यकृत निकामी झालेल्या रुग्णावर प्रत्यारोपणाशिवाय जीवनदान, ‘सीआरआरटी’ प्रक्रियेद्वारे उपचार
By सुमेध वाघमार | Published: February 11, 2024 04:33 PM2024-02-11T16:33:05+5:302024-02-11T16:33:27+5:30
या उपचाराची विदर्भातील पहिलेच प्रकरण असल्याचे बोलले जात आहे.
नागपूर : एका तरुणाचे यकृत(लिवर) ‘हिपॅटायटिस-ए’ विकारामुळे निकामी (अक्युट लिव्हर फेल्युअर) झाले होते. रुग्णाची परिस्थिती बघता, त्यास यकृत प्रत्यारोपणाशिवाय पर्याय नव्हता. मात्र, प्रत्यारोपणास दाता मिळणे व आर्थिक बाबींमुळे तातडीचे प्रत्यारोपण शक्य नव्हते. हॉस्पिटलला दाखल करण्याच्या २४ तासांत रुग्ण कोमामध्ये गेला. ज्येष्ठ पोट व यकृत विकार तज्ज्ञ डॉ. प्रशांत भांडारकर यांच्या मार्गदर्शनात रुग्णावर ‘कंटीन्यु रिनल रिप्लेसमेंट थेरपी’ (सीआरआरटी) प्रक्रियेद्वारे उपचार करण्यात आले. यामुळे यकृत प्रत्यारोपणाशिवाय रुग्णाचे यकृताचे कार्य पुन:स्थापित करून रुग्णाचा जीव वाचविण्यात यश आले. या उपचाराची विदर्भातील पहिलेच प्रकरण असल्याचे बोलले जात आहे.
२९ वर्षीय ‘आशिष’ (बदलेले नाव) सात दिवसांपासून ताप, काविळ आणि बेशुद्धा अवस्थेत होता. पाण्याद्वारे पसरणाºया ‘हिपॅटायटिस-ए’ विषाणूमुळे होणाऱ्या तीव्र (अक्युट) ‘व्हायरल हिपॅटायटिस’ विकार झाल्याचे निदान झाले. यात यकृतावर सुज येऊन त्याचे कार्यान्वयन बिघडले होते. ही प्रक्रिया अत्यंत तीव्र व अचानक होते या विकारातील ९९ टक्के रुग्ण यकृतला निकामी न होताच बरे होतात. मात्र, १ टक्के रुग्णांमध्ये यकृत निकामी होऊन गुंतागूंतीची परिस्थिती निर्माण होते.
रुग्ण कोमात गेल्याने होता जीवाचा धोका
डॉ. भांडारकर म्हणाले, आशिष या १ टक्का रुग्णांमध्ये होता. त्याचा शरीरात अमोनिया आदी विषारी द्रव्यांचा संचय झाला होता. हे विषाक्त द्रव्य शरीरातून बाहेर काढण्यासाठी निरंतर डायलेसिसवर ठेवले. अर्थात या प्रक्रियेस ‘सीआरआरटी’ प्रक्रिया म्हणतात. रुग्ण कोमाच्या अवस्थेत असल्याने त्याच्या जीवास धोका होता. या दरम्यान रुग्ण व्हेंटिलेटरवर गेला. रुग्णाचा रक्तदाब कमी झाला होता, रक्तस्त्रावाचा धोका होता, मुत्रपिंड (किडनी) देखील निकामी झाली होती आणि इंफेक्शनवर औषधांचा प्रभाव कमी झाला होता मात्र, शर्थीच्या उपचारामुळे रुग्णाने औषधांना प्रतिसाद देणे सुरू केले. रुग्ण कोमातून बाहेर येत पूर्ण शुद्धीवर आला. डॉक्टरांच्या चमूने त्याला जीवाच्या धोक्यातून बाहेर काढले.
या डॉक्टरांच्या प्रयत्नांना आले यश
रुग्णावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या चमूमध्ये डॉ. भांडारकर यांच्यासह डॉ. अमित अग्रवाल, डॉ. मनोज व्यवहारे, डॉ. पीयुष कोट्टेवार, डॉ. योगेश बंग यांच्यासह डॉ. अमित गुल्हाणे, डॉ. जितेश जेसवानी व डॉ. आश्विनी तायडे यांचा समावेश होता.
यकृत निकामी झालेल्या रुग्णांसाठी ‘सीआरआटी’ आशेचे किरण
‘सीआरआरटी’ प्रक्रियेद्वारे यकृत निकामी झालेल्या रुग्णांवर उपचार करण्याचा एक मार्ग डॉक्टरांसमोर खुला झाला आहे; त्यामुळे अशा रुग्णांसमोर आशेचा किरण दिसू लागला आहे. रुग्ण आता जोखिमीच्या बाहेर आहे.
-डॉ. प्रशांत भांडारकर, ज्येष्ठ पोटविकार व यकृत तज्ज्ञ