क्षमतेपेक्षा अधिक गर्दीमुळेच गमावले प्राण; क्रेजी कॅसेल घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2018 10:46 AM2018-05-21T10:46:11+5:302018-05-21T10:46:23+5:30
क्रेझी कॅसल व्यवस्थापनाने दाखविलेल्या निष्काळजीपणामुळे अवघ्या १५ मिनिटात अक्षय आणि सागर या तरुणांना आपले प्राण गमवावे लागले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : समुद्रासारखा अनुभव घेता यावा म्हणून क्रेझी कॅसलमध्ये कृत्रिम लाटा निर्माण करणारा पूल तयार करण्यात आला आहे. १५ मिनिटाचा हा आनंद अनुभवण्यासाठी हजारो लोक आज पोहचले होते. पुलाच्या क्षमतेपेक्षा लोकांची संख्या अधिक झाली. त्यातच क्रेझी कॅसल व्यवस्थापनाने दाखविलेल्या निष्काळजीपणामुळे अवघ्या १५ मिनिटात अक्षय आणि सागर या तरुणांना आपले प्राण गमवावे लागले.
उन्हाळ्याच्या सुट्या त्यातच रविवार असल्याने क्रेझी कॅसल वॉटरपार्कमध्ये क्षमतेपेक्षा जास्त गर्दी झाली होती. येथे येणाऱ्या लोकांनी पाण्याचा मनसोक्त आनंद लुटावा म्हणून कृत्रिम लाटा निर्माण करणाºया पुलासारखे काही खेळ येथे आहेत. कृत्रिम लाटा निर्माण करणारा पुल एका तासाच्या अंतराने सुरू होतो. पुल सुरू होण्यापूर्वी सायरन वाजविला जातो. सायरन वाजताच लोक पुलाचा आनंद लुटण्यासाठी पळापळ करतात. आज दुपारी १ वाजता सायरन वाजला. लोकांची गर्दी मोठ्या संख्येने असल्याने जवळपास २०० ते ३०० लोक एकाच वेळी तिथे जमले. पुलाची खोली किमान सहा फूट आहे. लाटांचा वेग जसजसा वाढतो तसतसे पाणी आणखी वर चढते. आज लोकांची गर्दी अधिक झाली होती. गर्दी आवरण्यासाठी कुठलीही यंत्रणा तिथे उपलब्ध नव्हती. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून दिले जाणारे लाईफ जॅकेट नव्हते. बुडत्यांना वाचविण्यासाठी एकच लाईफ सेव्हर तिथे होता. अक्षय बिंड व सागर सहस्रबुद्धे आपापल्या मित्रांच्या ग्रुपसोबत तिथे आले होते. कृत्रिम लाटांचा आनंद लुटता लुटता जीव कसा गमाविला हे कुणालाही कळले नाही. आज येथे एका महिलेसह सहा युवकसुद्धा बुडता-बुडता वाचले.
१५ मिनिटात सोडले प्राण
पूल सुरू झाल्याबरोबरच एक महिला लाटेत पडली. तिला लोकांनी दोराच्या साहाय्याने बाहेर काढले. अक्षयचा मित्र आदर्शला पाणी डोक्याच्यावर जात असल्यामुळे गुदमरायला झाले. त्याने आरडाओरड केली. बंद करण्यास सांगितले. परंतु आॅपरेटरने त्याला प्रतिसाद दिला नाही. लाईफ सेव्हर म्हणून एक व्यक्तीच तिथे होती. गर्दीमुळे त्याला सुद्धा काय झाले कळलेच नाही. जेव्हा पुल बंद झाला. लोक बाहेर पडायला लागले, सात ते आठ मुलं बेशुद्ध झालेले आढळले. मित्रांच्या मदतीने त्यांना बाहेर काढण्यात आले. परंतु अक्षय आणि सागरने १५ मिनिटातच प्राण सोडले होते.
प्रथमोपचाराची सोय नाही, सुरक्षेकडेही दुर्लक्ष
क्रेझी कॅसलमधील सर्वच खेळात जोखीम आहे. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कुठलेच नियंत्रण नाही. लोक वाटेल तसा आनंद लुटतात. आज जेव्हा ही घटना घडली तेव्हा क्रेझी कॅसलमध्ये प्रथमोपचाराची सोय नव्हती, असे मुलांनी सांगतिले. क्रेझी कॅसलची प्रवेश फी ४५० रुपये असून, ५० रुपये लॉकरचे घेतले जातात. आनंद लुटण्यासाठी हजारो लोक येथे येतात. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेची काळजी व्यवस्थापनाने घ्यावी, असे लोकांचे म्हणणे आहे.
युवकांचा बाऊन्सवरवर रोष
या घटनेच्यावेळी आपल्या मित्रांचे प्राण वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न करत असतानाच बाजूला उभ्या असलेल्या बाऊन्सरला मदतीसाठी पाचारण केले होते. मात्र त्यांनी कसलीही मदत देण्याचे सौजन्य दाखवले नाही. ते पुतळ््याप्रमाणे उभेच राहिले. त्यांच्या या अमानवतावादी वर्तनाने संतप्त युवकांनी लोकमतजवळ आपल्या भावना व्यक्त केल्या.