‘सुपर’मध्ये लिव्हर ट्रान्सप्लांट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2017 12:58 AM2017-08-29T00:58:21+5:302017-08-29T00:58:55+5:30
मेडिकलशी संलग्न असलेल्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आतापर्यंत २३ यशस्वी मूत्रपिंड प्रत्यारोपण झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मेडिकलशी संलग्न असलेल्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आतापर्यंत २३ यशस्वी मूत्रपिंड प्रत्यारोपण झाले. आता यकृत प्रत्यारोपण (लिव्हर ट्रान्सप्लांट) सुरू करण्याच्या प्रयत्नाला वेग दिला आहे. नुकत्याच उपलब्ध झालेल्या १०० कोटीच्या मुख्यमंत्री निधीतून प्रत्यारोपणासाठी स्वतंत्र अद्यावत शस्त्रक्रिया गृहाचे बांधकाम करून ‘ट्रान्सप्लांट मेडिसीन’ हा स्वतंत्र विभाग सुरू करण्याचे प्रस्तावित आहे. साधारण वर्षभरात ‘सुपर’मध्ये यकृत प्रत्यारोपण सुरू होईल, अशी माहिती मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांनी दिली.
अवयवदानाविषयी जागरुकता निर्माण व्हावी यासाठी शासनाच्यावतीने २९ आणि ३० आॅगस्ट रोजी महाअवयवदान जनजागृती महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.
याची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते. यावेळी सहयोगी प्राध्यापक डॉ. अविनाश गांवडे, डॉ. सुधीर गुप्ता, डॉ. भुयार आदी उपस्थित होते.
‘होटा’ला पाठविणार प्रस्ताव
डॉ. निसवाडे म्हणाले, मूत्रपिंड प्रत्यारोपण सुरू झाल्याने व आता यकृत प्रत्यारोपण सुरू होणार असल्याने स्वतंत्र ‘ट्रान्सप्लांट मेडिसीन’ विभागाची गरज भासू लागली आहे. त्या दृष्टीने पावले उचलण्यात आली आहे. यृकत प्रत्यारोपणासाठी ‘ह्युमन आॅर्गन ट्रान्सप्लांट अॅक्ट’कडे (होटा) प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. याला मंजुरी मिळाल्यास तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती व स्वतंत्र अद्यावत शस्त्रक्रिया गृहाचे काम लवकरच हाती घेण्यात येईल.
‘बोन मॅरो रजिस्ट्री’ सप्टेंबरपासून
डॉ. निसवाडे म्हणाले, रक्ताशी संबंधित गंभीर आजारावर ‘बोन मॅरो प्रत्यारोपण’ हा यशस्वी उपचार आहे. संबंधित रुग्णास त्याच्याशी जुळणारा स्टेमसेल दाता उपलब्ध झाल्यास त्याला नवे आयुष्य मिळू शकते. परंतु अल्प प्रमाणात जुळणारे स्टेमसेल दाते उपलब्ध होत असल्याने अशा आजारात मृत्यूचे प्रमाण आजही अधिक आहे. याला घेऊन शासनाने मेडिकलमध्ये ‘टाटा ट्रस्ट’च्या मदतीने ‘बोन मॅरो रजिस्ट्री’ तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. याची सुरुवात १० सप्टेंबरपासून होईल.
आज महाअवयवदान रॅली
महाअवयदान जनजागृती अभियानांतर्गत मेडिकलमध्ये मंगळवारी २९ आॅगस्ट रोजी, सकाळी ७.३० वाजता अवयवदान जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. ही रॅली मेडिकलच्या क्रीडांगण येथून निघेल. या शिवाय पोस्टर प्रदर्शन, माहितीपर व्याख्यान, वक्तृत्व स्पर्धा, पथनाट्य, रांगोळी स्पर्धा व निबंध स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले आहे.
महिनाभरात ‘नॉन ट्रान्सप्लांट आॅर्गन रिट्रायव्हल सेंटर’
डॉ. निसवाडे म्हणाले, अयवदान चळवळीत मेडिकलने पुढाकार घेतला आहे. याचाच एक भाग म्हणून ‘नॉन ट्रान्सप्लांट आॅर्गन रिट्रायेवल सेंटर’ (एनटीओआरसी) म्हणजे मेंदू मृत दात्याकडून अवयव काढण्याची प्रक्रिया कार्यान्वित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुढील महिन्यापासून याला सुरुवात होईल. सराव म्हणून रोज पाच प्राध्यापकांना ‘ट्रॉमा’मध्ये एक तासाची ड्युटी लावली जाईल. ते मेंदू मृत रुग्णांच्या नातेवाईकांचे समुपदेशन करतील. शिवाय, ‘एनटीओआरसी’साठी काय गोष्टी आवश्यक आहे त्याची माहिती देतील. या सेंटरमुळे अवयव प्रत्यारोपणासाठी अवयवदात्यांच्या प्रतिक्षेत असलेल्या रुग्णांची प्रतीक्षा कमी होईल.