यकृत कर्करोग जागरूकता महिना; भारतात दरवर्षी ३४ हजार यकृताच्या कर्करोगाचे नवे रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2021 07:00 AM2021-10-31T07:00:00+5:302021-10-31T07:00:07+5:30
Nagpur News भारतात दरवर्षी ३४ हजारहून अधिक यकृताच्या कर्करोगाचे नवे रुग्ण आढळून येतात. धक्कादायक म्हणजे, ३३ हजार रुग्णांचा दरवर्षी मृत्यू होतो.
नागपूर : ‘हेपॅटोसेल्युलर कार्सिनोमा’ हा प्रौढांमधील यकृत कर्करोगाचा सर्वात सामान्य प्रकार आहे. भारतात दरवर्षी ३४ हजारहून अधिक यकृताच्या कर्करोगाचे नवे रुग्ण आढळून येतात. धक्कादायक म्हणजे, ३३ हजार रुग्णांचा दरवर्षी मृत्यू होतो. यात ४० ते ७० वयोगटातील रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. स्त्रियांच्या तुलनेत पुरुषांमध्ये या कर्करोगाचा चारपट अधिक धोका असल्याचे पुढे आले आहे.
यकृत कर्करोग जागरूकता महिन्याच्या निमित्ताने किंग्जवे हॉस्पिटलचे मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉ. सौरभ प्रसाद यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, यकृताच्या कर्करोगाला ‘हिपॅटायटीस बी’ किंवा ‘हिपॅटायटीस सी’ या विषाणूचा दीर्घकाळापर्यंत संसर्ग हा जोखीम घटक आहे. याशिवाय, वय, सिरोसिस, जास्त मद्यपान, लठ्ठपणा, टाइप २ मधुमेह आदींमुळेही या कर्करोगाचा धोका वाढतो. यकृताचा कर्करोग लवकर ओळखणे अनेकदा कठीण होते. कारण शेवटच्या टप्प्यात येईपर्यंत लक्षणे दिसून येत नाहीत. त्यामुळे उच्च धोका असलेल्या लोकांसाठी वेळोवेळी तज्ज्ञाचा सल्ला महत्त्वाचा ठरतो.
- लिव्हर सिरोसिसच्या रुग्णांना धोका अधिक
गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजिस्ट डॉ. अमोल समर्थ म्हणाले, यकृत (लिव्हर) सिरोसिसच्या रुग्णांना ‘हेपॅटोसेल्युलर कार्सिनोमा’ या यकृताच्या कर्करोगाचा धोका अधिक असतो. विशेष सोनोग्राफीतून या आजाराचे निदान लवकर करता येते. तातडीच्या उपचाराने मृत्यूचा धोका कमी करता येऊ शकतो.
- यकृताच्या कर्करोगाचा धोका टाळता येऊ शकतो
:: हिपॅटायटीस बी आणि सी संक्रमण टाळणे आणि उपचार
:: दारू आणि तंबाखूचे सेवन बंद करणे
:: वजनावर नियंत्रण ठेवणे आणि ते टिकवून ठेवणे
:: कर्करोगास कारणीभूत रसायनांच्या संपर्कात मर्यादा घालणे
:: यकृताच्या कर्करोगाचा धोका वाढवणाऱ्या रोगांवर उपचार करणे
- यकृताच्या कर्करोगाची लक्षणे
• विनाकारण वजन कमी होणे
• भूक न लागणे
• थोड्या जेवणानंतर खूप पोट भरल्यासारखे वाटणे
• मळमळ किंवा उलट्या
• यकृताचा वाढलेला आकार, उजव्या बाजूला बरगड्यांखाली जडपणा वाटणे
• वाढलेली प्लीहा, डाव्या बाजूला बरगडीखाली जडपणा वाटणे
• ओटीपोटात किंवा उजव्या खांद्याजवळ वेदना
• ओटीपोटात सूज किंवा द्रव जमा होणे
• खाज सुटणे
• त्वचा आणि डोळे पिवळे होणे (काविळ)