यकृताचे रुग्ण अडचणीत
By Admin | Published: May 8, 2017 02:31 AM2017-05-08T02:31:39+5:302017-05-08T02:31:39+5:30
किरकोळ बिघाड झाला तरी यकृत तो दर्शवीत नाही, म्हणूनच सहसा यकृतातील बिघाड लक्षात येतो तोपर्यंत खूप नुकसान झालेले असते
मेडिकल : उपकरण बंद पडल्याने चाचण्या ठप्प
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : किरकोळ बिघाड झाला तरी यकृत तो दर्शवीत नाही, म्हणूनच सहसा यकृतातील बिघाड लक्षात येतो तोपर्यंत खूप नुकसान झालेले असते, म्हणूनच डॉक्टर काहीसंशयित रुग्णांना ‘लिव्हर फंक्शनिंग टेस्ट’ (एलएफटी) करायला लावतात. तर यकृताच्या (लिव्हर) गंभीर रुग्णांसाठी ही चाचणी महत्त्वाची ठरते. मेडिकलमध्ये यासाठी ‘सिमेन्स आॅटोअॅनलाझर’ उपकरण घेण्यात आले, परंतु पाच दिवसांपासून हे उपकरणच बंद पडल्याने चाचण्या थांबल्या असून गरीब रुग्ण अडचणीत आला आहे.
मेडिकलमध्ये पूर्वी बाह्यरुग्ण विभागात साधारण १५०० वर रुग्ण यायचे. आता ती वाढून २५०० वर गेली आहे. वाढत्या रुग्णसंख्येच्या तुलनेत येथे उपलब्ध सोयी कमी पडत आहेत. तर दुसरीकडे आजाराचे निदान करणारे उपकरण बंद पडत असल्याने विशेषत: गरीब रुग्णांना बाहेरून पदरमोड करून चाचण्या कराव्या लागत आहे. जीवरसायनशास्त्र विभागातील चिकित्सालयीन प्रयोगशाळेतील ‘सिमेन्स आॅटोअॅनलायझर’ उपकरण गुरुवारपासून अचानक बंद पडले. यामुळे या उपकरणांवर रोज होणाऱ्या चाचण्यांना फटका बसला आहे. विशेषत: ‘एलएफटी’ ही महत्त्वाची चाचणी बंद झाल्याने यकृताचा (लिव्हर) आजार असलेल्या रुग्णांना बाहेरून तपासणी करावी लागत आहे. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, संबंधित विभागाने इतर विभागांना उपकरण बंद पडल्याची माहिती देऊन चाचण्यांकरिता रक्त नमुने पाठविण्यात येऊ नये, असे लेखी पत्र दिले आहे. यात आकस्मिक चाचण्या नेहमीप्रमाणे सुरू राहील, असेही म्हटले आहे. परंतु आकस्मिक चाचण्याही होत नसल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
डॉक्टरानुसार, यकृताचा आजार घेऊन रोज तीन-चार रुग्ण मेडिकलमध्ये येतात. काही गंभीर रुग्ण अतिदक्षता विभाग उपचारालाही आहेत. परंतु यकृताशी संबंधित चाचणी बंद पडल्याने या रुग्णांना खासगी पॅथालॉजी लॅबमधून चाचणी करण्यास सांगितले जात आहे.
विशेष म्हणजे, मेडिकलचे उपकरण बंद पडताच काही खासगी लॅबचे शुल्क अचानक वाढत असल्याने याचा फटका गरीब रुग्णांना बसत आहे.