेथून ४ मिनिटात ग्रीन कॉरिडोअरने हॉस्पिटलमध्ये पोहचून पुढील तीन तासात प्रत्यारोपण करण्यात आले.
नागपुरात ३७ वे यकृत प्रत्यारोपण
नागपुरात आतापर्यंत ३७ यकृतांचे प्रत्यारोपण झाले. यातील २८ यकृत प्रत्यारोपण न्यू ईरा हॉस्पिटलमध्ये झाले. आज झालेल्या प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यकृत प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ. राहुल सक्सेना, डॉ. साहिल बन्सल व डॉ. स्नेहा खडे आणि त्यांच्या चमूने यशस्वी केली.
नागपूरबाहेरून आले चार अवयव
आतापर्यंत नागपूरबाहेरून चार अवयव आले. २०१८ मध्ये औरंगाबाद येथून दोनवेळा यकृत नागपुरात आणण्यात आले. यासाठी औरंगाबाद ते नागपूर मार्ग हा ग्रीन कॉरिडोअर करण्यात आला होता. २०१९ मध्ये पुण्यावरून विशेष विमानाने हृदय नागपुरात आणले होते. आज चौथ्यांदा गोव्यावरून यकृत नागपुरात आणले.