नागपुरात पहिल्यांदाच लिव्हर ट्रान्सप्लांट, आरोग्य विभागाची मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2018 07:15 PM2018-02-19T19:15:57+5:302018-02-20T04:52:12+5:30
राज्यात पुणे, मुंबई व औरंगाबादनंतर नागपुरात हे केंद्र सुरू होणार आहे, अशी माहिती, रुग्णालयाचे संचालक डॉ. आनंद संचेती यांनी पत्रपरिषदेत दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मानवी जीवन वाचविण्यासाठी अवयवदानाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. समाजात हे महत्त्व हळूहळू रुजत आहे. ‘ब्रेनडेड’ (मेंदूमृत) व्यक्तीकडून अवयवदानाचा आकडाही वाढत चालला आहे. यामुळे देशात अवयवदानात आघाडीवर असलेल्या तामिळनाडूनंतर महाराष्ट्र दुसऱ्या क्रमाकांवर आला आहे. अवयवदानात नागपूरनेही आघाडी घेतली असून मूत्रपिंड प्रत्यारोपणाच्या मंजुरीनंतर आरोग्य विभागाने न्यू ईरा रुग्णालयाला लिव्हर ट्रान्सप्लांटसाठी (यकृत प्रत्यारोपण) मंजुरी दिली आहे. राज्यात पुणे, मुंबई व औरंगाबादनंतर नागपुरात हे केंद्र सुरू होणार आहे, अशी माहिती, रुग्णालयाचे संचालक डॉ. आनंद संचेती यांनी पत्रपरिषदेत दिली.
यावेळी विभागीय प्रत्यारोपण समितीचे (झेडटीसीसी) सचिव डॉ. रवी वानखेडे, रुग्णालयाचे संचालक न्यूरोसर्जन डॉ. नीलेश अग्रवाल, कार्डिओलॉजिस्ट डॉ. निधीश मिश्रा व यकृत प्रत्यारोपणतज्ज्ञ डॉ.राहुल सक्सेना उपस्थित होते. कार्डिओवॅस्कुलर व थोरायासिस सर्जन डॉ. संचेती म्हणाले, नागपुरात यकृत प्रत्यारोपण केंद्र नसल्याने रुग्णाला पुणे, मुंबई, औरंगाबाद किंवा दुसऱ्या राज्यात जावे लागत असे. यात मोठा खर्च व्हायचा. परंतु आता नागपुरात न्यू ईरा रुग्णालयात यकृत प्रत्यारोपण सुरू होणार असल्याने रुग्णांचा खर्च वाचेल. या शिवाय महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना असल्याने याचा फायदाही रुग्णांना मिळेल.
आतापर्यंत १४ यकृत नागपूरबाहेर
डॉ. रवी वानखेडे म्हणाले, नागपुरात आतापर्यंत ‘झेडटीसीसी’मार्फत २९ मेंदूमृत व्यक्तीकडून अवयवदान झाले. परंतु विदर्भात मूत्रपिंड प्रत्यारोपणालाच मंजुरी असल्याने यकृतसह हृदय, फुफ्फुस पुणे, मुंबई, औरंगाबाद, चेन्नई येथे पाठवावे लागत आहे. २०१३ ते आतापर्यंत १४ यकृत बाहेर गेले. चार्टर्ड विमानाने हे अवयव बाहेर जात असल्याने याचा खर्च मोठा आहे. परंतु आता नागपुरात होऊ घातलेल्या यकृत प्रत्यारोपणामुळे याचा फायदा रुग्णांना होईल. विशेष म्हणजे, मूत्रपिंडासोबतच यकृतदात्यांची यादी तयार केली जाईल.
लवकरच हृदय, स्वादुपिंड प्रत्यारोपण
डॉ. नीलेश अग्रवाल म्हणाले, ‘लिव्हिंग डोनर’ यकृत प्रत्यारोपणासाठी तीन रुग्ण तयार आहेत. पुढील आठवड्यात ही प्रत्यारोपण शस्त्रक्रिया होण्याची शक्यता आहे. यकृत प्रत्यारोपणानंतर लवकरच हृदय व स्वादुपिंड प्रत्यारोपणाच्या मंजुरीची प्रतीक्षा आहे. हृदय प्रत्यारोपणाच्या परवानगीसाठी सार्वजनिक आरोग्य विभागाला प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. त्यांच्याकडून तपासणी झाल्यावर मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.
यकृत प्रत्यारोपणाचे दर महिन्याला ३०वर रुग्ण
डॉ.राहुल सक्सेना म्हणाले, नागपुरात महिन्याकाठी यकृताच्या आजाराचे १५०वर रुग्ण उपचारासाठी येतात. यातील सुमारे ३०वर रुग्णांना यकृत प्रत्यारोपणाची गरज भासते. यामुळे नागपुरात यकृत प्रत्यारोपणाची किती गरज आहे, हे लक्षात येते.
लिव्हिंग डोनरमध्ये यकृताचा ५० ते ६० टक्केच भाग घेतला जातो
रुग्णाच्या जवळच्या नातेवाईकांकडून यकृत घेऊन केल्या जाणाऱ्या प्रत्यारोपणाला ‘लिव्हिंग डोनर’ असे म्हटले जाते. यात यकृताचा उजव्या भागातील ५० ते ६० टक्केच भाग घेतला जातो. तर मेंदूमृत व्यक्तीकडून घेतलेल्या यकृताच्या प्रत्यारोपणाला ‘कॅडेव्हेरीक डोनर’ असे म्हटले जाते. यात पूर्ण यकृताचे प्रत्यारोपण केले जाते. ही शस्त्रक्रिया किडनी प्रत्यारोपणापेक्षा किचकट आहे. कारण, यात पूर्ण यकृत काढले जाते व त्याजागी नवे यकृत किंवा यकृताचा भाग जोडून संपूर्ण रक्तवाहिन्या पुन्हा जोडाव्या लागतात. या शस्त्रक्रियेचा यशस्वीतेचा दर ९० ते ९५ टक्के आहे, असेही डॉ. सक्सेना म्हणाले.